कला, हस्तकला, संस्कृती आणि पाककृती यांचा उत्सव असलेल्या ताजमहोत्सवासाठी शिल्पग्राम सजले आहे. सोमवारपासून येथे 10 दिवसीय ताजमहोत्सव हा रंगारंग कार्यक्रम साजरा होणार आहे. बॉलीवूड पार्श्वगायक अमित मिश्रा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी त्यांच्या गायनाने कार्यक्रमाची सुरुवात करतील. यावर्षी महोत्सवाची थीम 'वसुधैव कुटुंबकम' आणि 'G20' अशी ठेवण्यात आली आहे, त्यानुसार शिल्पग्राम सजवण्यात आले आहे. महोत्सवात देशी-विदेशी पर्यटक विविध भारतीय कलांचा आस्वाद घेणार आहेत.
'ताजमहोत्सव' हा एक बहुप्रतिक्षित कार्यक्रम आहे जो ताजमहाल आग्राद्वारे आयोजित केला जातो.जगातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू भारताचा अभिमान आहे. 10 दिवसांचा हा उत्सव भारतीय संस्कृती, कला आणि हस्तकला, संगीत तसेच नृत्य प्रकार आणि देशातील दोलायमान आणि प्रेरणादायी परंपरा आणि संस्कृतींचे गौरव करण्यासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी आग्रा शहर उत्सवापूर्वी पूर्णपणे सज्ज होत असते कारण संपूर्ण राज्य आणि जगभरातील लोक या विलक्षण अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी येथे येत असतात.
ताज महोत्सवात संगीत, नृत्य, कला, संस्कृती, पाककृती आणि बरेच काही पाहायला आणि अनुभवायला मिळते. हा उत्सव भारताच्या समृद्ध वारशाचे प्रतिनिधित्व करत असतो, त्यामुळे जगभरातील लोक येथे हजेरी लावतात. ताजमहोत्सवाचा इतिहास पाहिल्यास तो 1992 पासून सुरू आहे असे आढळते. तेव्हापासून आजतागायत हा महोत्सव जगभरातील व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे.
ताजमहोत्सव, आग्रा, ताजमहालच्या पूर्वेकडील गेट 'शिल्पग्राम' येथे आयोजित केला जातो. हा महोत्सव दरवर्षी 18 ते 27 फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जातो. यंदा मात्र 20 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. ताजमहोत्सवाच्या तिकिटाची किंमत प्रौढांसाठी 50 रुपये, 5 ते 10 वर्षांच्या मुलांसाठी 10 रुपये आणि 5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी विनामूल्य आहे. परदेशी पर्यटक या महोत्सवाचे विनामूल्य साक्षीदार होऊ शकतात तर 100 विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशातील शालेय गटाला 500 रुपये द्यावे लागतील.
ताजमहोत्सवाच्या तिकीट बुकिंग ऑनलाइन केले जाऊ शकते. उत्सवात सहभागी होण्यासाठी ताजमहालच्या खिडकीवर लांब रांगेत उभे राहणे टाळता येऊ शकते.
भारतातील ताज महोत्सवाचे प्रमुख आकर्षण
ताजमहोत्सव हा उत्तर भारतातील सर्वात मोठा सांस्कृतिक कार्यक्रमांपैकी एक म्हणून ओळखला जातो. जगभरातील लोकांना हा महोत्सव आकर्षित करत असतो ज्यांना जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालच्या देदीप्यमान सौंदर्यात भिजायला आवडते. हा कार्यक्रम देशातील समृद्ध सांस्कृतिक, कलात्मक आणि आध्यात्मिक वारसा दाखवतो.
1. कला आणि हस्तकला
देशाच्या सर्व भागातील कारागीर त्यांच्या हाताने बनवलेल्या कलाकृती प्रदर्शित करण्यासाठी या महोत्सवात सहभागी होतात, ज्यात दगड आणि लाकूड कोरीव काम, हस्तनिर्मित गालिचे, संगमरवरी सजावटीच्या वस्तू, बांबू आणि पितळाच्या वस्तू, हातमागाचे कापड, लखनवी चिकन फॅब्रिक्स, बनारसचे जरी वर्क इत्यादींचा समावेश आहे. हातमागावर केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंना ग्राहकांची मोठी पसंती असते, यात करोडोंची उलाढाल होत असते. ग्रामीण कलाकारांना आपली कला दाखवण्याची आणि आर्थिक उपलब्धता देण्यासाठी हा महोत्सव ओळखला जातो.
2. सांस्कृतिक कार्यक्रम
महोत्सवात देशभरातील सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय कलाकारांचे अप्रतिम सादरीकरण होते. कुमार सानू, उषा उथप, जसबीर जस्सी आणि अनेक नामवंत लोक गायक आणि नर्तक यासारख्या ख्यातनाम कलाकारांनी या कार्यक्रमाला आजवर उपस्थिती लावली आहे. यावर्षी देखील अनेक नावाजलेले कलाकार आपली कला सादर करण्यासाठी येथे येणार आहेत.
3. खवय्यांना मेजवानी
लक्षवेधी अशा वास्तुशिल्पीय चमत्कार ताजमहाल व्यतिरिक्त, आग्रा हे अनेक आकर्षक स्ट्रीट फूड आणि स्वादिष्ट पदार्थांचे घर आहे जे खवय्यांना नेहमीच आकर्षित करत राहिले आहे. ताजमहोत्सवात पेठा,विविध प्रकारचे परांठे, दालमोथ, शावरमा आणि बेदई हे काही पदार्थ आवर्जून ट्राय करायला हवेत. खाद्यपदार्थांची देखील येथे विक्रमी विक्री होत असते.
4. मौजमजेची मोठी संधी
ताजमहोत्सवात अनेक मनोरंजक उपक्रम तुमची वाट पाहत आहेत. उंट, हत्तीची सवारी किंवा उत्सवात रोलर कोस्टर, फेरीस व्हील आणि बरेच काही यासारख्या राइड्सचा आनंद नागरिक घेऊ शकतात.
हा उत्सव आग्रा येथे साजरा केला जातो. उत्तर प्रदेश स्थापत्य आणि ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध राज्य आहे. आग्रा कधीकाळी प्राचीन भारताची राजधानी देखील राहिलेली आहे. जगातील सात आश्चर्यांपैकी एक, ताजमहाल या भव्य कलाकृतीमुळे आग्रा येथे आधीच पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. जगाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने हे शहर पर्यटकांना आकर्षित करत असते. हे शहर देशाच्या आणि जगाच्या विविध भागांशी वाहतुकीच्या विविध माध्यमांनी चांगले जोडलेले आहे. या ऐतिहासिक शहरात पोहोचण्यासाठी उपलब्ध असलेल्या वाहतुकीच्या विविध पद्धतींवर एक नजर टाकूया.
जवळचे प्रमुख शहर: दिल्ली
जवळचे विमानतळ: इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली
जवळचे रेल्वे स्टेशन: आग्रा कॅन्ट रेल्वे स्टेशन
दिल्ली पासून अंतर: 184 किमी
आज सायंकाळी ताज महोत्सवाचे उद्घाटन होणार
उत्तर प्रदेश राज्याचे उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता शिल्पग्राम येथे ताज महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यानंतर थीम साँगचे सादरीकरण होणार आहे. दानी शर्मा यांच्या ग्रुपतर्फे 'ब्रज' हे लोकनृत्य सादर होणार आहे. वाराणसीचे मनीष शर्मा 'कथ्थक' सादर करतील. त्यानंतर बॉलिवूड नाईटमध्ये पार्श्वगायक अमित मिश्राचा परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. या रविवारी शिल्पग्राम येथे तयारीला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. 10 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात सुमारे 300 स्टॉल्स असतील आणि त्यात देशभरातील कलाकुसरीचे प्रतिनिधित्व केले जाईल. महोत्सवात सुमारे 1500 कलाकार विविध स्टेजवर सादरीकरण करणार आहेत.
हे कलाकार सादरीकरण करणार आहेत
20 फेब्रुवारी : अमित मिश्रा
21 फेब्रुवारी: इंडियन ओशियन बँड
22 फेब्रुवारी: सचेत टंडन
23 फेब्रुवारी: वारसी ब्रदर्सची कव्वाली
24 फेब्रुवारी : साधो बँड
25 फेब्रुवारी: पवनदीप राजन आणि अरुणिता किंजल
26 फेब्रुवारी: वर्ल्ड डिझायनिंग फोरमचा सांस्कृतिक फॅशन शो
27 फेब्रुवारी : मैथिली ठाकूर यांचे भजन संध्या आणि लोकगायन
28 फेब्रुवारी : खेते खान
1 मार्च: हर्षदीप कौर
ऑनलाइन तिकीट बुकिंगची सुविधा!
ताजमहोत्सवात यावेळी ऑनलाइन तिकीट बुकिंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे. ताज महोत्सव वेबसाइटवर दिलेला QR कोड स्कॅन करून आणि लिंकवर क्लिक करून तिकीट ऑनलाइन बुक करता येईल. शिल्पग्राममधील तिकीट खिडक्यांवर क्यूआर कोड स्टँडीही बसवण्यात येणार आहेत. “ताजमहोत्सवासारखे उत्सव कला, हस्तकला, संस्कृती आणि देशाच्या पाककृतीला प्रोत्साहन देतात आणि ताजमहालच्या सान्निध्यात आयोजित केल्यामुळे जगभरात या स्थळाला आणि पर्यायाने भारताला लोकप्रियतेची संधी मिळते. हा उत्सव पर्यटनाला चालना देत असतो जो देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा महसूलाचा सर्वात मजबूत स्त्रोत आहे” असे उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव दुर्गा शंकर मिश्र यांनी म्हटले आहे.
दरवर्षी सुमारे चार कोटी पर्यटक आग्र्याला भेट देत असतात त्यापैकी अंदाजे 40 लाखांहून अधिक पर्यटक ताजमहाल भेटीसाठी येत असतात अशी माहिती देखील मिश्रा यांनी दिली आहे. कुंभमेळा किंवा विविध ठिकाणी आयोजित केलेल्या तत्सम कार्यक्रमांना लोकप्रिय करण्यात तंत्रज्ञानाच्या भूमिकेचेही मिश्रा यांनी कौतुक केले आहे.