मागील आठ दहा वर्षांपासून देशभरात ट्रॅक्टर विक्री (Tractor sale increasing in india) मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 2012 साली सुमारे चार ते साडेचार लाख ट्रॅक्टरची देशभरात विक्री झाली होती. हा आकडा दहा वर्षात दुपटीने वाढला आहे. 2022 वर्षात तब्बल 9 लाख ट्रॅक्टरची विक्री होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. डिसेंबर महिना संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. ट्रॅक्टर विक्रीची अंतिम आकडेवारी हाती आली नाही. मात्र, हा आकडा 9 लाख असेल असा अंदाज आहे.
का वाढतेय ट्रॅक्टरची विक्री?
भारत शेतीप्रधान देश आहे. बळीराजाच्या घरी दावणीला बैलजोडी ही हमखास असतेच. शेतीकाम करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने बैलांचा वापर होत असे. मात्र, जनावरांच्या वाढत्या किमती, महाग चारा, वर्षातील फक्त काही दिवसच शेतीचे काम आणि इतर दिवस बैलजोडी सांभाळण्याचा खर्च वाढत असल्याने बळीराजा ट्रॅक्टरला पसंती देत आहे. 'मेल कॅटल' म्हणजे बैल आणि शेतीच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या जनावरांची संख्या 2019 च्या पशुधन जनगणनेत 2012 च्या तुलनेत 30 टक्क्यांनी कमी झाली आहे. यावरुन स्पष्ट होते की, शेतकऱ्यांचा ओढा आता आधुनिक यंत्रांकडे असून बैलजोडी असलेल्या शेतकऱ्यांची संख्या कमी होत आहे. टॅक्टर विक्रीमध्ये वार्षिक 23 टक्के दराने वाढ होत आहे. यावर्षी एप्रिल-नोव्हेंबर महिन्यांदरम्यान ९ टक्के वाढ नोंदवण्यात आली.
ग्रामीण भागात मजुरांची कमतरता
ग्रामीण भागातील तरुणांचे चांगल्या रोजगाराच्या संधीसाठी शहरी भागात स्थलांतर वाढले आहे. शेतीला नकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याची वृत्ती वाढली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात स्वस्त मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. तसेच जे मजूर मिळतात त्यांच्या मर्जीवर आणि मागेल तेवढी किंमत देऊन काम केले जाते. हे सुद्धा यांत्रिकीकरण वाढण्यातील महत्त्वाचे कारण आहे.
बैलजोडी विकत घेण्याचा तसेच त्यांना सांभाळण्याचा खर्च जास्त आहे. एक बैलजोडी विकत घेण्यासाठी सुमारे 40 हजार ते 1 लाख रुपये लागतात. शेतकऱ्याकडे जर शेती कमी असेल तर तो स्वत:च्या शेतात चाराही पिकवू शकत नाही. तसेच चार विकत घेणे ही आता परवडत नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याच्या किमती वाढल्या आहेत. शेतीची नांगरणी, मशागत ही फक्त काही ठराविक काळ चालते. त्यामुळे इतर काळात जनावरे फक्त दावणीला बांधून असतात.
20 हॉर्सपॉवर क्षमतेचा ट्रॅक्टर 2 लाख 80 हजार ते 3 लाखापर्यंत मिळतो. तर 40-50 HP क्षमतेचा ट्रॅक्टर 5 लाख 50 हजार रुपये ते सात लाख रुपयापर्यंत मिळतो. 40 ते 50 HP क्षमतेच्या ट्रॅक्टर्सची देशभरात सर्वात जास्त विक्री होते. सुमारे ३०० तास ट्रॅक्टर चालवल्यानंतर त्याची सर्व्हिसिंग करावी लागते, त्यासाठी सुमारे तीन हजार रुपयापर्यंत खर्च येतो. त्यामुळे शेतकरी ट्रॅक्टर विकत घेण्यास पसंती देत आहेत. स्वत:च्या शेती कामाबरोबरच व्यवसाय करून पैसे कमावता येतात. त्यामुळे ट्रॅक्टर विकत घेण्यास केलेला खर्च यातून निघतो.