देशभरात विस्तारलेली आणि आता युनिव्हर्सल बँक होण्याच्या दिशेने प्रवास करणारी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (USFB) अल्पावधतीच नावारुपास आली आहे. या बँकेने आता आपल्या शाखांचा आणखी विस्तार करण्याचे नियोजन केले आहे. तसेच बँकेकडून याच आर्थिक वर्षात शाखा विस्ताराबरोबरच कर्मचाऱ्यांच्या संख्येतही वाढ करण्याचे नियोजन केले आहे.
100 पेक्षा जास्त शाखांचा विस्तार
बंगळुरू येथे मुख्यालय असलेल्या उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने या आर्थिक वर्षात (FY2024)मध्ये तब्बल 104 नवीन शाखा सुरु करण्याचे नियोजन केले आहे. बँकेकडून आपल्या या शाखां विस्तारमध्ये बहुतांश शाखा या दक्षिण भारतात सुरू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये 30% या कर्नाटकात उघडल्या जातील. तर 3 शाखांसह बँक पहिल्यादाच आंध्रप्रदेशात प्रवेश करत आहे. दरम्यान, बँक उत्तरेतही गुजरात, यूपी, बिहार या ठिकाणी आपल्या बँकिंग व्यवसायाचा विस्तार करत आहे. जून 2023 पर्यंत, बँकेची 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 661 बँकिंग आउटलेट उपलब्ध होते.
4,800 कर्मचाऱ्यांची भरती
USFB आपल्या विस्तारासोबत कर्मचाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा विचारात आहे. बँकेकडून या नवीन शाखांसह याच आर्थिक वर्षात तब्बल 4,800 कर्मचाऱ्यांची भरती केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकिंग सेक्टरमध्ये काम करू इच्छणाऱ्यांसाठी रोजगाराची ही चांगली संधी असणार आहे. बँकेकडून सर्वाधिक कामगार हे दक्षिणेतील शाखांसाठी भरले जाणार आहेत. एका शाखेत 15 ते 20 कर्मचारी ठेवण्याचे बँकेचे नियोजन आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            