Type of Cyber Frauds: डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रगतीने नागरिकांच्या आयुष्यात अनेक बदल झाले. विशेषत: बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील टेक्नॉलॉजीच्या पुढाकाराने पारंपरिक व्यवहारांचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेले. सर्व व्यवहार ऑनलाइन मार्गाने होऊ लागले आहेत. मात्र, जसे तंत्रज्ञानाचे फायदे असतात, तसे तोटेही आहेत. मागील काही वर्षात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. सुशिक्षित जाणकार व्यक्तींचीही फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. इंटरनेट, मोबाइल, सोशल मीडिया, ऑनलाइन खाते वापरताना कशा प्रकारचे घोटाळे होतात. या सायबर घोटाळ्यांचे प्रकार किती ते आपण या लेखात पाहू.
सायबर हल्ला टाळण्यासाठी काय करावे/ काय करू नये (Dos and Don'ts to avoid cyber attack)
- तुम्ही ज्या वेबसाइट किंवा अॅपवर लॉग इन करत असाल ते अधिकृत आहे की नाही तपासा. संकेतस्थळाचा URL तपासा. बनावट हेल्पलाइन क्रमांकही असतात. त्यांना खरी माहिती देण्याची चूक करू नका. क्रमांक आधी तपासून घ्या.
- सायबर गुन्हेगारी टाळण्यासाठी डिजिटल जनजागृती वाढवा. आरबीआयचे संकेतस्थळ किंवा अनेक बँकाही त्यांच्या वेबसाइटवर सायबर हल्ल्यांपासून वाचण्यासाठी काय करायला हवे याची माहिती देतात.
- फोन आणि कॉम्प्युटरवर पॉप-अप ब्लॉक करा. लेटेस्ट अँटीव्हारस वापरा. धोकादायक साइटवर जाणे टाळा. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
- ओटीपी कधीही शेअर करू नका. तुमच्या बँक खात्याचे ऑनलाइन लॉन इनचे पासवर्ड जन्मतारीख, मोबाईल क्रमांक नाव असे ठेवू नका. अल्फान्युमेरिक (अल्फाबेट आणि नंबर) पासवर्ड ठेवा. तसेच ठराविक कालावधीनंतर हे पासवर्ड बदलत राहा.
सायबर घोटाळ्यांचे प्रकार कोणते? (Type of Cyber Fraud)
फिशिंग म्हणजे काय?
तुमच्या जीमेल किंवा इतर कोणत्याही इमेल खात्यात दरदिवशी अनेक मेल येत असतात. यातील काही महत्त्वाचे तर काही जाहिरातीसंदर्भात असतात. घोटाळ्याच्या फिशिंग पद्धतीमध्ये तुम्हाला बनावट मेल अधिकृत सोर्सकडून आल्याचे भासवले जाते. जसे की, स्टेट बँक ऑफ इंडियातील खात्यासंदर्भात महत्त्वाचा अपडेट आल्याचे मेलमध्ये असले. मात्र, मेल अॅड्रेस बनावट असू शकतो. जर तुम्ही या मेलला प्रतिक्रिया दिली. तुमची माहिती अपडेट केली तर तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. मेलसोबतच असे बनावट मेजेसेस तुम्हाला येऊ शकतात. खात्री केल्याशिवाय कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. प्रत्येक मेल, वेबसाईट अॅड्रेस खात्री करूनच क्लिक करा.
Vishing आणि Skimming म्हणजे काय?
विशिंगद्वारे म्हणजेच Voice फिशिंग. हा सायबर घोटाळा करण्यासाठी internet telephone service (VoIP) चा वापर केला जातो. मोबाईलमधील ओटीपी व्हाईसच्या साहय्याने मिळवला जाऊ शकतो. मात्र, त्याआधी गुन्हेगार तुमच्या सीमचा किंवा मोबाईलचा ताबा मिळवतो. खाते क्रमांक, ओटीपी, आधार क्रमांक किंवा इतर महत्त्वाची माहिती व्हाईसच्या आधारे चोरली जाते. तुमचे सीमकार्ड जर जास्तवेळ बंद राहत असेल तर सावधान व्हा. कदाचित तुमचे सीमकार्ड फसवणुकीसाठी वापरले जाऊ शकते.
स्किमिंगमध्ये एटीएम मशीनला कार्डवरील माहिती चोरण्यासाठी विशिष्ट डिव्हाइस बसवला जातो. जो एटीएमचा पार्ट वाटू शकतो. मात्र, तुमचे एटीएम कार्ड स्कॅन करण्यासाठी किंवा पिनकोड जाणून घेण्यासाठी असे डिव्हाइसेस वापरण्यात येतात. एटीएममध्ये गेल्यास मशिनची नीट पाहणी करा. असा बाहेरच्या बाजूने एखादा डिव्हाइस बसवल्याचे आढळल्यास त्वरीत बँकेला आणि पोलिसांना फोन करा.
Smishing आणि सीम Swap म्हणजे काय?
Smishing हा फिशिंग घोटाळ्याचा प्रकार असून टेक्स्ट मेसेजेसद्वारे खासगी माहिती चोरी केली जाते. Smishing घोटाळ्यापासून वाचण्यासाठी टेक्स्ट मेसेजमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. किंवा मेसेजला प्रतिक्रिया देऊ नका. असे मेजेस डिलिट करा. सतत मेसेज येत असल्यास पोलिसांना कळवा.
SIM Swap म्हणजे काय?
सीम स्वॅप म्हणजे तुम्ही जे सीमकार्ड वापरता ते सीमकार्ड सायबर गुन्हेगारांकडून तात्पुरते किंवा कायमस्वरुपी बंद करण्यात येते. तसेच खोटे ओळखपत्र देऊन त्याच नंबरचे दुसरे सीमकार्ड मिळवून ओटीपी मिळवला जातो. जर तुमचा मोबाईल खूप वेळ आऊटऑफ नेटवर्क असेल तर सावध व्हा. दिल्लीमध्ये एका व्यक्तीला अशा प्रकारे लाखोंचा गंडा घालण्यात आला. सीमकार्ड हरवल्याचे भासवून गुन्हेगारांनी एका व्यापाऱ्याच्या सीमकार्डचा ताबा मिळवला होता. काही वेळातच खात्यातून लाखो रुपये ऑनलाइन काढून घेण्यात आले. या सोबत इतरही अनेक सायबर घोटाळ्याचे प्रकार आहेत.
सायबर गुन्ह्याचे बळी ठरल्यास काय कराल? (What to do after cyber attack on your Account)
जर तुमच्या खात्यातून अनधिकृत व्यवहार झाल्याचे लक्षात आल्यास तत्काळ बँकेला कळवा.
पैसे दुसऱ्या खात्यावर पाठवून बाधित खाते, कार्ड तत्काळ ब्लॉक करा.
आरबीआयच्या नियमानुसार, तुमच्या बँक खात्यावरुन अनधिकृत व्यवहार झाला आणि तुम्ही तत्काळ बँकेला कळवले. या व्यवहारास तुम्ही जबाबदार नसल्यास बँक तुम्हाला पैसे परत देईल.
सायबर गुन्ह्याची माहिती पोलिसांना द्या. तसेच 1930 या सायबर क्राइम हेल्पलाइनशी संपर्क साधा.
https://cybercrime.gov.in/ या पोर्टलवर तुम्ही ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता.
मोठ्या शहरांमध्ये सायबर क्राइम सेलचे वेगळे कार्यालय असते. या कार्यालयात जाऊन तुम्ही लेखी तक्रार करू शकता.
तुमच्या शहरामध्ये सायबर सेल कार्यालय नसेल तर नजीकच्या पोलीस स्थानकात जाऊन तक्रार दाखल करू शकता.
सायबर घोटाळ्याची तक्रार https://www.cert-in.org.in/ या पोर्टलवर देऊ शकता.
अनधिकृत व्यवहाराचे पुरावे जसे की, स्क्रीनशॉट काढून ठेवा. इतरही काही मेल, मेसेजेस असतील तर ते नमूद करा.