Stock Market Update: बुधवारपासून (दि.14 डिसेंबर) शेअर मार्केटमध्ये साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये अचानक तेजी असल्याचे दिसून आले. ही तेजी गुरूवारी (दि.15 डिसेंबर)सुद्धा दिसून आली. केंद्र सरकारने साखरेच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 1 जून 2022 ते 31 ऑक्टोबर, 2022 पर्यंतच साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली होती. पण केंद्र सरकारने या निर्यात बंदीत वाढ करून ती 31 ऑक्टोबर, 2023 पर्यंत वाढवली आहे. यामुळे भारतातील साखरेचे उत्पादन आणि मागणी दोन्हीमध्ये वाढ झाली आहे. त्यात साखरेचे उत्पादन चांगले झाल्याने काही कारखान्यांचे परदेशातील कंपन्यांसोबत साखर निर्यात करण्यासंदर्भात करार झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतातील साखर कंपन्यांचे शेअर्स तेजीमध्ये असल्याचे दिसून येत आहे.
साखर कंपन्यांच्या शेअर्समधील वाढ!
राजश्री शुगर अण्ड केमिकल (7.13 टक्के वाढ), ईआयडी पॅरी (1.98 टक्के वाढ), द्वारकाधीश शुगर इंडस्ट्रीज (1.54 टक्के वाढ), विश्वराज शुगर इंडस्ट्रीज (1.158 टक्के वाढ) धामपूर शुगर मिल्स (0.95 टक्के वाढ), अवधशुगर (0.92 टक्के वाढ), श्री रेणुका शुगर (0.87 टक्के वाढ), त्रिवेणी इंजिनिअरिंग अण्ड इंडस्ट्रीज (0.87 टक्के वाढ), राणा शुगर (0.86 टक्के वाढ) आणि डीसीएम श्रीराम इंडस्ट्रीज (0.83 टक्के वाढ).
भारत साखरेचा उत्पादक आणि ग्राहकही!
भारत हा जगातील सर्वांत मोठा साखर उत्पादक आणि साखर निर्यात करणारा देश आहे. भारत जगात साखर निर्यात करणाऱ्या देशांच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या वर्षभरात भारत विक्रमी म्हणजे सुमारे 36 मिलिअन टन साखरेचे उत्पादन करण्याची शक्यता आहे. त्यातील 27 ते 27.5 मिलिअन टन साखर ही एकट्या भारतात वापरली जाणार आहे. तर उरलेली 8.5 ते 9 मिलिअन टन साखरेची निर्यात केली जाऊ शकते.
लग्नाच्या सिझनमुळे साखरेला मोठी मागणी!
भारतातील काही साखर कारखानदारांनी 4 मिलिअन टन साखर निर्यात करण्यासंदर्भात करार केले आहेत. त्याचबरोबर आता भारतात लग्नाचा सिझनसुद्धा सुरू झाला आहे. त्यामुळे साखरेला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (Confederation of All India Traders-CAIT) यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात सुमारे 32 लाख लग्ने होणार आहेत. त्यामुळे या सिझनच्या काळात साखरेच्या मागणीत 10 ते 15 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)