महत्वाची गोष्ट म्हणजे, इन्शुरन्सची भाषा समजायला अवघड असते. त्यामुळे बारीक-सारीक गोष्टी सामान्यांना समजत नाही. पण, जेव्हा त्या गोष्टींविषयी क्लेम करायला जातात. तेव्हा त्यांना नाराज होण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे अशीवेळ कोणावरच येऊ नये. यासाठी आम्ही मेडिक्लेम पाॅलिसीत कोणत्या गोष्टी कव्हर होतात. हे तुम्हाला सांगणार आहोत. तसेच, हेल्थ इन्शुरन्स आणि मेडिक्लेम दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. आपण यावेळी फक्त मेडिक्लेम पाॅलिसीविषयी बघणार आहोत.
मेडिक्लेम पाॅलिसी कशासाठी असते?
मेडिक्लेम पाॅलिसी इन्शुरन्स असलेल्या व्यक्तीला आजार किंवा दुखापतीसाठी हॉस्पिटलायझेशनचा सर्व खर्च कव्हर करते. या पाॅलिसीमध्ये मुख्यता हाॅस्पिटलमध्ये दाखल होण्याचा खर्च, वैद्यकिय उपचार आणि इतर त्याच्याशी संबंधित खर्चाचा समावेश होतो. यासाठी इन्शुरन्स धारकाला इन्शुरन्स कंपनीला प्रीमियमची रक्कम अदा करावी लागते.
मेडिकल इमर्जन्सीच्या वेळी इन्शुरन्स असलेल्या व्यक्तीला कॅश आणि कॅशलेस दोन्हींचा कव्हर दिला जातो. मेडिक्लेम पाॅलिसीमध्ये काही आजारांचा समावेश नसतो. तसेच, पाॅलिसीच्या रकमेची मर्यादाही ठरलेली असते. त्यामुळे पाॅलिसी घेण्यापूर्वी तिच्या अटी वाचून घेणे आवश्यक आहे. त्या सर्व समजल्या तेव्हाच पाॅलिसी घेण्याचा निर्णय घ्या.
मेडिक्लेम पॉलिसीअंतर्गत काय कव्हर नाही?
- कोणत्याही प्रकारची प्लास्टिक सर्जरी, इम्प्लांट किंवा कॉस्मेटिक सुधारणा या गोष्टी पॉलिसीअंतर्गत येत नाहीत.
- जन्मजात आजार किंवा जन्मजात दोषांसाठी होणारा खर्च ही मेडिक्लेमचा भाग नसतो.
- वंध्यत्व आणि इन विट्रो फर्टिलायझेशनशी संबंधित उपचाराच्या खर्चाला मेडिक्लेम मिळत नाही.
- मेडिक्लेम पॉलिसीमध्ये एचपीव्ही (HPV), एचआयव्ही (HIV), सिफलिस (Syphilis) आणि हर्पीस (Herpes) यासारख्या लैंगिक संक्रमित आजारांवर कव्हर दिला जात नाही.
- ज्या आजारांची लक्षणे पॉलिसी सुरू होण्याच्या तारखेच्या सुरुवातीच्या 30 दिवसांच्या आत दिसून येतात ते मेडिक्लेमसाठी पात्र नसतात.
- अमली पदार्थांचा अतिरेक, मद्यपान किंवा आत्महत्येच्या प्रयत्नामुळे स्वत:ला केलेल्या इजा या पाॅलिसीत कव्हर होत नाहीत.
- सिझेरियन ऑपरेशनमधील गुंतागुंतीमुळे गर्भधारणेशी संबंधित काही उपचार पॉलिसीमध्ये कव्हर होत नाहीत.
वरील गोष्टी पाहिल्यानंतर अनावधानाने एखाद्या गोष्टीसाठी पाॅलिसी घेतल्यास आणि तिलाच कव्हर नसल्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे मेहनतीचा पैसा वाया जावा असे वाटत नसल्यास, सर्व गोष्टींची माहिती घेऊनच पाॅलिसी घ्या.