'सुरत डायमंड बोर्स' ची (SDB) इमारत तयार आहे. ही इमारत आयताकार असून एका केंद्रासह जोडून आहे. तब्बल 15 मजल्यांची 9 टॉवर असलेली ही भव्य इमारत आहे. या इमारतीमध्ये डायमंड ट्रेडिंग सेंटर असेल. तसेच, हे मार्केट कटर, पॉलिशर्स आणि व्यापाऱ्यांसह 65,000 हून अधिक हिरे व्यावसायिकांसाठी 'वन-स्टॉप डेस्टिनेशन'ठरणार आहे. आत्तापर्यंत जगातील सर्वांत मोठी कार्यालयीन इमारत म्हणून पेंटागॉनचा बोलबाला होता. कारण, तब्बल 80 वर्षांपासून हे पद पेंटागॉन कार्यालयाकडे होते, मात्र आता ते सुरतच्या नावावर आहे. अमेरिकन संरक्षण मंत्रालय पेंटागॉनचे बिल्ट-अप क्षेत्र 66,73,624 चौरस फूट आहे. तर सुरत डायमंड बोर्सचा बिल्ट-अप एरिया 67,28,604 स्क्वेअर फूट आहे.
सुविधा काय असणार?
या इमारतीमध्ये जगभरातील 350 डायमंड कंपन्यांच्या कार्यालयांव्यतिरिक्त, 9 टॉवर्समध्ये डायमंड चाचणी प्रयोगशाळा, ग्रेडिंग आणि प्रमाणपत्र, बँका, सुरक्षा व्हॉल्ट, कस्टम झोन आणि रेस्टॉरंट्ससुद्धा असणार आहेत. तसेच, यासह 4700 कार्यालय या इमारतीमध्ये असणार आहेत. हे जगातील सर्वांत मोठे हिरे बाजार असेल, त्यामुळे सुरत विमानतळावरही अनेक नव्या सुविधा जोडल्या जात आहेत.
मॉर्फोजेनेसिस कंपनीने बनवले डिझाईन
ही इमारत बांधायला सुमारे 3200 कोटी रुपये खर्च आला आहे. या इमारतीचे डिझाईन भारतीय आर्किटेक्ट कंपनी मॉर्फोजेनेसिसने (Morphogenesis) केले आहे. सुरत डायमंड मार्केटचे सीईओ (chief executive officer)महेश गढवी यांनी सांगितले की, हा प्रकल्प पेंटागाॅनशी स्पर्धा करण्यासाठी नव्हता, तर गरजेच्या आधारावर तयार करण्यात आला आहे. तसेच, त्यांनी सांगितले की इमारत पूर्ण व्हायच्या आधीच सर्व कार्यालय डायमंड कंपनीने विकत घेतले आहेत.
नोव्हेंबरमध्ये होणार उद्घाटन!
या भव्य इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी नोव्हेंबरमध्ये करणार आहेत. जगभरातील 90 टक्के डायमंडवर सुरतमध्ये प्रक्रिया केली जाते, पण तरीही मुंबई हे त्यांच्या व्यापाराचे केंद्र राहिले आहे. पण, आता सर्व सुविधा या इमारतीमध्ये उपलब्ध होणार असल्याने व्यापाऱ्यांना ट्रेनने मुंबईला जाण्याची गरज राहणार नाही, अशी माहिती सीईओ गढवी यांनी मीडियाशी बोलताना दिली आहे.
सर्वाधिक हिरे व्यावसायिक सुरतमध्ये स्थित आहेत. पण, बाजारपेठ मुंबईत असल्याने त्यांना रोज ये-जा करावी लागत होती. यामुळे त्यांचा टाईम अधिक खर्ची होत होता. आता त्यांना सर्व सुविधा सुरत डायमंड मार्केटमध्येच मिळणार असल्याने त्यांचा टाईम आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. शिवाय भारताने सर्वांत मोठे कार्यालय असल्याची अजून एक उपाधी मिळवली आहे.