Hindenburg या रिसर्च फर्मने एक अहवाल जाहीर केला आणि Adani Group चे शेअर्स पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोलमडू लागले आहेत. आणि ही रिसर्च फर्म जाहीरपणे हे मान्यच करते की आपण शॉर्ट सेलिंगच्या द्वारे पैसे कमावतो. अदानी यांचा हा आरोप आहे की, शॉर्ट सेलिंगमधून नफा कमावण्यासाठी हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
आता यातल सगळ खर-खोट काय ते यंत्रणा समोर आणतीलच. त्याची प्रक्रियाही काही प्रमाणात सुरू झालेली दिसतेय. पण, शॉर्ट सेलिंग करणाऱ्यांना कस उत्तर द्यायच हे कार्पोरेट लिडर्स समोरचे मोठे आव्हान कायमच राहिलेले आहे. ते धिरूभाई यांनाही चुकल नाही. धिरुभाई आणि आता अदानी यांच्यासमोर जे वादळ उभ ठाकल आहे ते नीट समजण्यासाठी आधी शॉर्ट सेलिंग म्हणजे काय आणि शॉर्ट सेल करून पैसा कसा कमावला जातो ते समजून घेऊया.
Table of contents [Show]
शॉर्ट सेलिंग म्हणजे अगोदर शेअर्सची विक्री करून नंतर खरेदी केली जाते. सामान्यपणे आपण शेअर बाजारात काय करतो? आपण एखादा शेअर 100 रुपयांना विकत घेतो, या अपेक्षेने की तो 110 -120 रुपयांवर किवा त्यापुढे जाईल आणि यातून आपल्याला 10 ते 20 रुपये नफा कमावता येईल. पण, शॉर्ट सेलर्स अशा शेअर्ससोबत व्यवहार करतात जो भविष्यात घसरणारच आहे, असा त्यांचा विश्वास असतो. म्हणजे 100 रुपयांचा शेअर्स 80 रुपयांना आला तर यात शॉर्ट सेल करणाऱ्यांचा फायदा असतो.
शॉर्ट सेलर्सकडे हे शेअर्स नसतात तरीही त्या संबंधित शेअरच्या विकण्याचा व्यवहार केला जातो. हे तेव्हा होत जेव्हा भाव वाढलेला असतो. यानंतर जेव्हा शेअर्सचा दर कमी होतो तेव्हा ते खरेदी केले जातात. म्हणजे नेहमीपेक्षा उलट!आधी विक्री नंतर खरेदी हे शॉर्ट सेलिंगमध्ये बघायला मिळत. सामान्यपणे अशा व्यवहारात स्क्वेअर ऑफ केल जात. शेअर्स खरेदी करणारा आणि विक्री करणारा यांच्यात फायद्या तोट्याचा हिशेब करून देण -घेण मिटवल जात. यामुळे प्रत्यक्ष शेअर्स देण्या-घेण्याची गरज भासत नाही. सामान्यपणे शॉर्ट सेलिंगचा धंदा हा असाच चालतो. हेच काम Hindenburg करते ज्यामुळे आता भारतात एवढी खळबळ उडाली आहे. अर्थात त्यांची पद्धत मात्र थोडी वेगळी आहे. काहीशी अशीच परिस्थिति धिरुभाईंसमोर उभी ठाकली होती.
‘Hindenburg’ लाच ‘लेने के देने पड गए’
धिरूभाई अंबानी यांच्या काळात एक वेळ अशी आली होती की शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात शॉर्ट सेलिंग व्हायच. मुंबईत एक cartel होत जे मोठमोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये शॉर्ट सेलिंग करत असे. धिरूभाई अंबानींच्या त्यावेळच्या रिलायन्सच्या शेअर्सच्या दरातही मोठी घट होऊ लागली होती. त्या वेळी त्यांनी ‘Hindenburg’ ला म्हणजेच या नावाच्या फर्मला नव्हे तर त्यावेळच्या शॉर्ट सेलर्सना असे उत्तर दिले की रिलायन्सच्या शेअर्सशी खेळ करणारेच पुरते कोसळून गेले होते.
काय होता धिरुभाई अंबानी यांचा डाव?
धिरूभाई यांना हा सगळा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी याला उत्तर देण्यासाठी एक स्ट्रॅटेजी आखली. आपल्या जवळच्या लोकांना गाठल. त्यांना आपला मास्टर प्लॅन सांगितला त्याप्रमाणे त्यांच्या विश्वासातली माणस कामाला लागली.
इकडे शॉर्ट सेलिंगमध्ये विकणाऱ्याना खरेदी न करताच शेअर विकता येत होतेच! त्यांना याचा हिशेब करायचीही गरज नव्हती की किती शेअर्स आपल्याजवळ आहेत आणि किती आपण विकू शकतो? यामुळे जेवढे शेअर्स बाजारात होते त्यापेक्षा जास्त त्यांनी विकून टाकले. त्यांनी विचार केला की, दर खाली आला की, सेटलमेंटच्या वेळी फायद्या-तोट्याचा हिशेब करू. मात्र आता इथेच धिरुभाईंचा प्लॅन यशस्वी झाला होता. ज्यामुळे शॉर्ट सेलर्स हादरुन गेले होते.
‘असा’ झाला धिरूभाईंचा प्लॅन यशस्वी
धिरूभाईंना जेव्हा या सगळ्याची कल्पना आली होती ना तेव्हाच त्यांनी आपल्या माणसांना हे सांगितल होत की, जसे शेअर्सचे भाव घसरत जातील तसे ते खरेदी करून होल्ड करून ठेवा. विकू नका. धिरुभाईंच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या विश्वासातली माणस हे मोठ्या प्रमाणात करू लागली होती. आता शॉर्ट सेलिंगच्या पद्धतीप्रमाणे हे cartel जेव्हा सेटलमेंट करू लागली तेव्हा धिरूभाईंची माणस ज्यांनी हे शेअर्स खरेदी करून ठेवले होते त्यांनी जी भूमिका घेतली त्यामुळे या प्रकाराला नाट्यमय वळण मिळाले. त्यांनी धिरुभाईंच्या म्हणण्याप्रमाणे सांगितले की, आम्हाला हिशेब नको, शेअर्सच द्या! या व्यवहारातील तत्वाप्रमाणे शेअर्स मागितले तर शेअर्स देणे भाग होते.
धिरूभाईंच्या प्लॅनप्रमाणे आता घडू लागल होत. बाजी पलटली होती आणि शॉर्ट सेलर्ससमोर जमीनदोस्त होण्याची वेळ आली होती. याच कारण म्हणजे ते जेव्हा या धिरुभाईंच्या माणसांना द्यायचे म्हणून शेअर्स शोधू लागले तेव्हा त्यांना ते मिळेचनात! कसे मिळणार? अहो ते तर धिरुभाईंच्या माणसांनी अगोदरच पडत्या भावात बाजारातून उचलले होते.
यामुळे आता हे शॉर्ट सेलर्स दीन झाले होते. शेअर्स तर द्यावेच लागणार होते म्हणून ज्याच्याकडे ते होते त्यांच्याकडून मिळतील त्या भावात त्यांना खरेदी करणे भाग होते. अगदी दुपटीतही! याचा परिणाम असा झाला की, रिलायन्सच्या शेअर्सचा भाव जो कमी होत चालला होता तो आता उलट होऊन वाढू लागला. आपण मगाशीच बघितल की, शॉर्ट सेलिंगमध्ये भाव कमी होण्यात फायदा असतो, वाढले तर नाही! यामुळे रिलायन्सच्याबाबत शॉर्ट सेल करणाऱ्यांना प्रचंड नुकसान सोसाव लागल. इतक की नंतर कुणाची रिलायन्सच्या वाट्याला जायची हिम्मत होत नव्हती.
आज अदानी यांच्यासमोर देखील Hindenburg ने असेच आव्हान उभे केले आहे. काळ वेगळा आहे आणि या फर्मची कार्यपद्धती थोडी वेगळी आहे. आता अदानी या सगळ्या परिस्थितीतून कसा मार्ग काढतात ते पाहण महत्वाच ठरणार आहे.