मॉन्सून सर्वत्र जोरदार सुरु आहे. या आल्हाददायक वातावरणात ट्रेकर्सना निर्सग खुणावत असतो. विकेंडला गड किल्ले, जंगल, दऱ्याखोऱ्यांमध्ये शेकडो ट्रेकर्स भटकंतीसाठी निघतात. ट्रेकिंग करताना पायात चांगल्या दर्जाचे शूज असणे आवश्यक आहे. चालताना किंवा पर्वतारोहण करताना पायांना इजा होऊ नये आणि प्रवास आरामदायी होण्यासाठी सर्वोत्तम ट्रेकिंग शूज असणे आवश्यक आहे.
ट्रेकिंगसाठी पाच मूलभूत गोष्टी सोबत असणे आवश्यक आहे. चांगल्या दर्जाचे शूज, बॅकपॅक्स, पाण्याची बाटली, ट्रेकिंगचे विशिष्ट कपडे आणि रेनकोट अशा पाच गोष्टी ट्रेकर्सकडे असायला हव्यात.
सर्वसाधारणपणे ट्रेकिंगसाठी शूज घेताना त्याला चांगला ग्रीप असणे आवश्यक आहे. शूज वजनाने हलके असणे महत्वाचे आहे. जास्त दिवसांचा ट्रेक करताना सतत चालावे लागते. अशावेळी हलके शूज फायदेशीर ठरतात. चांगल्या दर्जाच्या ट्रेकिंग शूजची किंमत 1500 रुपये ते 10000 रुपयांच्या दरम्यान आहे.
अनेकदा ट्रेकिंगसाठी निघालेले काहीजण चप्पल, सॅण्डल, रनिंग शूज, स्लीपर घालतात. मात्र यामुळे निसरड्या वाटेवर, कड्या कपारींमध्ये चालताना पाय घसरुन अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे ट्रेकिंगसाठी जाताना ट्रेकिंग शूज घालणे सुरक्षेच्या दृष्टीने हिताचे ठरते.
मॉन्सूनमध्ये शक्यतो तुम्हाला शूज चांगले पाहिजेत. त्याशिवाय ट्रेकर्सचे क्लोदिंग महत्वाचे आहे. पावसामुळे त्रास होणार नाही असे हलकेफुलके आणि फुलस्लिव्हज टी-शर्ट हवेत, असे मत बोरिवलीमधील माउंटेन स्पोर्ट्स अॅकेडमीचे प्रमुख नंदू चव्हाण यांनी व्यक्त केले. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील ट्रेकर्सकडून अॅक्शन ट्रेकिंग किंवा CTR शूज वापरले जातात. सर्वसाधारण विचार केला तर शूजची किंमत जास्तीत जास्त 1200 रुपयांपर्यंत असते, असे चव्हाण यांनी सांगितले.
कोणत्या ब्रॅंड्सचे शूज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत?
फूटवेअर निर्मितीमधील जवळपास सर्वच उत्पादकांकडून ट्रेकिंग आणि हायकिंग शूज तयार केले जातात. त्यातील काही निवडक कंपन्यांचे ट्रेकिंग शूज ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहेत. यात वाइल्डक्राफ्ट, सालोमन, आदिदास, रेडचीफ, QUECHUA या ब्रॅंड्सचे शूज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. या शूजची किंमत 1500 रुपये ते 10000 रुपयांच्या दरम्यान आहे. ट्रेकिंग शूज ऑनलाईन खरेदी करता येऊ शकतात.