Tanha Pola : भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतात वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा हा सण होय. संपूर्ण महाराष्ट्रात पोळा हा सण प्रचंड उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. विदर्भात मोठ्या बैलांचा पोळा झाला की, लगेच दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा केला जातो. विदर्भ व्यतिरिक्त इतर कुठेही हा सण साजरा केला जात नाही. त्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेचा घेतलेला आढावा आपण जाणून घेऊ…
तान्हा पोळ्याची पार्श्वभूमी-
1806 साली दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले यांनी हा उत्सव सुरु केला होता. नवीन पिढीला देखील शेती आणि शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याचे महत्व कळावे, या उद्देशाने राजे रघुजी महाराज भोंसले यांनी हा सण सुरु करण्यास पुढाकार घेतला होता. तेव्हापासून आजही विदर्भात दरवर्षी बालगोपाळांसाठी या सणाचे आयोजन केले जाते. तान्हा पोळा या सणाला यंदा 217 वर्ष पूर्ण होत आहेत.
पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा सणाचे आयोजन केले जाते. शहारातील तसेच गावातील मोठ्या मैदानात किंवा मंदिर परिसरात तान्हा पोळा सणाचे आयोजन केले जाते. तोरण-पताका लावून परिसर सजवला जातो. लाकडी बैलांना माळ, झुल घालून तसेच गळ्याला घंटा बांधून सजवले जाते. तर लाकडी बैल घेऊन येणारी मुले देखील विविध वेशभूषा धारण करुन येतात. पोळा फुटला की मुलांना प्रसाद, भेटवस्तू आणि बक्षीस दिले जाते.
सजावट साहित्यातून होणारा नफा
दिवसेंदिवस तान्हा पोळा सण साजरा करण्याच्या प्रमाणामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. बाजारपेठा पोळा सणासाठी आवश्यक असलेल्या सजावटीच्या साहित्याने सजल्या आहेत. तसेच या कालावधीत लहान मुलांचे आकर्षण असलेले लाकडी बैल, विविध वेशभूषा करण्यास लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी करिता देखील अनेक दुकाने सज्ज असतात. या सजावटीच्या साहित्याची मार्केटमधील तीन महिन्याची उलाढाल 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असते.
कोटी रुपयांची उलाढाल
नागपूर शहरात तान्हा पोळा सणासाठी बाजारात विविध प्रकारचे आणि आकारांचे लाकडी बैल विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. तसेच पोळा सणासाठी लागणाऱ्या साहित्याने बाजारपेठा सजल्या असून खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या गर्दीने तितक्याच फुलल्या देखील आहेत. बाजारात 200 रुपयांपासून ते अडीच लाख रुपयांपर्यंतचे लाकडी बैल विक्रीस उपलब्ध आहेत. साधारणत: एका दुकानात 4500 ते 5000 च्या संख्येने बैल विक्रीस उपलब्ध आहेत. तर लाकडी बैल विक्री करणाऱ्या एका विक्रेत्याचा तीन महिन्याचा टर्न ओव्हर 15 ते 20 लाख रुपये आहे. तसेच लाकडी बैल विक्री बाबतची तीन महिन्याची नागपूर शहरातील संपूर्ण मार्केटमधील उलाढाल ही 5 ते 6 कोटी रुपये एवढी आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.