सुझुकीच्या बलेनो, ग्रँड विटारा सारख्या प्रीमियम कारची विक्री करणारा नेक्सा (NEXA) हा भारतातील चौथा सर्वात मोठा कार ब्रँड बनला आहे. 2024 मध्ये नेक्सा भारताच्या कार बाजाराचे चित्र बदलू शकते असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सुझुकीच्या प्रीमियम कार्सचा विक्री करणारा स्वतंत्र ब्रँड नेक्सा'चा मारुतीच्या एकूण विक्रीत 22.5 इतका वाटा आहे. भारतात विक्री झालेल्या एकूण कार्सपैकी 10% कार्सची विक्री नेक्साने केली आहे. तसेच, भारतातील SUV वाहनांच्या विक्रीत नेक्सा'चा 17% वाटा आहे. कार विक्रीच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, सुझुकीच्या नेक्साने आर्थिक वर्ष 2022 मध्ये 2.55 लाख कार्सची विक्री केली आहे.
कार विक्रीत लक्षणीय वाढीची अपेक्षा
आर्थिक वर्ष 2023 मध्ये सुझुकीच्या नेक्साने 3.7 लाख कार्सची आतापर्यंत विक्री केली आहे. तसेच, आर्थिक वर्ष 2024 मध्ये, सुझुकीच्या नेक्सा'च्या 6 लाख कार्सची विक्री होईल अशी अपेक्षा कंपनीला आहे. मागील वर्षाच्या तुलनेने 2022 ते 2023 या आर्थिक वर्षात नेक्सा'ने 45 टक्के अधिक कार विकल्या आहेत. पुढील आर्थिक वर्षात 62% अधिक गाड्या विक्री करण्याचे कंपनीचे घ्येय आहे. यानंतर नेक्सा ह्युंदाई आणि टाटा मोटर्सला मागे टाकून पुढे जाऊ शकते असा कंपनीला विश्वास आहे.
NEXA'च्या ‘या’ मॉडेल्सना ग्राहकांची पसंती
नेक्सा'च्या 4 कार मॉडेल्सला ग्राहकांची पसंती मिळाली आहे. यात बलेनो, ग्रँड विटारा, फ्रॉक्स आणि जिमनी यांचा समावेश आहे. सुझुकीच्या बलेनोचा समावेश नेक्सा'च्या टॉप सेलिंग कारमध्ये झाला आहे. वॅगनआर नंतर बलेनो ही सुझुकीची सर्वाधिक विक्री झालेली कार आहे. सप्टेंबर 2022 मध्ये लाँच झालेल्या सुजुकीच्या ग्रँड विटारा या मॉडेलच्या 42000 गाड्यांची आतापर्यंत विक्री झाली आहे. आता ह्युंदाईच्या व्हेन्यूच्या स्पर्धेत मारुती कंपनीची फ्रॉक्स उतरणार आहे. ही कार Kia Sonet, Hyundai Venue आणि Mahindra च्या XUV300 या गाड्यांशी स्पर्धा करेल. महिंद्रा थारला टक्कर देण्यासाठी मारुतीने मसल कार जिमीनी लाँच केली आहे, अल्पावधीतच या गाडीची क्रेझ वाढली आहे. या सर्व उत्पादनांच्या माध्यमातून पुढील आर्थिक वर्षात Nexa ह्युंदाई आणि टाटा मोटर्सशी स्पर्धा करेल अशी अपेक्षा आहे.