भारतीय अब्जाधीस रवी रुईया यांनी लंडनमध्ये अलिशान असे नवीन घर विकत घेतले आहे. लंडनमधील हे सर्वांत महागडे घर म्हणून ओळखले जाते. रुईया यांनी हे घर 145 मिलिअन डॉलर म्हणजेच तब्बल 1200 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
भारतीयांसाठी लंडन हे दुसरे माहेर आहे, असे म्हटले जाते. भारतावर इंग्रजांचे राज्य होते तेव्हापासून भारतीय इंग्लंड आणि लंडनच्या प्रेमात आहेत. भारतातील अनेक व्यावसायिकांची इतर देशांबरोबरच लंडनमध्येही घरे आहेत. त्यात आता रवी रुईया याचा देखील समावेश झाला आहे.
रुईया यांनी विकत घेतलेले घर हे लंडनमधील रिजेंट पार्क येथे असून त्याचे नाव हॅनोवर लॉज असे आहे. ही प्रॉपर्टी 19 व्या शतकातील असून ही लंडनमधील सर्वांत महागड्या प्रॉपर्टीमध्ये याची गणना होते. रुईया यांनी हे घर रशियन अब्जाधीस आंद्रेई गोन्चारेन्को यांच्याकडून 120 मिलिअन युरोला विकत घेतले आहे. आंद्रेई यांच्यापूर्वी या घराची मालकी राजकुमारी बागरी यांच्याकडे होती.
रुईया यांनी विकत घेतलेल्या या घराची डागडुजी सुरू आहे. त्यामुळे हे घर योग्य किमतीत मिळाले असून त्याची खरेदी रुईया फॅमिली ऑफिसद्वारे केली आहे आणि ही रुईया फॅमिली ऑफिससाठी एक चांगली डील असल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले आहे.
या भारतीयांची आहेत लंडनमध्ये घरे!
आपल्याकडे अॅक्टर्स आणि क्रिकेटर्स हे सर्वांत मोठे सेलेब्रिटी मानले जातात आणि यातील बहुतेक जणांची लंडनमध्ये घरे आहेत. यामध्ये शाहरूख खान, शिल्पा शेट्टी, सोनम कपूर, काजोल या सिनेस्टार्सचा समावेश आहे. तर क्रिकेटशी संबंधित असलेला आयपीएलचा माजी अध्यक्ष ललित मोदी याची लंडनमध्ये मोठी हवेली आहे. तसेच भारताचा माजी क्रिकेटपट्टू सौरभ गांगुली यानेही नुकतेच लंडनमध्ये घर घेतले आहे.