2022-23 या साखर विपणन वर्षात (Sugar Marketing Year) देशातील साखरेचे उत्पादन 3.65 लाख टनांच्या तुलनेत 5 टक्क्यांनी घटून 340 लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे. मागील साखर विपणन वर्ष 2021-22 (ऑक्टोबर-सप्टेंबर) दरम्यान 358 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. साखरेचे उत्पादन कमी झाल्याने इथेनॉल (Ethanol) निर्मितीसाठी उसाचा मोलॅसिस, म्हणजेच मळी मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (ISMA) आपल्या ताज्या अंदाजपत्रकात ही माहिती दिली आहे.
ISMA ने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की साखर विपणन वर्ष 2022-23 मध्ये इथेनॉलसाठी 4.5 दशलक्ष टन मोलॅसिसचा वापर केल्यामुळे साखरेचे उत्पादन अंदाजे 34 दशलक्ष टन असेल. मागील साखर विपणन वर्ष 2021-22 मध्ये, पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यासाठी इथेनॉल तयार करण्यासाठी 3.2 दशलक्ष टन मोलॅसिसचा वापर करण्यात आला होता. इस्माच्या म्हणण्यानुसार, इथेनॉल तयार करण्यासाठी उसाचा रस म्हणजेच सिरप (Syrup) आणि बी-मोलासेसचा (B-Molasses) वापर केला जात आहे. ISMA ने साखर विपणन वर्ष 2022-23 साठी साखर उत्पादनाचे दुसरे आगाऊ अंदाजपत्रक जाहीर केले आहे.
Monthly sales quota of sugar for February 2023 - 21 LMT. pic.twitter.com/LAVWmcCYkr
— Department of Food & Public Distribution (@fooddeptgoi) January 31, 2023
महाराष्ट्रातील वास्तविक साखर उत्पादन 2022-23 मध्ये 121 लाख टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे, जे मागील वर्षी 137 लाख टन इतके होते. उत्तर प्रदेशातील साखरेचे उत्पादन आधीच्या 102 लाख टनांवरून 101 लाख टनांपर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे, तर कर्नाटकातील साखरेचे उत्पादन 60 लाख टनांवरून 56 लाख टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे.उसाची कापणी व शिल्लक क्षेत्र, क्षेत्र भेटी, उत्पन्नाचा सध्याचा कल आणि साखरेची आवक याच्या आधारे ISMA ने हा अंदाज जाहीर केला आहे. केंद्र सरकारने चालू साखर विपणन वर्ष 2022-23 साठी 61 लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिली आहे, ही गोष्ट मात्र उल्लेखनीय आहे.
गेल्या साखर विपणन वर्षात देशातून विक्रमी 11 दशलक्ष टन साखर निर्यात झाली होती. त्याच वेळी, पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण मागील वर्षी 10 टक्केच होते, तर चालू साखर विपणन वर्ष 2022-23 मध्ये त्याची पातळी 12 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.