Ganesha Idols: महाराष्ट्रातील प्रमुख उत्सवांपैकी एक असलेला गणेशोत्सव दोन महिन्यांवर आला आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या धूम-धडाक्यात साजरा केला जातो. यानिमित्त नागपूर शहर तसेच जिल्ह्यातील हजारो मूर्तिकार जवळपास दहा लाख मातीच्या गणेश मूर्ती तयार करण्यासाठी कामाला लागले आहेत. यामध्ये घरगुती, सार्वजनिक आणि निर्यात केल्या जाणाऱ्या मूर्तींचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातून देशभरात मातीच्या मूर्तींचा पूरवठा होत असल्याने, मातीची मूर्ती तयार करणारे शहर किंवा मातीची मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तीकारांचे शहर म्हणून नागपूर जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात एकूणच चार हजार मूर्तीकार
नागपूर शहरामध्येच घरी स्थापना केल्या जाणाऱ्या गणरायाची मुर्ती तयार करणारे जवळपास 650 मूर्तिकार आहेत आणि ते 3.50 लाख मूर्ती तयार करतात. तसेच नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यातील 3,250 मूर्तिकार, घरी स्थापना केल्या जाणाऱ्या गणरायाची 6.50 लाख मूर्ती तयार करीत असतात. यासोबतच सार्वजनिक गणपती मंडळांमध्ये स्थापणा केल्या जाणाऱ्या गणेश मूर्तींची संख्या 2,500 पेक्षा जास्तच आहे.
आयात केली जाते माती
विशेषत: हे सर्व गणपती मातीपासून तयार केले जातात आणि ही माती गेल्या काही वर्षांपासून उत्तर प्रदेशातील आझमगड येथून आणली जाते. आझमगड शिवाय विदर्भातील आंधळगाव, भंडारा, नरखेड, चंद्रपूर, इत्यादी ठीकाणांहून मूर्तीकारांच्या मदतीने माती आयात केली जाते. एकूणच 13 हजार टन पेक्षाही जास्त मातीची आयात केली जाते.
कोट्यवधी रुपयांची उलाढाल
एवढ्या मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींसाठी लागणारी माती आयात केली जात असल्याने, आणि कोरोना नंतर संबंधित इतर सर्वच गोष्टी जसे की, मूर्ती रंगवायला लागणारा रंग, मूर्तीकारांची फी , मूर्ती सजविण्यास लागणारे साहित्य, प्रवासाचा खर्च, इतर सर्वच गोष्टी महागल्याने बाजारात विकण्यासाठी ठेवल्या जाणाऱ्या मातीच्या मूर्तींच्या किंमती देखील वाढल्या आहेत. गेल्या वर्षी बाजारात मातीच्या अगदी छोट्या मूर्तींची किंमत 500 रुपयांपासून सुरु झाली होती. नागपूर जिल्ह्यात दरवर्षी केवळ गणेश मूर्तीं विक्री बाबतची उलाढाल कोट्यवधी रुपयांची असते.