तमिळनाडूची तमिळनाडू मर्कंटाइल बँक सध्या चांगलीच चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे या बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिलेला राजीनामा. आता हा राजीनामा देण्यामगचं कारण काय आहे असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर ऐकून तुम्ही चकीत व्हाल. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ एस कृष्णन यांना तडकाफडकी राजीनामा द्यावा लागला. बँकेने तांत्रिक चुकीने एका सर्वसाधारण टॅक्सी चालकाच्या खात्यात 9 हजार कोटी रुपये जमा केले. या हलगर्जीपणामुळे एस कृष्णन यांना राजीनामा द्यावा लागला हे त्यामागचं सत्य आहे. कृष्णन यांनी मात्र वैयक्तिक कारणास्तव आपण राजीनामा दिला आहे असं सांगितलं आहे. मात्र कृष्णन यांच्या निवृत्तीला बऱ्याच वर्षांचा अवधी होता.
एस कृष्णन यांनी राजीनामा देण्यामागचं नेमकं कारण काय आहे?
एका टॅक्सी ड्रायव्हरचं तमिळनाडू मर्कंटाइल बँकेत खातं आहे. याच खात्यात त्या टॅक्सी ड्रायव्हरला ९ हजार कोटी रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. आधी आलेला मेसेज फेक आहे असं त्याला वाटलं. मात्र त्या टॅक्सी ड्रायव्हरने आपल्या मित्राला त्यातले 21 हजार रुपये ट्रान्सफर केले आणि मग तो व्यवहार यशस्वी झालेला पाहून त्या टॅक्सी चालकाचे डोळेच विस्फारले. चित्रपटात शोभावी अशी ही कहाणी आहे.मात्र हाच हलगर्जीपणा बँकेच्या व्वस्थापकीय संचालक एस कृष्णन यांच्या राजीनाम्यास कारणीभूत ठरला. बँकेने त्या टॅक्सी ड्रायव्हरच्या खात्यातून हे पैसे काढून घेतले आहेत.
तमिळनाडू मर्कंटाइल बँकेने एस कृष्णन यांच्या राजनाम्याची माहिती मार्केट रेग्यूलेटर्सना दिली आहे. त्यासोबतच बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनेही 28 सप्टेंबर रोजी हा राजीनामा स्वीकारला आहे. मात्र RBI कडून पुढील आदेश मिळेपर्यंत कृष्णनच या पदाचा कार्यभार पाहाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.