मॉन्सूनने राज्यात सर्वदूर हजेरी लावली आहे. निर्सग हिरवाईने नटला आहे. अशातच कॉलेजचे स्टुडंट्स, नुकताच जॉबला लागलेली तरुणाईची पावले गडकोटांच्या दिशेने पडतात. ट्रेकिंगचा सिझन सुरु झाला असून विकेंडला लोकप्रिय किल्ल्यांवर गर्दी होताना दिसत आहे. मात्र ट्रेकिंगला जाण्यापूर्वी काही खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. योग्य माहितीच्या आधारे प्लॅन केला तर ट्रेकिंग खर्चिक ठरणार नाही.
महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. इथ शेकडो गड किल्ले इतिहासाची साक्ष देतात. या किल्ल्यांना ट्रेकिंगसाठी मॉन्सूनमध्ये पहिली पसंती दिली जाते. सध्याचा नवा ट्रेंड आहे तो सोशल मीडियाचा ट्रेंड आहे. त्यामुळे ट्रेकला जाण्यापूर्वी कोणत्या किल्ल्याला भेट देणार आहात तिथली माहिती व्यवस्थित घ्या आणि मगच ट्रेकला जा, असा सल्ला माउंटेन स्पोर्ट्स अॅकेडमीचे प्रमुख नंदू चव्हाण यांनी दिली.
सध्या इन्स्टावर जो रिल फेमस होतो तिथेच लोक जायला सुरुवात करतात.सिक्रेट वॉटरफॉल,देवकुंड वॉटरफॉल, कळसुबाई असे महत्वाचे लोकेशन्स आहेत. पण जर कोणी कळसुबाईचा इन्स्टावर फोटो टाकला की तिथे क्लाऊड्स आले आहेत तर दुसऱ्याच दिवशी तिथे पाच ते सात हजार लोक जातात. काहीजण थेट गावातल्यांशी संपर्क साधून गाडी घेऊन जातात. यामुळे या ठिकाणी एकाच दिवशी प्रचंड गर्दी होताना दिसते, असे चव्हाण यांनी सांगितले. गर्दी टाळण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
मॉन्सूनमध्ये शक्यतो ट्रेकर्सकडे चांगले शूज हवेत. याशिवाय क्लोदिंग महत्वाचे आहे. पावसामुळे त्रास होणार नाही, असे हलकेफुलके आणि फुलस्लिव्हज टी-शर्ट घातल्यास झाडाच्या काट्यांपासून संरक्षण करता येईल, असे चव्हाण यांनी सांगितले.
जर ट्रेकवर जाताना विंडचिटर नेले असेल आणि ते वाऱ्याने फडफडत असेल आणि कुठल्या झाडात अडकले तर तो ट्रेकर व्हॅलीमध्ये पडू शकतो. कोणाचा निसरड्या वाटेवर पाय घसरु शकतो, अशा ठिकाणी ट्रेकर्सने विशेष काळजी घ्यायला हवी, असा सल्ला चव्हाण यांनी दिला.
बजेटचा विचार केला तर महाराष्ट्रात एक दोन ट्रेक करण्यासाठी किमान साहित्य घेणे आवश्यक आहे. ज्यात चांगले शूज, बॅग, स्टीक अशा गोष्टींचा समावेश आहे. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील ट्रेकर्सकडून अॅक्शन ट्रेकिंग किंवा CTR शूज वापरले जातात. शूजचे बजेट मॅक्स टू मॅक्स 1200 रुपये आहे. आता सगळी इक्विपमेंट सहजपणे उपलब्ध आहेत. शूज आणि रेनगिअर महत्वाचे आहे. सगळ्याचं बजेट बघितलं तर 2500 ते 3000 रुपयांपर्यंत खर्चात एक चांगला ट्रेक सहज करता येईल, असे चव्हाण यांनी सांगितले.
ट्रेकिंग इक्विपमेंटची बाजारपेठ लिमिटेड आहे. डुप्लिकेट प्रॉडक्ट्ससुद्धा मार्केटमध्ये येऊ लागली आहेत. आम्ही ट्रेकर्सला एज्युकेट करण्याचा प्रयत्न करतो. काही प्रॉडक्ट्स ऑनलाईन पोर्टलवर ड्युप्लिकेट विकली जातात. त्यामुळे लोकांनी खरेदी करण्यापूर्वी त्याची माहिती घ्यायला हवी.
सोलर लॅम्प चांगल्या क्वालिटीचा दोन वर्षाच्या वॉरंटीसकट घेतला तर तो 650 रुपयांपासून सुरुवात आहे. तो किमान पाच वर्ष टिकतो त्याची बॅटरी लाईफ तितकी असते.तुम्ही इन्व्हेस्टमेंट बघाल तर 650 - 600 रुपयांमध्ये तो पाच वर्ष तो काम करणार.त्यामुळे त्याची किंमत खूपच कमी आहे.
दोन दिवसांच्या ट्रेकसाठी किती बजेट लागेल
- समजा दोन दिवसांचा हरिश्चंद्र गड असेल तर तुमच्यासमोर दोन पर्याय आहेत.
- एक तर तुम्ही लोकल माणसाकडून डिटेल्स घ्या.त्यांच्याकडून फूड घ्या,स्लिपींग बॅग घ्या, टेन्ट घ्या. यासाठी 1200 ते 1800 रुपये घेतात.
- जर तुम्हाला घ्यायचे असेल तर एक टेंट 800 रुपये, स्लिपिंग बॅग 600 रुपये खर्च येतो.
- छोट्या बेसिक गोष्टींमध्ये एक टेंट लाईट या सगळ्यांच बजेट केले तर महाराष्ट्रपुरता 3000 रुपयांवर जाणार नाही.
- Night Stay ला तुम्हाला हेडलॅम्प खूप महत्वाचा आहे. हातात एक वॉकिंग स्टीक महत्वाची आहे.
- ती असेल तर तुमच्यापासून पाच ते सहा फुटाच्या अंतरात कोणी जनावर असेल तर त्याला काठीने बाजूला करु शकता.
ट्रेकर्सला मिळतो विमा मात्र जनजागृतीचा अभाव
गेल्या काही वर्षामध्ये ट्रेकिंग, हायकिंग करताना अपघाताच्या घटना घडल्या. यात ट्रेकर्सना जीव गमवावा लागला होता. इन्शुरन्सबाबतीत ट्रेकर्समध्ये अद्याप अवेअरनेस नसल्याचे नंदू चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले की, लोकांना माहितच नाही कोणती कंपनी ट्रेकिंग किंवा हायकिंगसाठी इन्शुरन्स देते. विमा सुरक्षेबाबत ट्रेकर्समध्ये जनजागृती आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सध्या 'ट्रीप 360' ही कंपनी ट्रेकर्सला इन्शुरन्स पॉलिसी इश्य करते, अशी माहिती चव्हाण यांनी दिली. या विमा पॉलिसीचा एक दिवसाचा इन्शुरन्स प्रीमियम 70 ते 80 रुपये इतका कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
ऐतिहासिक वास्तूंचा वारसा जपा
गिर्यारोहणाकडे बघण्याचा दृष्टीकोन व्यवस्थित असायला हवा. गिर्यारोहण करताना तुम्ही ज्या किल्ल्यावर किंवा वास्तूवर जाता ती वास्तू पूर्वजांची वास्तू असून त्याला खूपच महत्व आहे. या वास्तूत आपल्या पूर्वजांचा इतिहास आहे. हा इतिहास जपणे आवश्यक आहे, असे आवाहन चव्हाण यांनी यावेळी केले. गावातल्या स्थानिकांशी चांगले वागा त्यांना रिस्पेक्ट द्या. त्यांची फसवणूक करु नका, असा सल्ला चव्हाण यांनी दिला.