Tomato Price Increase: सर्वसामान्यांवर महागाईचा बोजा वाढला आहे. आता टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. आता स्वयंपाकघरातील मसाल्यांच्या किमतीही वाढल्या आहेत. त्याचा फटका थेट सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे. मसाल्यांच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत की, सर्वसामान्यांना जेवणातला आस्वादच दूर पळाला आहे.
Table of contents [Show]
जिरे आणि हळद महागली
जिरे आणि हळदीचे दर 24 टक्क्यांनी वाढल्याने जेवणाच्या ताटात त्यांचा वापर कमी होतांना दिसत आहे. स्वयंपाकघरातील मागणी आणि निर्यात यामुळे जीरे 56 हजार रुपये प्रति क्विंटलवर पोहचले आहे. जिऱ्याचे उत्पादन प्रामुख्याने गुजरात आणि राजस्थान येथे घेतले जाते. परंतु या दोन्ही राज्यात मार्च महिन्यात प्रचंड पाऊस झाल्याने, उत्पन्न कमी झाले. यामुळे जिऱ्याचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहे.
नैसर्गिक आपत्तीचा परिणाम
अवेळी पाऊस आणि बिपरजॉय वादळाच्या गारपिटीमुळे गुजरात आणि राजस्थान येथील उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे. येथे जिऱ्याची चांगली पेरणी होत असल्याने ७५ लाख पोती हाती लागत होती. परंतु नैसर्गिक नुकसान झाल्याने आता केवळ ५० ते ५२ लाख पोतीच हाती येण्याची अपेक्षा आहे. याचा फायदा मसाल्यांचे साठेबाज घेतात आणि भाव गगनाला भिडू लागतात. गेल्या एका महिन्यात मसाल्यांच्या किमती वाढल्या आहेत. पुरवठ्यातील अडथळे, अवकाळी पाऊस, बिपरजॉय वादळ यामुळे जिरे 23.55%, हळद 23.62%, धणे 16%, लाल मिरची 14%, सुंठ 8 टक्क्यांनी वाढली आहे, तर यापूढे देखील दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सुंठ आणि आले प्रचंड महागले
आले आणि सुंठाचे भावही गगनाला भिडले असून, त्यामुळे चहा आणि भाज्यांच्या चवीवर परिणाम झाला आहे. एकीकडे सरकार किरकोळ महागाई 4.25% पर्यंत खाली आली असल्याचे सांगते, पण स्वयंपाकघरातील बजेट पूर्णपणे बिघडले आहे. 100 ग्रॅम आले 40 रुपयांना मिळते. मिरचीही महाग झाली आहे. टमाटर आधीच 150 रुपये किलो आहे. सर्वसामांन्याच्या घरात टमाटरचा वापरच करणे बंद झाला आहे.
तर आल्याचे दर बघून ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आले 325 रुपये किलोपर्यंत पोहोचण्याचे कारण कर्नाटकातील अवकाळी पाऊस आणि मणिपूरमध्ये कमी पुरवठ्यामुळे निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती आहे.
घाऊक बाजारातील सरासरी किंमत
घाऊक बाजारात जिरे 24% नी वाढल्याने 56000 रुपये क्विंटल झाले. हळद 24% नी वाढल्याने 10,000 रुपये प्रती क्विंटल झाली आहे. धने 16% नी वाढल्याने 6880 रुपये प्रती क्विंटल झाले आहे. मिरची 14% नी वाढल्याने 20,000 रुपये प्रती क्विंटल झाले आहे.
तर किरकोळ बाजारात लाल मिरचीची किंमत 225-250 रुपये प्रति किलो झालेली आहे आणि 250 ग्रॅम आल्याकरीता 80 ते 100 रुपये ग्राहकांना मोजावे लागते.