YouTuber's Success Story: यश सगळ्यांना हवे असते. पण ते कमीतकमी मेहनत करून लवकरात लवकर मिळावे अशीच अपेक्षा असते. भरपूर प्रयत्न करूनही यश मिळाले नाही तर मार्ग बदलणाऱ्यांची संख्या ही खूप जास्त आहे. पण मेहनत निरंतर चालू ठेवून यश मिळवणे हे क्वचितच लोकांना जमतं. अमरावती जिल्ह्यातील एका नामांकित यूट्यूबरने 1 वर्ष काहीही मोबदला न मिळवता निरंतर मेहनत घेतली आणि आज तो दरमहा 1 लाख रुपये कामवत आहे; याशिवाय प्रसिद्धी सुद्धा त्याच्या मागे धावत आहे. जाणून घेऊया या नामांकित यूट्यूबरच्या यशाची कहाणी.
Table of contents [Show]
कर्ज चुकवण्यासाठी राहते घर विकावे लागले
अमरावती जिल्ह्यातील निंभोरा देलवाडी या गावातील नामांकित प्रसिद्ध यूट्यूबर आणि अभिनेता विजय खंडारे. प्रसिद्ध कॉमेडी व्हिडिओ, ‘श्रीवल्ली…' मराठी गाणे, ‘माया बाप…’ हे गाणे आणि असे कित्येक गाणी त्यांनी स्वतः तयार करून रेकॉर्ड केले आहे. सामान्य परिस्थिती असणाऱ्या कुटुंबात विजय यांचा जन्म झाला. विजय याचे आई-वडील दररोज शेतात मजुरी करायचे. विजय यांनी आई वडिलांना मदत म्हणून दहावीपर्यंत गावातील शाळेत शिक्षण घेऊन भाजीपाला विक्रीसुद्धा केली. 'महामनी'शी बोलताना विजय सांगतात की, मी 10 वीला असताना घरची परिस्थिती खूप बिकट होती. दोन वेळचे जेवणसुद्धा मिळणे कठीण होते. तेव्हा बाबांनी 12 एकर शेती लागवडीने घेतली आणि त्यात आम्ही सोयाबीनची पेरणी केली. जवळ काहीच पैसे नसतांना हा सर्व उपक्रम आम्ही केला होता. पण, निसर्गाने सुद्धा साथ दिली नाही आणि आम्हाला 12 एकरमध्ये फक्त 3 पोती सोयबीनचे उत्पादन झाले. त्यातून झालेले कर्ज चुकवता येईल, अशी आशाच उरली नाही. त्यामुळे बाबांनी राहते घर विकायला काढले आणि आम्ही रस्त्यावर आलो.
कोरोना काळात दोन वेळचे जेवण सुद्धा महाग होते
विजय पुढे सांगतात की, राहते घर विकल्यानंतर बाहेर गावी राहायला गेलो तिथे हातमजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि घर खर्च भागत नव्हता. कसेबसे मी 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि नंतर आयटीआय केला. समोरच्या शिक्षणासाठी माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता. त्यामुळे माझे शिक्षण तिथेच बंद झाले. आई वडिलांच्या मजुरीच्या पैशावर घर चालत होते, अशातच माझा प्रेम विवाह झाला. आता बायकोची जबाबदारी आली होती. काही नवीन काम करण्याचा विचार करायला घेतला तोच कोरोनाचे संकट अंगाशी आले. कोरोना काळात तर आमच्या दोन वेळच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था नव्हती.
टिकटॉकमुळे दिसले आशेचे किरण
कोरोना काळात घरबसल्या मोबईल पाहत असताना टिकटॉककडे लक्ष गेले आणि सर्व करतात म्हणून मी सुद्धा त्यावर एक व्हिडिओ बनवून पब्लिश केला. तेव्हा एका दिवसात माझे 13 हजार फॉलोवर्स झाले. त्यानंतर माझा उत्साह वाढला आणि मी दररोज व्हिडिओ बनवत गेलो. तेव्हा 15 दिवसात माझे 1 लाख फॉलोवर्स झाले होते. आता आपल्या परिस्थितीमध्ये बदल होणार असा आशेचा किरण दिसला. पण तो आनंद जास्त दिवस टिकला नाही. लवकरच टिक टॉक बॅन करण्यात आले.
इतर यूट्यूबर्सशी बोलून ‘विजय खंडारे’ यूट्यूब चॅनलचा श्रीगणेशा केला
आपल्या आयुष्याचा प्रवास सांगत असतांना विजय म्हणतात, टिकटॉक बॅन झाल्यामुळे त्यावर उपाय म्हणून काही यूटुबर्सकडून माहिती घेतली आणि यूट्यूब चॅनेल सुरू केले. तेव्हा गावकरी आणि घरचे माझ्यावर हसत होते. मला वेड्यात काढत होते. तरीही त्यात टिकून राहलो. पण, त्यात 7 महिने मला काहीही रिस्पॉन्स मिळाला नाही. यामुळे बाबा खूप चिडले आणि मला घराबाहेर निघून जा, असे म्हणाले. कारण तेव्हा घरी जेवणाची सोय लागेल अशी सुद्धा परिस्थिती नव्हती आणि मी फक्त यूट्यूबच्या मागे होतो. तेव्हा मी बाबांना म्हटले की, एक दिवस असा पैसा येईल की तुम्ही मोजू नाही शकणार. तेव्हापासून मी अजून जोमाने प्रयत्न सुरू केले आणि त्यात माझ्या पत्नीने आणि बहिणीने मला खूप साथ दिली. 7 महिन्यानंतर मला यूट्यूबचे पहिले पेमेंट आले. त्याची रक्कम होती 4000 रुपये. त्यानंतर मला यूट्यूबचे पेमेंट सुरू झाले आणि मी अजून जोमाने मेहनत घेऊ लागलो.
पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यामुळे मिळाली प्रसिद्धी
पुष्पा चित्रपट आल्यानंतर तर माझं नाशिबच उजाळलं, मी विचार केला की या चित्रपटातील श्रीवल्ली हे गाणं 4 भाषांमध्ये आहे. पण आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठीत नाही, आपण मराठीत ट्राय केलं पाहिजे. मी ते गाणं मराठीत लिहिलं आणि घरी दाखवलं, ते सर्वांना आवडलं. त्यानंतर रेकॉर्ड केलं आणि माझ्या चॅनलला टाकलं तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रात माझी ओळख निर्माण झाली. माझ्या यशाचा बहुतेक वाटा हा ‘श्रीवल्ली’ गाण्याचा आहे.
फक्त कलेच्या बळावर आता कमावतोय दरमहा 1 लाख रुपये
आज विजय यांच्या सर्व व्हिडिओला 1 लाखाच्या वर views आहेत. 4 हजार रुपयांपासून सुरू झालेले त्यांचे महिन्याचे पेमेंट आज 1 लाखांवर गेले आहे. मेहनत आणि चिकाटी असेल तर सर्व काही शक्य आहे. आपण नेहमी ऐकतो की, कर्म करत रहा फळ आपोआप मिळेल त्याचे डोळ्यासामोरील उदाहरण म्हणजे विजय खंडारे. तुमच्या अंगातील कला प्रस्तुत करा तिला वाव देणारी मंडळी आपोआप त्या पर्यन्त पोहचते. महमनिशी चर्चा करतांना शेवटी विजय सांगतात, मी दहावीमध्ये असतांना आम्हाला जे राहते घर सोडावे लागते होते, ते आज मी स्वबळावर परत मिळवले आहे. परिस्थितीवर मात करायला जमलं की आयुष्याचा खडतर प्रवास सुद्धा गोड वाटायला लागतो.