पाश्चात्य देशातील इन्फ्रास्ट्रक्चरच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही लवकरच डबल डेकर ब्रीज दिसतील. त्यादृष्टीने सरकारने पाऊले टाकण्यास सुरूवात केली असून, केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रात डबल डेकर ब्रीज उभारले जाणार आहेत. हे ब्रीज पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये उभारले जाणार आहेत.
केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी फायनान्शिअल एक्सप्रेस समुहाने आयोजित केलेल्या चिफ फायनान्शिअल ऑफिसर्स अॅवॉर्ड 2023 या कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील डबल डेकर प्रोजेक्टबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. राज्यात 5 डबल डेकर ब्रीज उभारले जाणार आहेत. त्यातील 4 ब्रीज हे पुण्यात तर एक ब्रीज नाशिकमध्ये तयार केला जाणार आहे आणि हे 6 आणि 8 लेनचे असणार आहेत.
या ब्रीजसाठी काय खर्च येऊ शकतो?
पुणे आणि नाशिकमध्ये उभारण्यात येणाऱ्या या 5 ब्रीजसाठी साधारण 35,000 कोटी रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे. हा सर्व खर्च सरकार करणार नसून त्यातील काही वाटा हा राज्य सरकार आणि केंद्र सरकार उचलणार असून उर्वरित निधी हा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून उभा केला जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारकडून 15,000 कोटी रुपये तर केंद्र सरकारकडून 5,000 कोटी रुपये घेतले जाणार आहे. तर उर्वरित 15,000 कोटी रुपये पीपीपी मॉडेलमधून उभे केले जातील, अशा विश्वास गडकरी यांना आहे.
विकासकामांसाठी पैशांची कमतरता नाही
गडकरी यांच्या मते, सरकारकडे नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी पैशांची कमतरता नाही. पण कच्चा माल, चांगले तंत्रज्ञान आणि मुदतीत प्रोजेक्ट पूर्ण होण्याची शक्यता नसणे. या आपल्यापुढील मेजर अडचणी आहेत, असे गडकरी यांना वाटते.यामध्ये खर्चात कपात करून चांगल्या दर्जाचे ब्रीज उभे करणे हे एक आमच्या समोर आव्हान आहे. त्यातूनही मार्ग काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात इन्फ्रास्ट्रक्चरचे अनेक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट हाती घेतले आहेत. यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील कनेक्टीव्हीटी वाढवणे यावर त्यांचा भर आहे. समृद्धी महामार्ग हे त्याचे एक चांगले उदाहरण मानले जाते. मुंबई ते नागूपर या शहरांमधील अंतर कमी करून, या मार्गाशी अनेक गावांना, तालुक्यांना जोडले जात आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरांनाही खऱ्या अर्थाने आधुनिक करण्याच्या दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चरमधील विविध पर्याय वापरले जात आहेत. डबल डेकर ब्रीज ही संकल्पना फक्त दिसण्यापुरती मर्यादित नसून, यामध्ये शहरातील अुपुऱ्या जागेमुळे सरकार कमी जागेत चांगल्या आणि दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे.
Source: www.financialexpress.com/