माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना भक्कम पगार मिळतो. त्याचप्रमाणे या कंपन्यांचे बॉस देखील वर्षाला कोट्यवधींचे पॅकेज घेतात. भारतातील प्रमुख आयटी कंपन्यांमधील सीईओंना वर्षाला 20 ते 80 कोटींचे पॅकेज आहे. या श्रेणीत विप्रो कंपनीचे सीईओ थेअरी डेलापोर्ट असून त्यांचे वार्षिक पॅकेज 82 कोटींचे आहे.
मागील वर्ष आयटी कंपन्यांसाठी संघर्षाचे गेले. यामुळे विप्रो, एचसीएल टेक, इन्फोसिस या शेअर्समध्ये घसरण झाली. मात्र काही कंपन्यांनी कर्मचारी आणि टॉप मॅनेजमेंटला वेतनवाढ दिली. तर काही कंपन्यांनी सीईओंचे वेतन कमी केले. या कंपन्यांच्या टॉप बॉस किंवा सीईओंचा विचार केला तर त्यांना जबरदस्त पॅकेज आहे.
सर्वाधिक सॅलरी पॅकेज घेणाऱ्या सीईओंमध्ये विप्रोचे थेअरी डेलापोर्ट अव्वल स्थानी आहेत. डेलापोर्ट यांना वार्षिक 10 मिलियन डॉलर्स (भारतीय चलनात 82 कोटी 20 लाख रुपये) इतके भक्कम पॅकेज आहे. इतर आयटी कंपन्यांच्या तुलनेत हे सर्वाधिक पॅकेज आहे.
आर्थिक वर्ष 2023 मध्ये सर्वाधिक पॅकेज घेणारे डेलापोर्ट हे भारतीय आयटी कंपन्यांमधील अव्वल सीईओ ठरले आहेत.एचसीएल टेक या कंपनीचे सीईओ सी. विजय कुमार यांचे वार्षिक सॅलरी पॅकेज 28 कोटी 40 लाख रुपये इतके आहे. इन्फोसिस या कंपनीचे सीईओ सलील पारेख यांचे वार्षिक पॅकेज 56 कोटी 40 लाख इतके आहेत.
पारेख यांच्या वेतनात यंदा 21% कपात करण्यात आली आहे. हायपेड सीईओंच्या यादीत टीसीएसचे माजी सीईओ राजेश गोपीनाथन यांचाही समावेश आहे. गोपीनाथन यांचे आर्थिक वर्ष 2022-23 साठी वार्षिक पॅकज 29 कोटी इतके आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या तुलनेत यात 13% वाढ झाली होती.
आयटी कंपन्यांची सुमार कामगिरी, शेअर्समध्ये घसरण
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मंदीची झळ भारतीय कंपन्यांना बसली आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये आयटी सर्वच प्रमुख आयटी कंपन्यांची कामगिरी निराशाजनक राहीली. यामुळे शेअर्सवर परिणाम झाला. विप्रोचा शेअर सर्वाधिक 38% ने घसरला आहे. इन्फोसिसचा शेअर 25% पर्यंत घसरला. टाटा ग्रुपमधील टीसीएसचा शेअर 14% ने घसरला असून एचसीएल टेकचा शेअर 6% ने घसरला आहे. रशिया-युक्रेन युद्ध आणि महागाईमुळे पुढील वर्षभरासाठी या कंपन्यांनी महसुली कामगिरी कमी राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.