एखादा व्यक्ती किती वर्ष जगेल किंवा कोणाचा कधी मृत्यू होईल हे कोणीही सांगू शकत नाही. आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अनिश्चतता असतात. आपला जर अचानक मृत्यू झाला तर कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी तुम्ही टर्म इन्शुरन्स घ्याल. मात्र, किती वर्षांचे कव्हर असलेली टर्म पॉलिसी काढू, असा प्रश्न तुम्हाला पडेल. आरोग्य विम्याबरोबरच तुमच्या अनुपस्थितीत कुटुंबाला आर्थिकदृष्या सुरक्षित करण्यासाठी टर्म इन्शुरन्स म्हणजेच जीवन विमा अत्यंत गरजेचा आहे. या पॉलिसीद्वारे तुमच्या मृत्यूनंतर नॉमिनीला एक मोठी रक्कम मिळू शकते. जी त्यांच्या आर्थिक गरजा भागवू शकेल.
टर्म इन्शुरन्सद्वारे तुम्हाला कमी प्रिमियमध्ये मोठ्या रकमेचे संरक्षण मिळू शकते. तुमचे वय जर 25 ते 30 वर्षांच्या दरम्यान असेल तर तुम्हाला सुमारे 1 कोटीपर्यंतची टर्म पॉलिसी अंदाजे 12 ते 15 हजारांच्या वार्षिक प्रिमियममध्ये मिळू शकते. तुम्ही जर क्रिटिकल इलनेस, अपघात यांसारखे रायडर जर पॉलिसीमध्ये घेत असाल तर सहाजिकच प्रिमियमसुद्धा जास्त येईल. प्रत्येक कंपनीचा प्रिमियम हा वेगवेगळा असतो.
टर्म इन्शुरन्स पॉलिसीचे संरक्षण किती वर्षांपर्यंत ठेवावे?
टर्म पॉलिसी घेत असताना तुम्हाला किती वर्षांचे संरक्षण हवे आहे हे निवडावे लागते. कारण, पॉलिसीचा कार्यकाळ संपल्यानंतर विमा कंपनी एकही रुपया देणार नाही. पॉलिसीची कालमर्यादा विचारात घेताना अनेक गोष्टी पाहाव्या लागतात. जसे की, तुमच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या, आरोग्याची स्थिती, कुटुंबातील सदस्य, मुलांचे वय आणि इतरही जबाबदाऱ्या.
हे आपण उदाहरणाच्या साहाय्याने समजून घेऊ, समजा तुम्ही 30 वर्षांचे आहात. तुम्ही विवाहित असून तुम्हाला 4 वर्षांचा मुलगा किंवा मुलगी आहे. कुटुंबाच्या सुरक्षेसाठी तुम्हाला टर्म इन्शुरन्स घ्यायचा आहे. तर तुम्ही किती वर्षांपर्यंत कव्हर घ्याल. तुम्ही 70 वर्ष वय होईपर्यंत टर्म इन्शुरन्सचा कव्हर घेतला तर तोपर्यंत तुमचा मुलगा किंवा मुलगी स्वत:च्या पायावर उभी राहीलेली असेल. तुमच्या जबाबदाऱ्याही कमी झालेल्या असतील. त्यामुळे या पुढील काळात तुम्हाला टर्म पॉलिसीची गरज नसू शकते. अशा परिस्थिती 90 वर्षांचा कव्हर घेणे चुकीचे ठरू शकते. वरती म्हटल्याप्रमाणे भविष्यामध्ये काय होईल हे आपण निश्चित सांगू शकत नाही. मात्र, प्रत्येकाच्या परिस्थितीवरून अंदाज बांधू शकतो. जर तुम्ही 90 वर्षांचे होईपर्यंतचा कव्हर घेतला तर तुम्हाला प्रिमियमही जास्त भरावा लागेल.
जास्त कव्हरसाठी जास्त प्रिमियम
जेवढा जास्त वर्षांसाठी तुम्ही कव्हर घ्याल तेवढा जास्त प्रिमियम तुम्हाला द्यावा लागेल. जसे तुमचे वय वाढत जाते तसे जोखीम वाढत जाते. 60 वयाच्या आधी एखाद्याचा मृत्यू होण्याची शक्यता कमी असते. मात्र, 65, 70 किंवा 75 वर्षांनंतर ही शक्यता वाढत जाते. मात्र, तोपर्यंत तुमच्यावरील जबाबदाऱ्याही संपलेल्या असतील. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक स्थिती पाहून निर्णय घ्यावा. उगाचच आपला मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाला पैसे मिळतील या अपेक्षेपोटी जास्त वर्षांचा विमा घेऊ नये. किंवा प्रिमियमचे पैसे वाया जाण्याऐवजी मुलांना मृत्यूनंतर पैसे मिळतील, हा विचार चुकीचा ठरतो. कारण, गरज नसताना जास्त वर्षांचा कव्हर घेऊन तुम्हाला आज जास्त प्रिमियम भरावा लागेल. हा अंदाज बांधुन आज जास्त प्रमियम भराल. तुमच्या पश्चात कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, हा टर्म इन्शुरन्सचा उद्देश आहे.