तब्बल 56 कोटींचे कर्ज थकवल्याप्रकरणी गदर 2 सिनेमाचे हिरो सनी देओल यांच्या मुंबईतील बंगल्याच्या ई लिलावाची नोटीस बँक ऑफ बडोदाने 24 तांसात मागे घेतली आहे. बँकेने रविवारी 20 ऑगस्ट 2023 रोजी सनी देओल यांच्या बंगल्याची नोटीस वृत्तपत्रात जारी केली होती. मात्र या नोटीशीला 24 तास उलटत नाहीत तोच बँकेने शुद्धीपत्रक जारी करत ई-लिलावाची नोटीस रद्द करत असल्याचे जाहीर केले. बँक ऑफ बडोदाने बंगल्याच्या लिलावावरुन 24 तासांत केलेले घुमजाव सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनले आहे.
सध्या बॉक्स ऑफिसवर सनी देओल यांचा गदर-2 सिनेमा हाऊसफुल्ल सुरु आहे. या सिनेमाने रिलीज झाल्यापासून 330 कोटींची कमाई केली आहे. मात्र दुसरीकडे सनी देओल यांच्यावर कर्ज बुडवल्याप्रकरणी बँक ऑफ बडोदाने कारवाईचा बडगा उगारला. विशेष म्हणजे सनी देओल हे पंजाबमधील गुरुदारपूर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार आहेत.
सनी देओल यांनी डिसेंबर 2022 पासून कर्ज थकवल्याचे बँक ऑफ बडोदाने म्हटले आहे. कर्ज वसुलीसाठी बँकेने रविवारी सनी देओल यांचा जुहू परिसरातील गांधीग्राम रोडवरचा 'सनी व्हीला' या बंगल्याचा ई-लिलाव करण्याचे जाहीर केले.
सनी देओल यांनी डिसेंबर 2022 पासून बँकेचे कर्ज थकवले आहे. कर्जाची थकबाकी आणि त्यावरील व्याजाची रक्कम असे एकूण 55 कोटी 99 लाख रुपये वसूल करण्यासाठी बँकेने जुहूमधील बंगला लिलावासाठी काढला होता. त्याची नोटीस अजय सिंग धर्मेंद्र देओल ऊर्फ सनी देओल यांच्या नावाने वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली.
या नोटीशीनंतर बॉलिवुडमध्ये खळबळ उडाली. येत्या 25 ऑगस्ट 2023 रोजी बंगल्याचा ई-लिलाव होणार होता. त्यासाठी बँकेने 51.43 कोटींची बेस प्राईस ठेवण्यात आली होती. सनी देओल यांनी घेतलेल्या लोनसाठी ज्येष्ठ अभिनेते आणि सनी देओल यांचे वडिल धर्मेंद्र देओल गॅरंटर आहेत. दरम्यान, या नोटीशीनंतर सनी देओल यांनी एक ते दोन दिवसांत थकबाकीची रक्कम भरणार असल्याचे म्हटले आहे.
बँकेने अचानक लिलाव केला रद्द
दरम्यान, रविवारी जाहीर झालेली ई लिलावाची नोटीस बँक ऑफ बडोदाने सोमवारी 21 ऑगस्ट 2023 रोजी रद्द केली आहे. काही तांत्रिक कारणास्तव सनी देओल यांच्या बंगल्याची लिलावाची नोटीस रद्द करण्यात आल्याचे बँकेने आज जारी केलेल्या शुद्धीपत्रकात म्हटले आहे.
देओल कुटुंबियांची एकूण संपत्ती
- बॉलिवुडमध्ये धर्मेंद्र आणि त्यांची मुले सनी देओल, बॉबी देओल यांनी मागील 40 वर्षांत वेगळी ओळख निर्माण केली आहे.
- मुंबईतील जुहू या मोकाच्या परिसरात ‘सनी व्हीला’ हा अलिशान बंगला 599.44 चौरस मीटर क्षेत्रफळात विस्तारला आहे.
- विलेपार्ले परिसरात धर्मेंद्र देओल यांचा अलिशान बंगला असून याची किंमत 6 कोटी इतकी आहे.
- हिमाचल प्रदेशातील मनाली येथे सनी देओल यांची स्थावर मालमत्ता आहे.
- सनी देओल यांची मुंबईत इतर स्थावर मालमत्ता असून त्याचे एकूण मूल्य 21 कोटींच्या घरात आहे.
- सनी देओल यांच्या पूर्वजांची पंजाब आणि इंग्लंडमध्ये देखील मालमत्ता आहे.
- सनी देओल एका सिनेमासाठी 5 ते 6 कोटींचे मानधन घेतात तर जाहिरातींसाठी किमान 2 कोटी घेत असल्याचे बोलले जाते.
बँक ऑफ बडोदाचे 34 हजार कोटी थकले
सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाचे 30 जून 2023 अखेर 34 हजार 832 कोटींची थकीत कर्जे आहेत. यात अनेक बड्या उद्योगपतींनी कर्ज थकवली आहेत. मात्र कर्जवसुलीबाबत बँकेकडून सर्वसामान्यांच्या बाबत अशी सौम्य भूमिका घेतली जात नाही. सामान्यांवर कर्ज बुडवले की तातडीने कारवाईचा बडगा उगारला जातो.