Bank Loan Write Off: बुडीत कर्ज निघाल्यामुळे बँकांना मोठा तोटा होता. मागील काही वर्षात उद्योगधंदे आणि व्यवसायांना दिलेलं कर्ज बुडीत निघण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेक वर्ष कर्जाची वसूली झाली नाही तर हे कर्ज बँक आपल्या लेखा पुस्तकातून काढून टाकते. चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत कर्ज ऱ्हाइट ऑफ (निर्लेखित) करण्याचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत वाढले आहे.
आघाडीच्या खासगी आणि सरकारी बँकांनी कोट्यवधींचे कर्ज लेखा पुस्तकातून काढून टाकले आहे. म्हणजेच हे कर्ज वसूल होण्याची शक्यता पूर्णपणे मावळली, असे समजले जाते. दरम्यान, कर्ज निर्लेखित केले तरीही वसुलीसाठीचे प्रयत्न सुरूच असतात. मात्र, त्यात बँकांना जास्त यश येताना दिसत नाही. बँकांच्या ताळेबंदातून कर्ज काढून काढणं म्हणजे वसुलीचे सर्व पर्याय संपल्याचं समजल जातं. कोरोना महामारीपासून कर्ज बुडीत निघण्याचे प्रमाण वाढले आहे.
देशातील आघाडीच्या बँकांनी मागील वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहित जास्त कर्ज लेखा पुस्तकातून काढून टाकली. नुकतेच काही बड्या बँकांनी तिमाही निकाल जाहीर केले. त्यामधून कर्ज निर्लेखित केल्याची माहिती समोर आली.
कोणत्या बँकांचा समावेश?
एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, युनियन बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडसंड बँक आणि कॅनरा बँकेने कोट्यवधींचे बुडीत कर्ज लेखा पुस्तकातून काढून टाकले. कर्जदारांकडून वसुली होण्याची कोणतीही शक्यता बँकांना जेव्हा वाटत नाही, तेव्हा लोन ऱ्हाइट ऑफ (निर्लेखित) करण्याची प्रक्रिया बँकांकडून राबवली जाते.
किती कर्ज ऱ्हाइट ऑफ केले?
देशातील सर्वात मोठी खासगी बँक HDFC ने जुलै-सप्टेंबर तिमाहीत 3250 कोटींचे कर्ज निर्लेखित केले. मागील वर्षी याच कालावधीत हा आकडा 3,000 कोटी होता. आयसीआयसीआय बँकेनेही चालू वर्षी 1,922 कोटींचे कर्ज निर्लेखित केले. मागील वर्षी हे कर्ज फक्त 1,103 कोटी इतके होते. तर अॅक्सिस बँकेने 2,671 कोटींचे कर्ज निर्लेखित केले. मागील वर्षी 1700 कोटींचे कर्ज लेखा बुकातून पुसून टाकले होते. पंजाब आणि कॅनरा या सरकारी बँकांनाही कोट्यवधींचे कर्ज काढून टाकले.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकेडवारीनुसार, 2023 आर्थिक वर्षात बँकांनी 2.09 लाख कोटींचे कर्ज निर्लेखित केले. तर मागील पाच वर्षात 10.57 लाख कोटींचे कर्ज लेखा पुस्तकातून हटवले. बुडीत कर्जामुळे बँकांचा नफा कमी होऊन बँक अडचणीत येण्याची शक्यता वाढते.