अगदी काही दिवसांपूर्वी टॉमेटोने आपले रंग दाखवले होते. किरकोळ बाजारात टॉमेटो थेट दोनशे रुपये पार गेला होता. टॉमेटोचे चढे भाव शेतकऱ्यांना टॉमेटोची शेती करण्यासाठी प्रेरित करत होते. शेतकऱ्यांनीही अगदी आनंदाने शेतीत टॉमेटो लावले. मात्र मागणीपेक्षा जास्त पुरवठा आला आणि सहाजिकच त्याचा परिणाम म्हणजे टॉमेटोचे चढे भाव एका झटक्यात खाली आले. दोनशे रुपयांना विकला जाणारा टॉमेटो आज मात्र तीन ते पाच रुपये किलोने विकला जाऊ लागला. हे पाहून शेतकऱ्याचं अवसानच गळलं आहे. मोठ्या नफ्याची स्वप्न पाहाणारा शेतकरी आता मात्र टॉमेटोला मिळणाऱ्या भावाने हवालदिल झाला आहे.
शेतकऱ्यांकडे शेतातच पीक नष्ट करण्यावाचून पर्याय उरला नाही
टॉमेटोचे पडलेले भाव आता शेतकऱ्यांना आपल्या शेतात उभी असणारी पीकं नष्ट करायला भाग पाडत आहेत. यामागचं कारण स्पष्ट करताना नाशिकचे किंवा पुण्याचे शेतकरी आपलं म्हणणं मांडत आहेत. शेतकऱ्यांच्या मते एका एकरात टॉमेटोचं पीक घ्यायला साधारणपणे दोन लाख रुपयांची गरज असते. ज्या शेतकऱ्यांनी सध्याच्या परिस्थितीत मिळेल त्या भावात टॉमेटो विकला त्यांच्या एका एकरातल्या किमतीचे अर्धे पैसेही त्यांना मिळाले नाहीत. मग जर एका एकरात एक लाख रुपये खर्च करून टॉमेटोचं पीक घ्यायचं आणि त्याला व्यापाऱ्यांकडून ५० हजार रुपयेही मिळत नसतील तर ही शेती नष्ट करण्यावाचून शेतकऱ्यासमोर अन्य कोणताही पर्याय राहिला नाही, असं हे शेतकरी सांगत आहेत.
काय सांगतायत काही दिवसांपूर्वीचे आणि आजचे भाव?
पुण्याच्या घाऊक बाजारात आज टॉमेटो 5 रुपये किलोने विकला जात आहे. नाशिकच्या पिंपळगाव आणि लासलगावात तीन घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांपूर्वी 20 किलोच्या एका क्रेटमागे 2,000 (दोन हजार रुपये) शेतकऱ्याला मिळत होते तिथेच, आज मात्र 20 किलोच्या एका क्रेटचा भाव थेट 90 (नव्वद रुपये) रुपयांवर आला आहे.
कोल्हापूरच्या किरकोळ बाजारात टॉमेटो 2 ते 3 रुपये किलोने विकला जात आहे. एक महिन्यांपूर्वी इथं 220 (दोनशे वीस) रुपये किलोने टॉमेटो विकला जात होता. किरकोळ बाजारात टॉमेटोला येणारा कमी भाव पाहात अनेक शेतकऱ्यांनी टॉमेटोची लागवड बंद केली होती. पुणे, कोल्हापूर,नाशिक आणि सोलापूर इथं अनेक शेतकऱ्यांनी बाजारात जाऊन टॉमेटो विकण्यापेक्षा शेतातच त्यांच्यावर ट्रॅक्टर चालवणं पसंत केलं आहे. शेतीतून बाजारात पोहोचण्यास जितका खर्च लागतो त्यापेक्षा कमी भावात टॉमेटो विकला जात असेल तर नाईलाजाने हे पाऊल उचलावं लागत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.