भारतात हिंदी सिनेमा मोठ्या प्रमाणात बघितले जातात. परदेशात देखील हिंदी सिनेमांचा प्रेक्षकवर्ग आहे. अलीकडच्या काळात हिंदी सिनेमांमध्ये वेगवेगळे प्रयोग होत आहेत. तुलनेने कमी खर्चात चांगल्या गुणवत्तेचे साधेसोपे चित्रपट बनवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांत कमी निर्मिती खर्चात बनवले गेलेल्या चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात.
या सिनेमांनी केवळ चांगला व्यवसायच केला नाही तर अनेक पुरस्कार देखील मिळवले आहेत. प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेले काही चित्रपट खालीलप्रमाणे.
Table of contents [Show]
पिपली लाईव्ह (2010)
शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर आधारित हा चित्रपट प्रचंड गाजला. अनुषा रिझवी दिग्दर्शित आणि आमिर खान निर्मित या सिनेमाला प्रेक्षकांनी पसंती दिली. यात ओमकार दास माणिकपुरी, रघुवीर यादव आणि मलायका शिनॉय हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते.
दोन गरीब शेतकरी आत्महत्या करण्याचा प्लॅन बनवतात जेणेकरून आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांना सरकारी मदत मिळेल. गरीब शेतकाऱ्यांची व्यथा, सरकारी अनास्था या विषयावर चित्रपटात भाष्य केले गेले आहे. 10 करोड निर्मिती खर्च असलेल्या या चित्रपटाने 46.89 करोड रुपये गल्ला जमवला होता.
विकी डोनर (2012)
कॅनेडियन चित्रपट 'स्तराबक' वर आधारित हा चित्रपट एक वेगळाच विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. शुक्राणू दान तसेच संतती समस्या या विषयांना घेऊन या चित्रपटाची निर्मिती केली गेली होती. यात आयुष्मान खुराणा, यामी गौतम आणि अन्नू कपूर हे मुख्य भूमिकेत होते.
समीक्षकांनी या चित्रपटाचे विशेष कौतुक केले होते. शुजित सरकार दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती अभिनेता जॉन अब्राहम याने केली होती. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.
5 करोड रुपये निर्मिती खर्च आलेल्या या चित्रपटाने 66.32 कोटींचा व्यवसाय केला होता.
द लंचबॉक्स (2013)
इरफान खान, निम्रत कौर, नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी अभिनय केलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. चित्रपटातील 'इला' हे पात्र पतीसाठी डबा पाठवते आणि चुकून तो डबा दुसऱ्या व्यक्तीला पोहोचतो. टिफिनच्या अदलाबदल झाल्यानंतर गे एकमेकांना पत्र लिहू लागतात आणि त्यांच्यात भावनिक नाते निर्माण होते.
या चित्रपटाचे दिग्दर्शक रितेश बत्रा हे होते तर गुनीत मोंगा, अनुराग कश्यप आणि अरुण रंगाचारी यांनी हे या चित्रपटाचे निर्माते होते. 9 कोटी रुपये खर्च आलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. या चित्रपटाने 100 कोटींचा व्यवसाय केला होता.
क्वीन (2014)
लग्नाच्या आदल्या दिवशी होणारा नवरा लग्नाला नकार देतो. त्यानंतर मुलीची होणारी अवस्था, तिची जिद्द, तिचा प्रवास या चित्रपटातून उलगडला आहे. चित्रपटातील मुख्य पात्र असलेली 'राणी' हनिमूनसाठी एकटीच परदेशात जाते. तिथे तिला आलेले अनुभव तिला जगण्याची उर्मी देतात. कंगना रनौत, राजकुमार राव, लिसा हायडोन हे या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसले होते.
दिग्दर्शक विकास बहल यांचा हा चित्रपट 12 कोटी रुपयांत बनला होता. या सिनेमाने जवळपास 120 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.
हिंदी मिडीयम (2017)
इरफान खान आणि सबा कमर यांनी अभिनय केलेला हा चित्रपट विशेष गाजला. एका जोडप्याला त्यांच्या 3 वर्षीय मुलीला इंग्रजी शाळेत घालायचं असतं. अल्पशिक्षित जोडप्याला मुलीच्या शाळा प्रवेशासाठी आलेल्या अडचणी या सिनेमात चित्रित केल्या गेल्या आहेत. एका सामाजिक विषयावर विनोदी ढंगाने भाष्य करणाऱ्या या सिनेमाला समीक्षकांनी चांगली दाद दिली. 14 करोडचे बजेट असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 322.4 करोड रुपयांचा नफा कमावला होता.
न्यूटन (2017)
भारतीय लोकशाही, सार्वत्रिक निवडणुका आणि राजकारणावर भाष्य करणारा हा सिनेमा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चिला गेला. अमित मसुरकर दिग्दर्शित आणि मनीष मुंदडा निर्मित या सिनेमाने त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला होता. राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अंजली पाटील आणि रघुबीर यादव हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते.
9 कोटी रुपयांचा निर्मिती खर्च असलेल्या या सिनेमाने 82 कोटी रुपये कमावले होते.
शुभमंगल सावधान (2017)
कॉमेडी-ड्रामा असलेल्या या चित्रपटाने एका नाजूक विषयावर भाष्य केले होते. आर. एस. प्रसन्ना दिग्दर्शित आणि आनंद राय, कृषिका लुल्ला, हिमांशू शर्मा आणि एस. शशिकांत निर्मित हा चित्रपट शीघ्रपतनाच्या समस्येवर भाष्य करतो.
सिनेमात आयुष्मान खुराणा, भूमी पेडणेकर हे दोघे प्रमुख भूमिकेत दिसले होते. 25 कोटी निर्मिती खर्च असलेल्या या चित्रपटाने जवळपास 75 कोटींचा गल्ला कमावला होता.
लिपस्टिक अंडर माय बुरखा (2017)
अलंकीता श्रीवास्तव दिग्दर्शित आणि प्रकाश झा निर्मित या स्त्रीप्रधान ब्लॅक कॉमेडी चित्रपटाने महिलांच्या स्वातंत्र्यावर नेमकेपणाने भाष्य केले. या चित्रपटात 4 महिलांचा जीवनप्रवास यांत चित्रित केला गेला आहे.
रत्ना पाठक, कोंकना सेन, अहाना कुमरा आणि प्लबिता बोरठाकूर या महिला कलाकार मुख्य भूमिकेत होत्या. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी 6 कोटी खर्च आला होता. या सिनेमाने 27 कोटींचा व्यापार केला होता.
अंधाधुन ( 2018)
श्रीराम राघवन दिग्दर्शित हा सिनेमा ब्लॅक कॉमेडी आणि गुन्हेगारीशी संबंधित होता. तब्बू, आयुष्मान खुराणा, राधिका आपटे आणि अनिल धवन हे मुख्य कलाकार म्हणून या सिनेमात दिसले होते.
या चित्रपटाने तुफान गर्दी खेचली होती. समीक्षकांनी देखील या चित्रपटाचे कौतुक केले होते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हा सिनेमा मोठ्या प्रमाणात बघितला गेला. केवळ 32 करोड निर्मीती खर्च असलेल्या या सिनेमाने तब्बल 456 कोटींचा व्यवसाय केला. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार या चित्रपटाने चायनामध्ये 335 कोटी कमावले होते.
राझी (2018)
मेघना गुलजार दिग्दर्शित हा सिनेमा हरींदर सिंग सिक्का यांच्या 'कॉलिंग सहमत' या कादंबरीवर आधारित हा सिनेमा प्रचंड गाजला. 1971 साली भारतीय गुप्तहेर म्हणून एका महिलेला पाकिस्तानात पाठवण्यात आलं होतं. तिचे अनुभवकथन करणाऱ्या या सिनेमाचे निर्माते करण जोहर होते.
आलिया भट, विक्की कौशल, जयदीप अहलावत, रजित कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत सिनेमात दिसले होते. 35 कोटी निर्मिती खर्च असलेल्या या सिनेमाने 197 रुपये बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवला होता.