भारतामध्ये कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर चहा उद्योगावर देखील संकट आले होते. मात्र, आता नव्याने कोरोनाचा चीनमध्ये प्रसार होत असल्याच्या बातम्या येत असल्याने पुन्हा या क्षेत्रासमोरील आव्हाने वाढली आहेत. कमी किंमती आणि उत्पादन किंमतीत वाढ हे एक मोठे आव्हान चहा उद्योगापुढे आहे. चहा निर्यातीसाठी चांगल्या प्रतिच्या चहाचे उत्पादन घेण्यासाठीही दबाव आहे.
कोरोना निर्बंधामुळे मागील दोन वर्षात चहा वेचणीसुद्धा (Tea Picking) कमी झाली आहे. २०१९ साली १ हजार ३९० मिलियन किलो, २०२० साली १ हजार २५८ मिलियन किलो असे कमी उत्पादन झाले. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर उत्पादन वाढले मात्र, जास्त वाढ झाली नाही. कमी उत्पादन झाल्याने लिलात चहाच्या विक्रीला चांगला भाव मिळत असल्याचेही दिसून येत आहे. २०२० मध्ये एक किलो चहाची सरासरी लिलावाची किंमत २०६ रुपये किलो होती. त्यामध्ये २०२१ मध्ये घट झाली. २०२१ मध्ये सरासरी एक किलो चहाच्या लिलावाची किंमत १९० रुपये किलो एवढी झाली, असे टी असोसिएशन ऑफ इंडियाचे सचिव परबीर भट्टाचार्य यांनी सांगितले.
चहा उद्योगापुढील समस्या -
मजुरांचा वाढता खर्च, खते, महाग वीज, वाहतूक यामुळे उत्पादन खर्च वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. ऊर्जेची मागणी वाढत असताना चहाचे उत्पादन मात्र, कमी होत आहे. मात्र, चहाच्या गुणवत्तेवरही लक्ष द्यावे लागत आहे. चहाची निर्यात करण्यासाठी चांगल्या प्रतीचा चहा लागतो, असे लक्ष्मी टी चे मालक रुद्रा चॅटर्जी यांनी म्हटले.
इराणकडून आयात घटली
भारतीय चहाला इराणमध्ये मोठी मागणी आहे. मात्र, मागील काही वर्षात इराणकडून भारतीय चहाला होणारी मागणी घटली आहे. यामागील निश्चित कारण माहीत नाही. इराणकडून भारतीय चहा आयात होत नसला तरी त्याला पर्याय म्हणून युनायटेड अरब अमिरातकडून भारतीय चहाला मागणी वाढत आहे. मात्र, सध्या इराणकडून चहा आयात होत नसल्याने चहा उद्योगाला फटका बसला आहे.