नशीबाचा फेरा कोणाला कधी खाली आपटेल याबाबत कोणीच काहीच सांगू शकत नाही.एक मात्र नक्की की आलेल्या अपयशानं खचून न जाता फिनिक्ससारखी राखेतून भरारी घेणारी माणसं फारच कमी असतात. ही कहाणीही अशीच काहीशी. ही कहाणी आहे तीन तरुणांची. तिघांनी मिळून 40 कोटींची कंपनी मोठ्या परिश्रमाने उभी केली, मग असं काय घडलं की त्यांना रातोरात रस्त्यावर यावं लागलं?. वाचा सविस्तर.
Table of contents [Show]
कॉलेज पासआऊट झाल्यावर केली कंपनीची सुरूवात
प्रवीण आणि विनय सिंघल आणि प्रशांत वैष्णव यांनी कॉलेजमधून पासआऊट झाल्यावर एक स्वप्न पाहिलं. आपण यशस्वी उद्योजक कसे बनू शकू? यासाठी त्यांनी एक प्लान तयार केला आणि त्यासकट ते बाजारात उतरले. तो प्लान होता फेसबुकवर वायरल कंटेट बनवण्याचा. एक असा व्हायरल कंटेंट प्लॅटफॉर्म ज्याला देशातच नव्हे तर जगात ओळख मिळेल. त्यासाठी त्यांनी WittyFeed या कंपनीची स्थापनाही केली.
40 कोटीचं यश पाहिल्यावर क्षणात आले रस्त्यावर
पाहाता पाहाता त्यांच्या कंटेंटला जगभरात ओळख मिळाली. त्यांचा वारू वेगाने दौडू लागला आणि पाहाता पाहाता त्यांनी 40 कोटींचा महसूल कमवायला सुरुवातही केली. मात्र नशीबाला त्यांचं हे यश मान्य नव्हतं. अचानक कोणतंही कारण न देता 25 नोव्हेंबर 2018 रोजी त्यांचं पेज ब्लॉक करण्यात आलं आणि तिघेही क्षणार्धात रस्त्यावर आले.
पुन्हा एकदा केली नव्याने सुरूवात
एखादा असता तर डोकं धरून बसला असता. मात्र हार मानणं या तिघांना मान्यच नव्हतं.दोन तीन महिने त्यांनी पुन्हा एकदा रिसर्च केला आणि पुन्हा एकदा त्यांनी STAGE ची नवी आयडीया सुरु केली. त्यांच्या या उत्साहाला त्यांच्या जुन्या कंपनीच्या लोकांनीही साथ दिली.1 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांनी ही कंपनी सुरू केली.
काय करते त्यांची कंपनी?
ही कंपनी लोकल भाषांमध्ये वेब सिरीज बनवते. आज देशात 22 प्रमुख भाषा आहेत. मात्र अगणित बोली बोलल्या जातात. लोकांना त्यांच्याच भाषेत समजेल अशा वेबसिरीज ही कंपनी बनवते. आज या कंपनीची नेट वॅल्यू 300 कोटी पेक्षा जास्त आहे.