• 03 Oct, 2022 23:11

Yes Bank Share : येस बँकेचा शेअर चर्चेत, दोन महिन्यात 50% वाढला

Yes Bank Share

Yes Bank Share: मागील दोन महिन्यात येस बँकेचा शेअर 50% हून अधिक वाढला आहे.येस बँकेच्या शेअरमध्ये अचानक आलेत्या तेजीने विश्लेषक देखील चक्रावले आहेत. येस बँकेचा शेअर पुढे कोणता टप्पा असेल याबाबत अंदाज व्यक्त केले जात आहेत.

दिर्घकाळापासून सुमार कामगिरी करणाऱ्या येस बँकेच्या शेअरने मागील आठवडाभरात टॉप ट्रेंडिंगमध्ये झेप घेतली आहे. येस बँकेचा शेअर दोन महिन्यात 50% वाढला आहे.अचानक या स्क्रिप्टमध्ये तेजीची लाट धडकली असून शेअर मार्केट एक्सपर्टदेखील अचंबित झाले आहेत.

आज बुधवारी 14 सप्टेंबर 2022 रोजी येस बँकेचा शेअर इंट्रा डेमध्ये 17.50 रुपयांवर गेला होता. सध्या तो 17.25 रुपयांवर आहे. याआधी शुक्रवारी 9 सप्टेंबर 2022 रोजी येस बँकेचा शेअर 18.30 रुपयांवर गेला होता. दोन महिन्यांहून कमी कालावधीत हा शेअर 48% इतका वाढला आहे. यापूर्वी 20 जून 2022 रोजी येस बँकेचा शेअर 12.30 रुपये इतका होता.

मागील काही तिमाहींमध्ये येस बँकेची कामगिरी बहरली आहे. आर्थिक आघाड्यांवर बँकेची कामगिरी चांगली होत आहे. त्याशिवाय संचालक मंडळाने निधी उभारणीबाबत चाचपणी सुरु केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये येस बँकेच्या शेअरबाबत आश्वासक वातावरण तयार झाले असल्याच शेअर मार्केट विश्लेषकांचे म्हणणे आहे. जानेवारी 2021 नंतर येस बँकेचा शेअर सर्वोच्च पातळीवर गेला आहे. मागील सहा आठवड्यात येस बँकेचा शेअर जवळपास 35%  वाढला. तर याच काळात बीएसई सेन्सेक्स 8.4% वाढला.

yes-bank-shares-1.png

क्रेडिट रेटिंग्ज वाढले

क्रिसिल आणि इंडिया रेटिंग्ज या क्रेडिट रेटिंग्ज एजन्सीजने यापूर्वीच येस बँकेचे मानांकन वाढवले होते. बँकेची कामगिरी सुधारत असल्याने क्रिसिले मानांकन वाढवले होते. मार्च 2020 मध्ये बँकेची फेररचना केल्यानंतर बँकेच्या ठेवींमध्ये वाढ झाली आहे. अनुत्पादित मालमत्तांवर नियंत्रण आणि जोखीम व्यवस्थापन तसेच 8900 कोटींचा भांडवल उभारणीचा प्लॅन यामुळे येस बँकेची आर्थिक स्थिती भक्कम झाली असल्याचे क्रिसिलने आपल्या अहवालात म्हटलं होते.

पुनर्रचना पूर्णत्वाकडे

बँकेच्या पूनर्रचनेनंतर वरिष्ठ व्यवस्थापन स्थिरस्थावर झाले आहे. नुकताच एचडीएफसी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी यांचा येस बँकेच्या संचालक मंडळावर नियुक्ता झाली आहे.वृद्धीसाठी येस बँकेचे विविध सेवांमध्ये प्रयत्न केले जात आहेत.अलिकडच्या काळात बँकेने डिजिटल पेमेंट सेवेत चांगली आघाडी घेतली आहे. याशिवाय बँकेकडून जे.सी फ्लॉवर्स या कंपनीला जवळपास 48,000 बुडीत कर्जांची विक्री करण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञ शेअरबाबत सांगतात...

येस बँकेच्या शेअरभोवती तेजीचे वलय निर्माण झाले आहे. हा शेअर पुढील दोन तिमाहींमध्ये 30 रुपयांची पातळी गाठू शकतो, असा अंदाज मेहता इक्विटीजचे संशोधक प्रशांत तापसे यांनी व्यक्त केला आहे. जर हा शेअर 19.50 रुपयांची पातळीवर गेला तर तो पुढे 22 रुपयांवर जाऊ शकतो. दिर्घकाळात अर्थात 6 ते 12 महिन्यांसाठी 28-30  रुपयांचे टार्गेट ठेवावे, असे तापसे यांनी सांगितले.