तंत्रज्ञानाचा वापर आणि लाईव्ह ब्रॉडकास्ट यामुळे खेडोपाडी होणाऱ्या टेनिस क्रिकेट टुर्नामेंटला लाखो प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. टेनिस खेळता खेळता त्याचे लाईव्ह ब्रॉडकास्टींग सुरु करुन करियला अचूक टायमिंगने कलाटणी देणाऱ्या संतोष नाणेकरने या मराठी मुलाने ब्रॉडकास्टर म्हणून नवी ओळख निर्माण केली आहे. आतापर्यंत 2000 हून अधिक टुर्नामेंटचे लाईव्ह ब्रॉडकास्ट करणाऱ्या नाणेकर याचे TennisCricket.in हे युट्यूब चॅनेल टेनिस विश्वातला एक सक्सेसफुल ब्रॅंड बनला आहे.
कॉलेज ड्रॉपआऊट ते सक्सेसफुल आंत्रप्रेन्युअर असा संतोष नाणेकर याचा प्रवास राहिला आहे. त्याची आतापर्यंतची वाटचाल कशी होती, कोणते अडथळे आले, त्यावर कशी मात केली. नव्याने या क्षेत्रात येणाऱ्यांसाठी काय करायला हवे, या सर्वांची उत्तरे संतोषने नुकताच महामनीला दिलेल्या मुलाखतीत मनमोकळेपणाने दिली.
आपल्याला सुरुवातीपासून टेनिस क्रिकेट खेळण्याची आवड होती. विक्रोळियन्स संघाकडून टेनिस क्रिकेट खेळत होतो. मात्र केवळ क्रिकेट खेळून पोट भरणे अवघड आहे याची जाणीव झाली. मग हीच आवड करियर म्हणून जोपासली आणि गावोगावी कॅमेरा घेऊन टेनिस मॅचेसचे शुटिंग करु लागलो, असे नाणेकर सांगतो.
दहा वर्षापूर्वी भारतात सोशल मिडियाचा इतका दबदबा नव्हता. इंटरनेट कनेक्टिव्हीटी खेडोपाडी किंवा तालुका पातळीवर मर्यादित होती. अशावेळी ज्या ठिकाणी टुर्नामेंट भरवल्या जायच्या तिथे जाऊन शुटींग करणे आणि घरी येऊन एडिटिंग करुन दुसऱ्या दिवशी युट्यूब चॅनलवर अपलोड करणे असा दिनक्रम असायचा. यातून मग आयोजकांमध्ये प्रचार झाला आणि काम मिळू लागले, असे नाणेकर सांगतो.
सुरुवातीच्या काळात टेनिस क्रिकेटचा हंगाम सुरु झाला की आठ-आठ दिवस घरी नसायचो. शेजारचे, नातेवाईक पालकांना विचारायचे तुमचा मुलगा कुठे नोकरी करतो. पण याकडे दुर्लक्ष करुन मी कामाला प्राधान्य दिल्याने आजवर इथपर्यंत पोहोचलो असल्याचे नाणेकर सांगतो. टुर्नामेंट कव्हर करणे तिथेच लाईव्ह ब्रॉडकास्ट करायचो. टेनिस क्रिकेट विश्वात माझ्या कामाची दखल घेतली. आयोजक समोरुन बोलावू लागले. मला काम मिळत गेलो. मी टीम उभी केली. यूट्यूबमधून मी ब्रॉडकास्टिंगचे कौशल्य शिकत गेलो. नव्या टेक्नॉलॉजीचा वापर केला. जसे प्रेक्षक टिव्हीवर इंटरनॅशनल क्रिकेट मॅचेस पाहता अगदी तशाच प्रकारचा अनुभव टेनिसमध्ये देण्याचा प्रयत्न TennisCricket.in या युट्यूब चॅनलमधून केला असे नाणेकर सांगतो.
टेनिस क्रिकेटचे लाईव्ह ब्रॉडकास्टिंग केवळ भारतातच नाही तर जवळपास 12 देशांमधील टेनिस टुर्नामेंट कव्हर केल्याचे संतोष नाणेकर अभिमानाने सांगतो. त्याच्या कंपनीत आजच्या घडीला 60 ते 65 जणांचा स्टाफ आहे. तो वर्षाकाठी किमान 50 मोठ्या टुर्नामेंटचे लाईव्ह टेलिकास्ट करतो. आठवडाभर चालणाऱ्या मोठ्या टुर्नामेंटसाठी किमान 60 ते 70 लाखांचे ब्रॉडकास्टिंगचे बजेट असते, असे नाणेकर सांगतो. अशा टुर्नामेंटचा जगभरातून लाखो प्रेक्षक युट्यूबवरुन आनंद घेतात.
TennisCricket.in कडे कोट्यवधी रुपयांची मशिनरी आहे. ब्रॉडकास्टिंगचा अद्ययावत सेटअप आहे. ज्यातून प्रेक्षकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅचेस जशा लाईव्ह दाखवल्या जातात तसाच हुबेहूब अनुभव मिळतो. यात अॅक्शन रिप्लेपासून, डिजिटल स्कोअरकार्ड अशी वैशिष्ट्ये स्क्रीनवर डिस्प्ले होतात. त्यामुळे मागील चार ते पाच वर्षात टेनिस क्रिकेटमधील ब्रॉडकास्टिंग देखील अद्ययावत झाले आहे.
मराठी तरुणांनी या क्षेत्रात अवश्य या, मार्गदर्शन करणार
आजच्या घडीला टेनिस क्रिकेट लाईव्ह ब्रॉडकास्ट करणारे शेकडो युट्यूब चॅनल्स आहेत. टेनिस क्रिकेट प्रचंड वेगाने वाढत आहे. त्यातुलनेत ब्रॉडकास्टर्स मर्यादित आहेत. तरुणांना यात करियरच्या खूप संधी आहेत. खासकरुन मराठी तरुणांनी या क्षेत्रात यायला हवे, असे आवाहन नाणेकर करतो. मराठी तरुणांनी या क्षेत्रात आल्यास त्यांना ब्रॉडकास्टिंगबाबत आवश्यक मार्गदर्शन करु, अशी ग्वाही नाणेकरने महामनीसोबत बोलताना दिली. 2013 मध्ये जेव्हा आपण सुरुवात केली तेव्हा युट्यूबवरुनच सर्व कौशल्य शिकलो. तरुणांनी युट्यूबचा वापर केला तर नक्कीच फायदा होईल, असा सल्ला नाणेकर देतो.
ब्रॉडकास्टर्ससाठी किती गुंतवणूक आवश्यक आहे
आजच्या घडीला क्रिकेट मॅच किंवा कोणत्याही स्पर्धेचे लाईव्ह ब्रॉडकास्टिंग करण्यासाठी किमान 3 ते 4 लाखांची सामुग्री आवश्यक आहे. यात चांगल्या कॅमेऱ्याची किंमत 2 ते 2.5 लाख इतकी असते. त्याशिवाय डिस्प्ले सेटअप, साऊंड सिस्टम अशा इतर गोष्टींसाठी खर्च असतो. बँकांकडून अशा प्रकारच्या नवीन व्यवसायासाठी कर्ज दिले जाऊ शकते. दोन चार मित्रांनी मिळून स्टार्टअप अंतर्गत बँकांकडून कर्ज मागणी करु शकतात. यात महिला कोणी असेल तर बँकांकडून प्राधान्याने कर्ज देतात, असे संतोष नाणेकर याचे म्हणणे आहे.