गौरीगणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. अनेक चाकरमानी खासगी ट्रॅ्व्हल्सने प्रवास करतात. मात्र, याकाळात खासगी ट्रॅव्हल्सकडून जादा तिकीट दराची आकारणी करून प्रवाशांची लूट केली जाते. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईच्या आरटीओ (RTO) विभागाने खबरदारी घेतली आहे. आरटीओकडून कोकणात जाणाऱ्या खासगी ट्रॅ्व्हल्ससाठीचे तिकीट दर (Travel fare)निश्चित केले आहेत. त्यामुळे चाकरमान्यांच्या होणाऱ्या लुटीला लगाम लागणार आहे.
जादा भाडे आकारणीस चाप
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी प्रशासनाकडून प्रवासाच्या दृष्टीने प्रतिवर्षी योग्य सोय उपलब्ध करून दिली जाते. जादा एसटी बसेस, विशेष रेल्वे गाड्यांची सोय करण्यात आली आहे. मात्र, सर्वांनाच रेल्वे अथवा एसटीने प्रवास करणे शक्य होत नाही. काही गणेश भक्त खासगी वाहनाने गावाकडे जातात. मात्र, सणासुदीचा आणि गर्दीचा हंगाम पाहून खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून प्रवाशांकडून जादा दराने तिकीटाची आकारणी करून लूट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला चाप लावण्यासाठी नवी मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नवी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या 22 मार्गावरील तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत.
वाशीतून 22 मार्गावरील तिकीट दर निश्चित
खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून गणेशोत्सवाच्या काळात 1500 ते 2000 रुपयांपर्यंत तिकीटाची आकारणी केली जाते. त्यामुळे आता नवी मुंबई परिवहन विभागाने वाशीतून कोकणात विविध ठिकाणी जाणाऱ्या बसेससाठी भाडे दर निश्चित केले आहे. त्यामध्ये किमान भाडे हे 428 रुपये असून कमाल भाडेदर हा 1260 इतका निश्चित करण्यात आला आहे. वाशी ते महाड 428, वाशी चिपळून 623 रुपये, वाशी संगमेश्वर 728 , तसेच देवगड साठी 1185 रुपये, विजयदुर्गसाठी 1200 रुपये,सावंतवाडीसाठी 1260, गणपतीपुळे 975, कणकवली 1110 रुपये असे तिकीट दर आकारण्यात येणार आहेत. दरम्यान, गणेशोत्सव काळात ट्रॅ्व्हलच्या तिकीटाचे दर अचानक भेटी देऊन तपासले जाणार असल्याची माहिती नवी मुंबईच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली आहे.