Tree Authority PMC: पुण्यात रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडं आणि निसर्गरम्य टेकड्या शहराचं वैभव आहेत. पर्वती, चतु:श्रुंगी, तळजाई, तुकाई यासह अनेक टेकड्या पुण्यात आहेत. दर 5 वर्षांनी PMC हद्दीतील झाडांची जनगणना होते. त्यानुसार पुणे शहरात सुमारे 55 लाख झाडे आहेत.
पावसाळ्यात यातील काही झाडे धोकादायक होतात. मुसळधार पाऊस तसेच वाऱ्याने झाडं उन्मळून पडतात. तसेच फांद्या पडूनही मालमत्ता किंवा गाड्यांचे नुकसान होते. मात्र, धोकादायक झाड तुम्ही परवानगीशिवाय तोडू शकत नाहीत.
पुणे महानगर पालिका क्षेत्रातली कोणतेही झाड तोडण्यासाठी पालिकेची परवानगी आवश्यक आहे. (Tree cutting and trimming branches rules of PMC) अन्यथा दंड आणि तुरूंगवास होऊ शकतो. झाडांचे संरक्षण करण्यासाठी नागरी क्षेत्र झाडांचे जतन अधिनियम 1975 राज्यात लागू आहे. या कायद्यात 2021 साली सुधारणा करण्यात आली. या कायद्यातील तरतूदीनुसार महानगरपालिका बेकायदेशीरपणे झाड तोडल्यास कारवाई करते.
बेकायदेशीरपणे झाड तोडल्यास काय कारवाई होते?
वृक्ष अधिकाराच्या परवानगीशिवाय स्वत:च्या मालकीच्या जागेतील किंवा दुसऱ्याच्या जागेतील झाड तोडल्यास कारवाई होते. झाडाच्या फांद्या बेकायदेशीपणे तोडल्यासही कारवाई होते.
तरतूदींचे उल्लंघन करून जी व्यक्ती झाड तोडेल किंवा झाड तोडण्यास कारणीभूत ठरेल त्यास झाडाच्या किंमती एवढा मात्र, 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल इतका दंड करण्यात येईल. तसेच 8 दिवसांपेक्षा जास्त आणि 1 वर्षांपेक्षा कमी कालावधीचा तुरुंगवास होऊ शकतो.
ना हरकत प्रमाणपत्र कोणत्या गोष्टींसाठी आवश्यक?
पुणे महापालिका हद्दीमधील झाडांच्या फांद्या तोडणे/छाटणे, धोकादायक वृक्ष तोडणे, बांधकामास अडथळा ठरणारे वृक्ष तोडण्याआधी पालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याशिवाय झाड तोडता येणार नाही. अन्यथा उद्यान विभागाद्वारे कारवाई केली जाईल.
झाड तोडायचं असल्यास प्रक्रिया काय?
झाड किंवा झाडाच्या फांद्या तोडायच्या असतील तर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडे अर्ज करावा लागेल. हा अर्ज तुम्ही पालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने करू शकता. तसेच कार्यालयात जाऊनही तुम्ही अर्ज करू शकता.
झाड तोडण्याचे परवानगी पत्र घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे?
वृक्ष तोड करण्याबाबतचा अर्ज
धोकादायक झाडाच्या फांद्यांचे सुस्पष्ट फोटो
फक्त धोकादायक फांद्या तोडण्यात येतील असे हमीपत्र
संपूर्ण झाड तोडायचे असल्यास झाडाचे सुस्पष्ट फोटो
बांधकामामुळे झाड तोडावे लागत असेल तर बांधकामाचे ना हरकत प्रमाणपत्र
जेवढी झाडे तोडावी लागतील त्या बदल्यात वृक्षारोपण कोठे करणार याची माहिती
झाड न तोडता बांधकाम करता येणार नाही, असे वास्तुविशारदाचे प्रमाणपत्र
जागेच्या मालकी हक्काची कागदपत्रे. तसेच यासोबत इतरही कागदपत्रे लागू शकतात. महापालिकेच्या संकेतस्थळावर सर्व कागदपत्रांची यादी मिळेल.