Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI पतधोरणापूर्वीच कर्जदारांना झटका, तीन बँकांसह हाऊसिंग फायनान्स कंपनीचे कर्ज महागले

Bank Hike MCLR

रिझर्व्ह बँक शुक्रवारी 5 ऑगस्ट 2022 रोजी पतधोरण जाहीर करेल. मात्र पतधोरणापूर्वीच तीन बँका आणि एक हाऊसिंग फायनान्स कंपनीनं आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी कर्जाचा व्याजदर वाढवून कर्जदारांना जोरदार झटका दिला. व्याजदर वाढल्याने कर्ज फेडीचा मासिक हप्ता (EMI) वाढेल. त्याचबरोबर सर्वच प्रकारची कर्जे महाग होतील.

देशात वाढणारी महागाई आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा एकदा रेपो दरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. येत्या शुक्रवारी 5 ऑगस्ट 2022 रोजी 'आरबीआय' पतधोरण जाहीर करेल. ज्यात रेपो दरात किमान 0.50% वाढ होण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. यापार्श्वभूमीवर बँकांनी कर्जदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. आज बँक ऑफ इंडिया, पीएनबी बँक, आयसीआयसीआय बँक तसेच एचडीएफसी यांनी कर्जदरात वाढ केली. 1 ऑगस्ट 2022 पासून या बँकांची कर्जे महागली आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने सर्व मुदतीतील कर्जदर (MCLR) 0.10% वाढवला आहे. पीएनबी बँकेनं देखील MCLR मध्ये  0.10% वाढ केली आणि आयसीआयसी बँकेनं  व्याजदर 0.15% वाढवला. एचडीएफसीने कर्जदरात तब्बल 0.25% वाढ केली.


बँक ऑफ इंडियाचा कर्जदर (MCLR) 0.10% वाढला आहे. एका दिवसासाठीचा MCLR आता 6.80% झाला आहे. एक महिन्यासाठी तो 7.30% आणि 1 वर्षांसाठी तो 7.60% असेल. 3 वर्षांसाठी तो 7.80% कर्जदर असेल, असे बँकेनं म्हटलं आहे. ज्यामुळे वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज आणि वाहन कर्जाचे दर वाढले आहेत. 

सार्वजनिक क्षेत्रातील आणखी एक मोठी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेनं (PNB) देखील आज कर्जदरात 0.10% वाढ केली आहे. या व्याजदर वाढीनंतर एक दिवसासाठीचा एमसीएलआर दर 7.00% झाला आहे. एक वर्षासाठी तो 7.65% आणि तीन वर्षांसाठी तो 7.95% इतका वाढला आहे. यामुळे कर्जदारांना EMI साठी देखील जादा पैशांची तजवीज करावी लागणार आहे.

खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेनं MCLR दरात 0.15% वाढ केली आहे. (ICICI Bank Hike MCLR by 15 Basis Point) या दरवाढीमुळे बँकेचा एक वर्षांचा MCLR  व्याजदर 7.90% झाला आहे. एक दिवसाकरिता कर्जाचा दर 7.50% वरुन तो 7.65% झाला आहे. गेल्याच महिन्यात 1 जुलै 2022 रोजी आयसीआयसीआय बँकेनं कर्जदरात 0.20% वाढ केली होती.  

HDFCने पाचव्यांदा कर्जदर वाढवला. 

पतधोरणापूर्वीच एचडीएफसी या खासगी हाऊसिंग फायनान्स कंपनीनं कर्जदारांना दणका दिला. आजपासून एचडीएफसीचे कर्ज 0.25% महागले. यामुळे विद्यमान कर्जदाते आणि नवीन कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना एचडीएफसीचे गृह कर्ज जादा व्याजदराने घ्यावे लागेल.आजच्या व्याजदर वाढीनंतर एचडीएफसीचा कर्जाचा दर 7.80% ते 8.30% या दरम्यान झाला आहे. विशेष म्हणजे मागील दोन महिन्यांत तब्बल पाचव्यांदा कर्जाचा दर वाढवला.