Adani Group Crisis: हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg Research)ने केलेल्या आरोपांनंतर अदानी समुहातील वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स धडाधड घसरू लागले. याचा भारतातील इतर समुहातील कंपन्यांच्या शेअर्सवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो! अशी चर्चा सुरू असताना या क्षेत्रातील तज्ज्ञांनी मात्र अदानी ग्रुपमध्ये चाललेल्या घडामोडींचा कोणताच परिणाम इतर समुहातील कंपन्यांवर होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे.
ब्लूमबर्ग इकोनॉमिक्सने हल्लीच एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, हिंडेनबर्ग रिसर्च कंपनीने अदानी कंपनीवर केलेल्या आरोपांचा भारतातील इतर ग्रुपमधील कंपन्यांवर तितकासा झालेला दिसत नाही. कारण गेल्या काही दिवसांत अदानी ग्रुप आणि इतर 17 ग्रुपमधील कंपन्यांची कामगिरी पाहिली असता त्यांची स्थिती चांगली असल्याचे दिसून आले आहे. सदर रिपोर्टमध्ये भारतातील 17 नामांकित बिझनेस ग्रुपची पाहणी करण्यात आली. त्यात रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा ग्रुप यासारख्या मोठमोठ्या कंपन्यांचा समावेश करण्यात आला असून, या कंपन्यांची मार्केटमधील स्थिती समाधानकारक असल्याचे अहवालात दिसून आले.
अर्थतज्ज्ञ अभिषेक गुप्ता, स्कॉट जॉनसन आणि टॉम ओरलिक यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केले आहे की,अदानी ग्रुप हा भारतातील मोठ्या ग्रुपपैकी एक ग्रुप आहे. तो संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करत नाही. भारतातील बरेच व्यावसायिक समूह हे इतर जागतिक व्यावसायिक समुहाच्या तुलनेत अजून बरेच मागे आहेत. पण तरीही त्यांचे भारतातील स्थान अजूनतरी अढळ आणि मजबूत आहे. अदानी ग्रुपवर आलेल्या संकटाचा इतर भारतीय ग्रुपमधील कंपन्यांवर अजून परिणाम झालेला नाही.
अदानी ग्रुपच्या किमतीत मोठी घसरण
हिंडेनबर्ग रिसर्चने 24 जानेवारीला प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमध्ये अदानी ग्रुपने कंपन्यांच्या शेअर्समध्ये हेराफेरी आणि फ्रॉड केल्याचे आरोप केले होते. त्यानंतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांमधील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण सुरू झाली. त्यामुळे अदानी समुहाचे बाजारातील भांडवल सुमारे 127 अब्ज डॉलरने कमी झाले होते. अदानी ग्रुपने ज्या बॅंकांकडून कर्ज घेतले होते. त्या बॅंका आता दिवाळखोरीत निघणार का? अशी चर्चा सुरू असताना आरबीआयने भारतीय बॅंकांची स्थिती मजबूत असल्याचे सांगून लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पण तरीही अदानी सुमहातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या काही गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावे लागले होते.
भारताच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह!
हिंडेनबर्ग रिसर्चने प्रसिद्ध केलेल्या अहवालामुळे अदानी समुहाच्या व्यावसायिकतेवर (Adani Vs Hindenburg) प्रश्न उपस्थित करण्यात आले. परिणामी जागतिक मार्केटमध्ये भारताच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. कारण गेल्या 6 महिन्यात अदानी उद्योग समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी जागतिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत खूप कमी वेळेत पहिल्या 3 मध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांच्या व्यावसायिक धोरणाबद्दल जोरदार चर्चा सुरू होती.