• 27 Mar, 2023 05:32

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tatkal Ticket Booking: शेवटच्या क्षणी रेल्वे तिकीट बुक करताय; या गोष्टी लक्षात ठेवा!

How to Do Tatkal Ticket Booking

Tatkal Ticket Booking: रेल्वे हा भारतातील सर्वांत स्वस्त आणि मस्त प्रवास मानला जातो. भारतीय रेल्वेने संपूर्ण भारतभर चांगले जाळे निर्माण केले आहे. तसेच चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे बरेच प्रवासी रेल्वेने प्रवास करण्याला प्राधान्य देतात.पण त्यासाठी रेल्वेचे कन्फर्म तिकिट मिळत नाही. यासाठी तिकीट बुक करताना काही टीप्स लक्षात ठेवा आणि तुमचा प्रवास सुखमय करा.

Tatkal Ticket Booking: सध्या शिमग्यानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या बरीच आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच शिमगा आणि गावच्या पालखीला हजेरी लावणारे चाकरमानी पालखीच्या तारखेचा अंदाज घेऊन रेल्वेचे तिकिट बुक करतात. पण ज्यांना वेळेत तिकिट बुकिंग करता येत नाही. त्यांची मात्र पंचायत होते. यातील काही जण प्रायव्हेट ट्रॅव्हल बस किंवा खाजगी गाड्यांचा वापर करतात. पण नेमक्या अशाचवेळी प्रायव्हेट ट्रॅव्हल बसवाले तिकिटांची किंमत वाढवतात. तसेच गाडीने प्रवास केल्यामुळे वेळही अधिक जातो आणि प्रवासात त्रासही होतो. त्यामुळे पालखीला गावाला जाणे ही एक चाकरमान्यांसाठी खर्चिक बाब बनते. अशावेळी रेल्वेचा तात्काळ बुकिंग (Tatkal Train Booking) हा एक चांगला पर्याय आहे. ज्या प्रवाशांना अर्जंट बेसिसवर ट्रेनने प्रवास करायचा आहे; अशा प्रवाशांसाठी तात्काळ ट्रेन बुकिंगची सोय खुपच फायदेशीर ठरू शकतो. तर आज आपण तात्काळ ट्रेन बुकिंगबद्दलची सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

शेवटच्या क्षणाला तुम्ही एखादी ट्रीप प्लॅन केली आहे किंवा अचानक घरात देवदर्शन किंवा इतर काही कारणांमुळे गावाला जाण्याचे नियोजन करत आहात. पण गावी जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट उपलब्ध नाही. तरी काळजी नसावी. कारण रेल्वे प्रशासनाने अशा प्रवाशांसाठी शेवटच्या क्षणाला तिकिट बुक करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही उद्या प्रवास करणार असाल तर आज तुम्हाला तात्काल ट्रेन तिकिट बुकिंगची मदत घेऊन तिकीट बुक करता येऊ शकते. (Guide to Book Train Ticket)

तात्काळ बुकिंगद्वारे कोणती तिकिटे बुक करता येतात?

तात्काळ बुकिंगद्वारे  रेल्वे प्रशासनाने सर्व प्रकारची तिकिटे बुक करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. याद्वारे तुम्ही शेवटच्या क्षणी स्लीपर क्लासपासून 3AC, 2AC किंवा 1AC ची तिकिटे सुद्धा बुक करू शकता. पण यामध्ये लिमिटेड तिकिटे उपलब्ध असतात. त्यामुळे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या नियमानुसार तिकिटांचे बुकिंग होते.

तात्काळ तिकिटे बुक करण्याची स्पेसिफिक वेळ आहे का?

तात्काळ तिकिटांचे बुकिंग प्रवासाच्या एक दिवस अगोदर रेल्वे प्रशासन सुरू करते. जसे की, तुम्ही जर मुंबईहून सिंधुदूर्गला जाणार आहात. तर प्रवासाच्या एक दिवस अगोदर तात्काळ रेल्वेचे बुकिंग सुरू होते. तसेच तुम्ही जर AC (3A/2A/CC/EC/3E) क्लासची तिकिटे बुक करणार असाल तर, त्याची वेळ सकाळी 10.00 वाजता सुरू होते. त्याचप्रमाणे नॉर्मल क्लासची तिकिटे जसे की, स्लीपर, सेकंड चेअर आदींची तात्काळ तिकिटे बुक करण्याची वेळ सकाळी 11.00 वाजता सुरू होते.  

तात्काळ तिकिटांची किंमत काय असते?

रेल्वे प्रशासनाने तात्काळ तिकिटांची सोय उपलब्ध करून देताना त्यावर अधिक पैसे आकारण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे तुमच्या नियमित प्रवासाचे तिकीट 900 रुपयांचे असेल. तर तेच तिकिट तुम्हाला तात्काळ बुकिंगमध्ये 1300 रुपयांना मिळेल.  रेल्वे प्रशासनाकडून सेकंड क्लासची तिकिटे वगळता इतर सर्व प्रकारच्या तिकिटांवर 30 टक्के अधिक दर आकारला जातो. तर सिटिंग सेकंड क्लासच्या तिकिटांवर 10 टक्के अधिक दर आकारला जातो.

तात्काळ रेल्वे तिकिटे कशी बुक करायची?

 • रेल्वेच्या या irctc.co.in या वेबसाईटला भेट द्या
 • irctc च्या वेबसाईटवर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
 • वेबसाईटवर लॉगिन केल्यानंतर 'Book Ticket'यावर क्लिक करा.
 • बुक तिकिटमध्ये गेल्यानंतर तिथे तात्काळ बुकिंगशी संबंधित माहिती भरा.
 • तुम्ही ज्या ट्रेनने प्रवास करणार आहात; त्या ट्रेनचे नाव, क्रमांक आणि क्लास निवडा.
 • त्यानंतर प्रवाशांची माहिती भरा. इथे तुम्ही तुमच्या पसंतीनुसार बर्थची निवड करू शकता.
 • त्यानंतर तिकिटाचे भाडे, इतर माहिती भरा आणि 'Proceed to Payment' या क्लिक करा.
 • तुम्ही क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/नेट बॅंकिंग, युपीआय किंवा इतर वेगवेगळ्या पर्यायांद्वारे पेमेंट करू शकता.
 • पैसे भरल्यानंतर तुमचे तिकिट बुक होते. बुक झालेल्या तिकिटाची तुम्ही प्रिंट काढू शकता.


IRCTC ॲपपद्वारे तात्काळ तिकिट कसे बुक करायचे?

 • सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये IRCTC App इन्स्टॉल करा.
 • अॅप ओपन करून, लॉग-इन करून तुमच्या नावाने IRCTCचे खाते तयार करा.
 • खाते ओपन केल्यानंतर त्यातून Tatkal Booking हा पर्याय निवडा.
 • प्रवास करणाऱ्या ट्रेनची आणि प्रवासाची माहिती भरा.
 • प्रवास करणाऱ्या प्रवाशांची नावे टाका.
 • तिकिटांची किंमत पडताळून त्याचे विविध पर्यायांद्वारे पेमेंट करा.
 • सर्वांत शेवटी तुमचे पेमेंट स्टेटस चेक करा आणि कन्फर्म बुक झालेले तिकिट डाऊनलोड करा.