Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट टिप्स: ऑप्शन ट्रेडिंग (Option Trading) काय आहे?

शेअर मार्केट टिप्स: ऑप्शन ट्रेडिंग (Option Trading) काय आहे?

झटपट नफा हवा असेल तर जाणून घ्या ऑपशन्स ट्रेडिंग बद्दल

शेअर बाजारात गुंतवणूकदार (Investors) आणि व्यापारी (Traders) असे दोन गट कार्यरत असतात. दोघांचाही उद्देश नफा मिळवणे हाच असतो. पण गुंतवणूकदार नफ्यासाठी वाट पाहण्यास तयार असतात; तर ट्रेडर्स मंडळींना झटपट नफा हवा असतो, असे व्यापारी गुंतवणूकदार ऑप्शन ट्रेडिंग करतात.

गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः कोरोना काळात शेअर बाजाराशी जोडल्या गेलेल्यांची संख्या वाढलेली दिसत असून यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. ऑप्शन ट्रेडिंग हा लोकप्रिय प्रकार आहे. कारण या माध्यमातून कमी कालावधीत भरपूर नफा मिळवता येऊ शकतो, असा एक लोकसमज आहे. प्रत्यक्षात बहुसंख्य जणांचा अनुभव विचारात घेतल्यास यामध्ये नुकसान पदरी आलेल्यांची संख्याही अधिक असल्याचे दिसून येते.

असे का होते हे जाणून घेण्यापूर्वी ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ. शेअर बाजारातील कोणत्याही शेअर्ससाठी तसेच निफ्टी (Nifty) आणि बँक निफ्टी (Bank Nifty) या निर्देशांकासाठी ऑप्शन ट्रेडिंग करता येते.

ऑप्शन ट्रेडिंग हे पूर्णतः अंदाजावर आधारित असते. विशिष्ट घटकांचा अभ्यास करून हे अंदाज अचूक कसे बनतील यासाठी ट्रेडर्स प्रयत्नशील असतात.

ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी कॉल (Call) आणि पूट (Put) या दोन संज्ञा प्रचलित आहेत. उदाहरणार्थ, जर आपल्याला बाजार म्हणजेच निफ्टी आहे त्या पातळीवरुन वर जाईल असे वाटत असेल किंवा अभ्यासातून दिसत असेल तर त्यासाठी कॉल घेतले जातात; याउलट बाजारात घसरण होईल असे वाटत असल्यास पूट खरेदी केले जातात.

निफ्टी किंवा बँक निफ्टीचे उदाहरण घेतल्यास यासाठी विशिष्ट अंकपातळ्या तयार करण्यात आल्या आहेत. निफ्टीमध्ये 50 अंकांच्या फरकाने या पातळ्या आहेत; तर बँक निफ्टीमध्ये त्या 100 अंकांच्या फरकाने आहेत.

गुरुवार ही आठवड्यातील ऑप्शनच्या व्यवहारांची साप्ताहिक समाप्ती मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यानुसार महिन्यातील शेवटचा गुरुवार ही मासिक समाप्ती असते. याला अनुक्रमे वीकली एक्स्पायरी (Weekly Expiry) आणि मंथली एक्स्पायरी (Monthly Expiry) असे म्हटले जाते.

उदाहरणार्थ सध्या निफ्टी 17750 च्या पातळीवर आहे. जर आपल्याला इथून तो वरच्या दिशेला जाऊ शकतो असे वाटत असेल तर त्यासाठी कॉल खरेदी केले जातात. त्या-त्या अंकपातळीनुसार या कॉल अथवा पूटची किंमत ठरलेली असते. निफ्टीच्या कॉलचा लॉट साईज 50 चा असतो; तर बँक निफ्टीचा 25 चा.

आता प्रत्यक्ष व्यवहार कसा घडतो हे जाणून घेऊ. आपल्याला बाजारात तेजी येईल अशी अपेक्षा असल्यास आपण 17750 चा किंवा त्या जवळच्या अंकपातळीचा कॉल खरेदी करु शकता. समजा आपण 17750 चा कॉल 220 रुपयांना खरेदी केला असेल यासाठी आपल्याला 220 गुणिले 50 असे 11,000 रुपये गुंतवावे लागतात. निफ्टीमध्ये वाढ झाल्यानंतर या कॉलची किंमत जर 230 रुपये झाली तर आपला नफा 10 रुपये गुणिले 50 (लॉटसाईज) असा एकूण 500 रुपये होतो. याउलट निफ्टीमध्ये घसरण होऊन आपल्या कॉलची किंमत 200 रुपयांवर आली तर आपला तोटा 50 गुणिले 20 असा 1000 रुपये होतो.

बाजारात जसजसे शेअर्सचे व्यवहार होत जातात तसतशी निफ्टीची पातळी वधारत अथवा घसरत जाते. त्यानुसार आपण कोणत्याही पातळीवर कॉल अथवा पूट खरेदी करु शकतो.

सदर कॉल अथवा पूटची विक्री केल्यानंतर हा व्यवहार संपुष्टात होऊन आपला नफा-तोटा यांचा हिशेब करुन आपली रक्कम आपल्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये जमा होते. याविषयीची इतर माहिती आणि पूट म्हणजे काय हे आपण पुढील भागात जाणून घेऊ.