व्यावसायिक वाहन उत्पादनातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने कमर्शिअल वाहनांच्या किंमतीत वाढ केली आहे. उत्पादन खर्च वाढल्याने टाटा मोटर्सकडून कमर्शिअल वाहनांच्या किंमतीत 3% वाढ केल्याची घोषणा करण्यात आली. वाणिज्य वापरातील सर्वच प्रकारच्या वाहनांसाठी दरवाढ लागू झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.
येत्या 1 ऑक्टोबर 2023 पासून टाटाची व्यावसायिक वाहने महागणार आहेत. यामुळे कंपनीचा तिसऱ्या तिमाहीत चांगला महसूल मिळण्याची शक्यता आहे.
मागील दोन वर्षांपासून वाहन उद्योग महागाईचा सामना करत आहे. जागतिक बाजारात वस्तूंच्या किंमती वाढल्याने कंपनीसाठी उत्पादन खर्चाचा भार वाढला आहे. त्यामुळे हा भार कमी करण्यासाठी ग्राहकांवर तो सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कोरोना टाळेबंदीनंतर वाहन उद्योगाने भरारी घेतली आहे. टाटा मोटर्सने वर्ष 2023 मध्ये दमदार कामगिरी केली. प्रवासी वाहनांच्या विक्रीत 2022 च्या तुलनेत 30% वाढ झाली. अवजड वाहनांच्या विक्रीने वार्षिक स्तरावर 14.4% वृद्धीदर नोंदवला होता.
ऑगस्ट 2023 या महिन्यात मात्र टाटा मोटर्सने गेल्या वर्षी प्रमाणेच कामगिरी केली. ऑगस्ट महिन्यात कंपनीने 31492 मोटारींची विक्री केली. यात गत वर्षीच्या तुलनेत 1.9% वाढ झाली. कंपनीने ऑगस्टमध्ये 13306 मध्यम आकाराच्या आणि अवजड वाहने विक्री केली. यामध्ये ट्रक, बस यांचा समावेश होता. टाटा मोटर्सने ऑगस्ट 2023मध्ये 13816 वाहनांची निर्यात केली होती.
टाटा मोटर्सचे भारत, युके, दक्षिण कोरिया, थायलंड, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया या देशांमध्ये उत्पादन प्रकल्प आहेत. आफ्रिका, मध्य पूर्व,दक्षिण अमेरिका, आशिया आणि सार्क देशांमध्ये कंपनी वाहनांची विक्री करते.
टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये तेजी
टाटा मोटर्सचा शेअर सोमवारी 18 सप्टेंबर 2023 रोजी 640.60 रुपयांवर बंद झाला. शेअरमध्ये सोमवारच्या सत्रात 1.02% वाढ झाली. टाटा मोटर्सचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीच्या समीप आहे. टाटा मोटर्सच्या शेअरने वर्षभरात 665.30 रुपयांचा उच्चांक आणि 375.50 रुपयांचा नीचांक गाठला होता. कंपनीची मार्केट कॅप 212826.54 कोटी इतकी आहे.