कंत्राटी कामगारांना अनेकदा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. याचे कारण म्हणेज त्यांना नोकरीची शाश्वती नसते. आज नोकरी आहे तर उद्या नाही अशी ही परिस्थिती. महिन्याला मिळणारा पगार कधी बंद होईल याची खात्री नाही. सरकारी कर्मचाऱ्यांना असलेल्या सोईसुविधा कंत्राटी कामगारांच्या नशिबी नसतात.
नावाप्रमाणेच Contract नुसार रोजगार देणारी कंपनी, संस्था कर्मचाऱ्याशी एक करार करते. त्या करारात लिहिलेल्या नियम व अटींचे पालन कामगाराला करावे लागते. या कामात पगारवाढ देखील कमी असते. आर्थिक उत्पन्नाचे साधन बेभरवशाचे असल्याने अनेकांची आर्थिक परवड होते.
अशाही परिस्थितीत जर आहे त्या पैशाचे नियोजन व्यवस्थित केले, योग्य ठिकाणी ते गुंतवले तर काही प्रमाणात का होईना भविष्याची तजवीज होऊ शकते आणि आर्थिक विवंचना थांबू शकते. असेच काही प्रचलित आणि उपलब्ध पर्याय या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
Table of contents [Show]
मासिक बजेट ठरवून घ्या!
आर्थिक नियोजनातील हा एक अतिशय महत्वाचा टप्पा आहे. तुमचे उत्पन्न आणि खर्चाची रूपरेषा देणारे तपशीलवार बजेट तयार करा. प्रत्येक महिन्याला तुम्ही तुमचे बजेट तयार केले पाहिजे. महिन्यात येणारे सणवार, वाढदिवस, नातेवाइकांचे लग्न, घरगुती समारंभ, प्रवास, आरोग्याच्या समस्या, किराणा, मुलांचे शिक्षण आदींचे नियोजन आणि अपेक्षित खर्च याचा हिशोब ठेवला पाहिजे. तुमचा पैसा नेमका कुठे खर्च होतो हे जाणूनघेण्यास मदत होईल.
आपत्कालीन निधी हवाच
आपत्कालीन निधी तयार करण्यास प्राधान्य द्या. नोकरीची शाश्वती नसल्याने, उद्या काय होईल सांगता येत नाही. अचानक आजार उद्भवल्यास, अडीअडचणीच्या काळात आपत्कालीन निधी कामी येतो. तुमच्या सध्याच्या मासिक पगाराच्या तीनपट किंवा सहापट रक्कम तुमच्याकडे बचत स्वरूपात असायला हवी याची काळजी घ्या.
कर्ज व्यवस्थापन
तुमच्याकडे जास्त व्याजदराची कर्जे (क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज) असल्यास, ते लवकर फेडण्यासाठी नियोजन करा. जास्त व्याजदर असलेली कर्जे लवकर फेडल्याने तुमची दीर्घकालीन बचत होते हे लक्षात ठेवा. याशिवाय अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी पार्ट टाईम जॉब, फ्रीलान्स जॉब करता येतो का याची चाचपणी करा.
हुशारीने गुंतवणूक करा
केवळ बचत खात्यांवर अवलंबून न राहता, तुमचे अतिरिक्त उत्पन्न चांगल्या गुंतवणूक योजनेत गुंतवण्याचा विचार करा. कंत्राटी कामात तुम्हांला सरकारी योजनांचा फायदा मिळत नाही. अशावेळी स्वतःहून पेन्शन योजनेत गुंतवणूक करावी. तसेच म्युच्युअल फंड किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड, मुदत ठेव आवर्ती ठेव या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करा. शेयर मार्केटचे जर ज्ञान असेल आणि जोखीम घेण्याची तयारी असेल तरच गुंतवणूक करा. कंत्राटी कामगारांची आर्थिक जोखीम घेण्याची क्षमता कमी असते हे कायम लक्षात असू द्या.
अल्पकालीन आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे आधीच ठरवून घ्या. यात स्वतःचे घर कधी घ्यायचे, मुलाबाळांना शिक्षणासाठी लागणारा खर्च, गाडी खरेदी करण्यासाठी लागणारा पैसा आदींचे नियोजन आधीच करून ठेवा. आपली आर्थिक उद्दिष्टे आपण आखून ठेवली की खर्चाचा फार भार पडणार नाही.
विमा संरक्षण गरजेचे!
तुमच्याकडे आरोग्य, अपंगत्व आणि जीवन विम्यासह पुरेसे विमा संरक्षण असल्याची खात्री करा. अनपेक्षित घटनांचा गंभीर आर्थिक परिणाम तुमच्या परिवारावर होऊ शकतो हे लक्षात घ्या. कोरोना काळात अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. आरोग्य विमा आणि जीवन विमा नसल्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे कुटुंबाचा आरोग्य विमा, तुमचा स्वतःचा टर्म इन्श्युरन्स असणे गरजेचे आहे. आपल्या पाठीमागे कुटुंबियांचे हाल होऊ नये म्हणून हे काम आठवणीने केले पाहिजे.
लक्षात असू द्या, आर्थिक नियोजन ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तुमच्या आर्थिक परिस्थितीचे नियमितपणे मूल्यांकन करणे गरजेचे आहे. यासाठी कंत्राटी कामगारांनी माहितीपूर्ण निर्णय घ्यायला हवा आणि आपले आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी तुमचे आर्थिक नियोजन केले पाहिजे.