केंद्र सरकारकडून नुकतेच गॅस सिलिंडरच्या किमती 200 रुपयांनी स्वस्त करून गृहिणींना रक्षा बंधनाची भेट देण्यात आली. परंतु, दुसरीकडे ऐन सणासुदीच्या काळात डाळीच्या भावांनी उसळी घेतल्याने गृहिणींचे बजेट सुधारण्याची काही चिन्ह दिसत नाहीत. राज्यात सध्या डाळींच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून तूर डाळीचे दर (Tur Dal Price) प्रति किलो 175 रुपयांवर पोहोचले आहेत. तर इतरही डाळीच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. डाळीच्या उत्पादनात घट होत असल्याने डाळीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
उत्पादनात घट झाल्याने भाव वाढ
गतवर्षी अवकाळी पावसामुळे खरीप हंगामात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परिणामी डाळींच्या उत्पादनात घट झाली होती. यंदाही मान्सूनचे आगमन उशिरा झाले. त्यानंतरही पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे पिके करपू लागली आहेत. त्यामुळे कडधान्याचे उत्पादन घटणार आहे. परिणामी डाळींसह इतर शेतमालांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. राज्यातील बाजारपेठेत डाळींची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून डाळीसाठी प्रसिद्ध असेलल्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चढ्या भावाने तुर खरेदी होत आहे. क्विटलसाठी 12000 रुपये इतका भावाने तूर खरेदी केली जात आहे. परिणामी आगामी काळातही तूर डाळीच्या दरामध्ये आणखी वाढ होण्याच शक्यता आहे.
तुरीसह इतर डाळींच्या किमतीत वाढ
मागील महिनाभरात तुर, हरभरा, मसूर, मुग या डाळींच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. महिनाभरापूर्वी तुर डाळीचे दर 120-ते 130 च्या दरम्यान होते. मात्र ऑगस्ट अखेरी तुर डाळीच्या दरामध्ये आणखी वाढ झाल्याने किरकोळ बाजारात तुर डाळीचे दर (Tur Dal Price) हे प्रति किलोला 160 ते 175 वर पोहोचले आहेत. त्याच प्रमाणे हरभरा डाळीच्या दरातही वाढ झाली असून प्रति किलोला 60 ते 70 मोजावे लागत आहेत. तसेच मूग डाळीला 110, उडदाच्या डाळीसाठी 110 ते 120 प्रति किलो रुपये मोजावे लागत आहेत. ऐन सणासुदीत तुरडाळीचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट पुन्हा एकदा कोलमडणार आहे.
12 लाख टन डाळीची आयात सुरू
तुरीच्या उत्पादनात घट झाल्याने डाळीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येते आहे. मात्र, तुरीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने जून महिन्यामध्ये यंदा 12 लाख टन डाळ आयात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी सरकारकडून म्यानमार आणि पूर्व आफ्रिकन देशांमधून 6 लाख टन तूर आयात करण्यात आली आहे. मात्र, ऐण सणासुदीच्या काळात तुर डाळीच्या दराने उसळी घेतली आहे.