ब्रिटनमधील मंदीच्या बातम्यांनी जगभरात चिंतेचे वातावरण आहे. गेले अनेक दिवस ब्रिटनमधील महागाई, बँक ऑफ इंग्लंडची व्याजदर वाढ या बातम्या माध्यमांमध्ये अग्रभागी आहेत. या सगळ्याचा भारतावर काय परिणाम होऊ शकेल, आपल्याला याबद्दल काळजी करण्यासारखी खरंच परीस्थिती आहे का, अर्थतज्ज्ञ काय म्हणतात याविषयी जाणून घेऊया.
नुकताच बँक ऑफ इंग्लंडने (BoE) पतधोरणावेळी मंदीचा इशारा दिला होता. बँक ऑफ इंग्लंडने व्याजदरात 0.75% टक्क्यांनी वाढ केली. यातून ब्रिटनमधील महागाई नियंत्रणात नसल्याचे अधोरेखित होत आहे. मंदी आणखी 1 ते 2 वर्ष राहिल असा अंदाज व्यक्त केला आहे. शिवाय ही मंदी 1990 च्या दशकासारखी गंभीर असेल असेही बँक ऑफ इंग्लंडने म्हटले आहे. यामुळे तिथे चिंतेचे वातावरण आहे.
Table of contents [Show]
भारतीय अर्थव्यवस्था मजबूत (India Fundamentally Strong Economy)
या बाबतीत अर्थतज्ज्ञांची वेगवेगळी मते आहेत. मात्र यातला एक सूर आपल्यासाठी दिलासादायक आहे. या जाणकारांच्या मते भारताला याचा फारसा फटका बसणार नाही. कारण, भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत आहे. भारत हा विकसनशील देश आहे. आपली अर्थव्यवस्था वाढत आहे. तसेच बाजारातील मागणी जास्त आहे. त्यामुळे पाश्चिमात्य जगा इतकी आपल्याला याविषयी चिंता करण्याचं कारण नाही, असा या अर्थतज्ज्ञांचा सूर आहे.
काही क्षेत्रातील नोकऱ्यांवर परिणाम (Some Job at Risk)
जाणकारांचा दुसरा मतप्रवाह लक्षात घेणंही तितकंच गरजेचं आहे. यानुसार, या मंदीचा भारताच्या निर्यातीवर परिणाम होईल. कारण स्पष्ट आहे,. मंदीने युकेमध्ये वस्तूंची मागणी कमी होईल. त्यामुळे भारतातून होणारी मागणी घटेल. याचा परिणाम भारतातल्या काही क्षेत्रावर होईल. ज्यामध्ये पेट्रोलियम प्रॉडक्ट, टेक्सटाईल, ज्वेलरी, ऑटो, फार्मा यांसारख्या क्षेत्राचा समावेश आहे. याचा सगळ्यात मोठा परिणाम या क्षेत्रातील नोकऱ्यांवर होऊ शकतो. ही या क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांसाठी चिंतेची गोष्ट ठरू शकते.
पर्यटनाला फटका बसेल (Tourism Industry may get affected)
ब्रिटनमधल्या मंदीचा आणखीही एका प्रकारे आपल्यावर परिणाम होऊ शकतो. गोवा, केरळ या राज्यांमध्ये युरोपातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या प्रचंड आहे. मंदीमुळे पर्यटक कमी झाले तर या राज्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे आपल्या पर्यटन व्यवसायातील उलाढाल कमी होईल. याचा परिणाम हॉटेल आणि पर्यटनाशी संबंधित आणखी व्यवसायांवर होऊ शकतो. हादेखील या मंदीच्या संदर्भात विचार करण्यासारखा मुद्दा आहे.
आपण काय काळजी घ्यायला हवी?
आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे केवळ ब्रिटनमधल्या मंदीपेक्षा अमेरिकेसह युरोपमध्येही दीर्घकाळ आर्थिक संकट राहिले तर त्याचा भारतावर तीव्र परिणाम होऊ शकतो.या सगळ्या शक्यता व्यक्त होत असल्या तरी आपण घाबरुन न जाता याबाबत काय काळजी घ्यायला हवी ते बघणं जास्त महत्वाचं आहे. याचा परिणाम आपल्या नोकऱ्यांवर होऊ शकत असल्याने पुढील एक दोन वर्षे आपल्या नोकऱ्या टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने काळजी घ्यायला हवी. याचबरोबर बचतीकडेही लक्ष द्यायला हवे. वैयक्तिक पातळीवर असे उपाय आपण अंमलात आणू शकतो. यामुळे ब्रिटनमधील मंदीची झळ तुमच्यापर्यंत पोहोचली तर तुम्ही या आर्थिक संकटाचा सामना करु शकाल.