केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी भारतीय स्टार्टअप्सबद्दल एक महत्वाचे विधान केले आहे. येत्या चार-पाच वर्षात भारतात स्टार्टअप इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात विकसित होणार असून त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था देखील बळकट होणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. देशभरात युनिकॉर्न कंपन्यांमध्ये लक्षणीय वाढ होईल आणि स्टार्टअपची संख्या 10 पट वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
राजीव चंद्रशेखर हैदराबादमध्ये ITO इनक्युबेशन इनोव्हेशन फाऊंडेशनच्या 6 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित गुंतवणूकदारांच्या स्टार्टअप कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते. गेल्या काही वर्षांपासून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने विशेष कामगिरी केली असून, या क्षेत्रात खूप साऱ्या स्टार्टअप कंपन्या सुरु झाल्या आहेत. यानिमित्ताने या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असून आर्थिक उलाढाल देखील वाढली आहे असे ते म्हणाले आहेत.
भारताची स्टार्टअप भरारी…
2014 मध्ये आपल्या देशाचा तंत्रज्ञानाचे क्षेत्र फक्त IT आणि ITES पुरता मर्यादित होता.परंतु आता डीप टेक (Deep Tech), एआय (AI), डेटा इकॉनॉमी (Data Economy), सेमीकंडक्टर डिझाइन (Semiconductor Design) आणि मायक्रोइलेक्ट्रॉनिक (Microelectronic) यांसारख्या विविध डोमेनमध्ये संधी निर्माण झाल्या आहेत. देशातील नवउद्योजकांना संधी निर्माण करण्य देण्यासाठी केंद्र सरकारने वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत.’स्टार्टअप इंडिया’ मोहिमेअंतर्गत कंपन्यांना झटपट परवाने दिले जात आहेत. त्यांच्यासाठी बँकांनी देखील आकर्षक कर्ज योजना आणल्या आहेत. याचा फायदा नव्या उद्योजकांना होत असून त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होते आहे.
कौशल्य विकास केंद्रांची व्याप्ती
देशभरात ठिकठीकाणी कौशल्य विकास केंद्रांची स्थापना होते असून त्यातून तरुण वर्गाला रोजगारासाठी आवश्यक ते कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे. कंपन्यांना आवश्यक असलेले स्किल्स असलेले कर्मचारी मिळत असल्यामुळे कंपन्यांनी उत्पादन क्षमता देखील वाढली असल्याची माहिती राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली आहे.