Twitter Blue Tick: प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांच्या मालकीच्या ट्विटरने अखेर ब्लू टिकबाबत कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. ज्या ट्विटर युझर्सनी ब्लू टिकचे सबस्क्रिप्शन घेतले नाही त्यांच्या खात्याची ब्लू टिक काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. म्हणजे आता तुम्हाला ट्विटरवर तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींचे किंवा इतर महत्त्वाच्या व्यक्तीचे खाते शोधण्यास अडचणी येऊ शकते. तसेच सेलिब्रिटींच्या बनावट खात्यांवरील खोट्या माहितीलाही तुम्ही बळी पडू शकता. प्रसिद्ध व्यक्तीच्या नावे खोटी खाते तयार करण्याचा धोका वाढला आहे. अनेक सेलिब्रिटी, संस्था आणि सरकारच्या अधिकृत खात्यांना या निर्णयाचा फटका बसला.
ब्लू टिक चा फायदा काय?
ट्विटर ब्लू टिक लाँच करण्याचा हेतू अधिकृत खाते सहज ओळखता यावे हा होता. एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यापूर्वीपासून ही सुविधा सुरू होती. त्यानुसार प्रसिद्ध व्यक्ती, संस्थांना ब्लू टिक देण्यात आले होते. व्हेरिफाइड खात्याचा अर्थ ही खाती त्याच व्यक्तींची किंवा संस्थांची आहेत असा होतो. (Twitter Blue Tick removed) त्यामुळे ट्विटर वापरणाऱ्या कोट्यवधी नागरिकांना अधिकृत खाती ओळखता येत होती. अन्यथा बनावट खातेधारकांकडून खोटी माहिती पसरवली जाण्याची शक्यता वाढली आहे.
ताजे उदाहरण म्हणजे, अॅमेझॉन कंपनीचे प्रमुख जेफ बेझोस यांच्या खात्याची ब्लू टिक काढून टाकल्यानंतर त्याचे अधिकृत खाते ओळखता येणे अवघड झाले. त्यांच्या नावाने अनेक खोटी खाती तयार करण्यात आली. त्यातील एका बनावट खातेधारकाने अॅमेझॉन कंपनी बंद करत असल्याचा संदेश ट्विटरवर पोस्ट केला. यातून नागरिकांची दिशाभूल झाली आणि गोंधळ उडाला. अशा आणखी घटना वाढू शकतात.
ट्विटर ब्लू टिकमागचे आर्थिक गणित
एलन मस्क यांनी मागील वर्षी 44 बिलियन डॉलर मोजून ट्विटर विकत घेतली. एवढी मोठी गुंतवणूक केल्यानंतर सहाजिकच ट्विटरमधून नफा मिळावा ही अपेक्षा मस्क यांची आहे. मात्र, ट्विटर कंपनी तोट्यात होती. कंपनी ताब्यात घेतल्यानंतर खर्च कमी करण्यासाठी मस्क यांनी खर्च कपात करण्यास सुरुवात केली. लेऑफ, कार्यालयांना टाळे, जाहिरात नियम बदल, प्रमुख अधिकाऱ्यांना काढून टाकणे, ब्लू टिक सबस्क्रिप्शन आणणे, असे अनेक निर्णय घेतले. यातील अनेक निर्णयांवरून त्यांच्यावर टीका झाली. मात्र, ब्लू टिकने ट्विटरच्या उत्पन्नात भर पडेल, हा हेतू आहे. शुल्क लागू करण्याचा निर्णय काही काळ लांबणीवर टाकण्यात आला होता. मात्र, आता हा निर्णय लागू करण्यात आला आहे.
ब्लू टिक खातेधारकांना दरमहा 8 डॉलर शुल्क आकारण्यात आल्याने ट्विटरच्या उत्पन्नात नक्कीच भर पडले. मात्र, या निर्णयाला मोठा विरोध होत आहे. जगभरातील आघाडीच्या संस्थांच्या ट्विटर खात्याची ब्लू टिकही गेली आहे. त्यामुळे आणीबाणीच्या काळात अधिकृत खाते कोणते हे ओळखने अवघड होऊन बसले आहे. काही स्वयंसेवी संस्थांनी ब्लू टिक घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सेलिब्रिटींनीही या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
ट्विटरवरील "legacy accounts” कोणती आहेत?
एलन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेण्याआधी ज्या युझर्सच्या खात्यांना ब्लू टिक आधीच देण्यात आली होती त्यांना लेगसी अकाउंट असे संबोधण्यात आले होते. या खातेधारकांना सबस्क्रिप्शन घेण्याचा पर्याय देण्यात आला होता. अन्यथा ब्लू टिक काढून घेण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. यातील अनेक सेलिब्रिटिंनी ब्लू टिकसाठी सबस्क्रिप्शन घेतले नाही. त्यासाठी मुदतवाढही देण्यात आली. मात्र, आता ट्विटरने या खात्यांची ब्लू टिक काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
बड्या सेलिब्रिटींना ट्विटरच्या निर्णयाचा फटका
आतापर्यंत ब्लू टिक सेवा मोफत होती मात्र आता शुल्क न भरणाऱ्या बड्या उद्योगपती आणि सेलिब्रिटींचा अधिकृत ब्लू टिक मार्क गेला आहे. मायक्रॉसॉफ्ट कंपनीचे प्रमुख बिल गेट्स, भारतीय क्रिकेटर विराट कोहली, पोप फ्रान्सिस, किम करदाशीन यासारख्या सेलिब्रिटींच्या खात्याची ब्लू टिक काढून टाकण्यात आली आहे.