लांब पल्ल्याचे अंतर गाठण्यासाठी आजही रेल्वेला पहिली पसंती दिली जाते.रेल्वेचा पर्याय हा इतर वाहतुकीच्या सांधनांच्या तुलनेत स्वस्त आहे. मात्र भारतीय रेल्वे मेल-एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विमा सुरक्षा देखील पुरवते. जे प्रवाशी ऑनलाईन तिकिट बुकिंग करतात त्यांना विमा पर्याय उपलब्ध केला जातो. ज्यात प्रवाशांना तिकिट बुक करताना तब्बल 10 लाख रुपयांचा विमा हा अगदी शुल्लक म्हणजेच एक रुपयाहून कमी किंमतीत मिळतो.
रेल्वेत प्रवास करताना विमा घेण्याचा पर्याया हा ऐच्छिक आहे. ऑनलाईन तिकिट बुक करताना प्रवाशांना ट्रॅव्हल इन्शुरन्सचा पर्याय निवडावा लागतो. तरच विमा पॉलिसी इश्यू केली जाते. जर प्रवाशाने विमा पर्याय नाही निवडला तर त्याला प्रवासावेळी रेल्वेकडून कोणताही विमा मिळत नाही. आरक्षण खिडकीवरुन तिकिट बुकिंग केल्यास विमा पर्याय मिळत नाही. ट्रेन टॅव्हल इन्शुरन्समध्ये 10 लाख रुपयांचा विमा प्रिमीयम अवघे 49 पैसे ते 90 पैशांच्या दरम्यान मिळतो.
IRCTC च्या वेबसाईटवर आणि अॅपच्या माध्यमातून रेल्वे प्रवासासाठी तिकिट बुक करताना विमा पर्याय प्रवाशांना मिळतो. रेल्वेचा प्रवासी विमा हा केवळ भारतीय प्रवाशांसाठी आहे. परदेशी प्रवाशी हा विमा घेऊ शकत नाहीत. रेल्वे प्रमाणेच विमान कंपन्या देखील प्रवाशांना प्रवासी विम्याचा पर्याया देतात.मात्र त्यांचा विमा प्रिमीयम हा रेल्वेच्या तुलनेत खूपच जास्त असतो.
रेल्वेच्या प्रवासी विम्यामध्ये प्रवाशांना प्रवासा दरम्यान सामान हरवसल्यास किंवा त्याची मोडतोड झाल्यास भरपाई दिली जाते. दुर्देवाने रेल्वेला अपघात झाल्यास जखमी प्रवाशांना उपचाराचा खर्च, मृत्यू झाल्यास वारसांना भरपाई दिली जाते. रेल्वे ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसीनुसार अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाते. प्रवाशाला अपंगत्व आल्यास 7.5 लाख रुपयांची विमा भरपाई दिली जाते. अपघातात प्रवासी जखमी झाल्यास उपचारासाठी 2 लाख रुपयांची भरपाई तर किरकोळ जखमींना 10000 रुपयांची विमा मदत केली जाते.
भरपाईसाठी दावा कसा कराल
दुर्देवाने रेल्वे गाडीला अपघात झाल्यास रेल्वे ट्रॅव्हल इन्शुरन्सनुसार चार महिन्यात विमा भरपाईसाठी दावा करता येतो. IRCTC वर तिकिट बुकिंग करताना ज्या विमा कंपनीकडून पॉलिसी इश्यू केली जाते त्या कंपनीकडे प्रवाशांच्या वारसांना थेट विमा दावा दाखल करता येतो. याशिवाय रेल्वेकडून अशा अपघातांवेळी स्वतंत्र तात्पुरता मदत कक्ष सुरु करण्यात येतो. त्या ठिकाणी पाठपुरावा करता येईल. मात्र रेल्वेचा ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना प्रवाशाने नॉमिनीचा योग्य तपशील देणे तितकेच महत्वाचे आहे. ज्यात नॉमिनीचे नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता आणि त्याचे प्रवाशाचे असलेले नाते याचा तपशील द्यावा लागतो.