खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक यांनी राजीनामा दिला आहे. 1 सप्टेंबर 2023 पासून त्यांच्या या निर्णयाची अंमलबजावणी झाली. कोटक हे 31 डिसेंबर 2023 रोजी निवृत्त होणार होते त्यापूर्वीच राजीनामा दिल्याने कॉर्पोरेट क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.
उदय कोटक मागील 21 वर्षांपासून कोटक महिंद्रा बँकेचे नेतृत्व करत होते. इतक्या प्रदिर्घकाळ नेतृत्वपदावर एकच व्यक्ती असल्याने रिझर्व्ह बँकेकडून देखील कोटक महिंद्रा बँकेला विचारणा करण्यात आली होती. अखेर उदय कोटक यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यांनी स्वहस्ते संचालक मंडळाला राजीनाम्याचे पत्र सोशल मिडिया X वर पोस्ट केले आहे.
उदय कोटक यांच्या राजीनाम्यानंतर दिपक गुप्ता हे कोटक महिंद्रा बँकेचे अंतरिम व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून 31 डिसेंबर 2023 पर्यंत जबाबदारी सांभाळतील, असे कोटक महिंद्रा बँकेने शेअर बाजारांना कळवले आहे.
उदय कोटक यांनी 1985 मध्ये कोटक फायनान्स या बिगर बँकिंग वित्त संस्थेचा पाया घातला होता. पुढे रिझर्व्ह बँकेकडून कोटक फायनान्सला बँकिंग परवाना मिळाला. कोटक महिंद्रा बँकेने देशभर विस्तार केला. वर्ष 2002 पासून उदय कोटक कोटक महिंद्रा बँकेचे सीईओ आहेत.
पुढील सीईओ कोण?
उदय कोटक यांनी दोन दशकांहून अधिकाळ बँकेचे नेतृत्व केले आहे. आता त्यांच्या राजीनाम्याने दिपक गुप्ता यांच्याकडे 31 डिसेंबर 2023 पर्यंत अंतरिम सीईओपद देण्यात आले आहेत. मात्र दिपक गुप्ता आणि बँकेचे अध्यक्ष प्रकाश आपटे हे 31 डिसेंबर रोजी उदय कोटक यांच्यासोबतच निवृत्त होणार आहेत. त्यामुळे बँकेला नवीन सीईओची नियुक्ती करावी लागेल. बँकेचे पूर्णवेळ संचालक केव्हीएस मणियन आणि शांती एकांबरम हे दोन वरिष्ठ सीईओ पदाच्या शर्यतीत आहेत.
पत्रात काय म्हणाले उदय कोटक
उदय कोटक यांनी राजीनामा पत्र स्वहस्ताक्षरात लिहले आहे. त्यांनी हे पत्र सोशल मिडिया हॅंडलवर पोस्ट केले आहे. या पत्रात कोटक यांनी सहकाऱ्यांचे आभार मानले. या संस्थेत 38 वर्ष काम केले. अवघ्या तीन कर्मचाऱ्यांच्या साह्याने फोर्टमध्ये ही संस्था सुरु झाली होती.
आजवरचा प्रवासाचा आपण आनंद घेतला. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. या संस्थेसाठी माझा निर्णय योग्य ठरले, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या काही महिन्यात उदय कोटक यांच्या ज्येष्ठ पुत्राचा विवाह असल्याने ते पुढील काही महिने कुटुंबाला वेळ देणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.