तसं पाहता हल्ली मोबाईलवर इंटरनेट आल्यामुळे आपली इच्छा असो किंवा नसो विविध प्रकारच्या आवश्यक-अनावश्यक, आवडीच्या-नावडीच्या बातम्या आपल्या मोबाईलवर येऊन ‘झळकत’ असतात. आपण पाहिले नाही तर पाहेपर्यंत थांबलेल्याही असतात! त्यामुळे हल्लीच्या काळात अपडेट असणं हे फारसं अवघड राहिलेलं नाही. पण जर तुम्ही शेअर बाजारात ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला आर्थिक घडामोडी आणि त्यावर परिणाम करणाऱ्या घटना-घडामोडी यांच्याविषयीच्या बातम्यांवर चौकसपणे लक्ष ठेवून राहणं क्रमप्राप्त ठरतं. याचे कारण या घडामोडींचा परिणाम आपल्या शेअर बाजारावर होत असतो, होणार असतो. तसेच तुम्ही एखादा कॉल किंवा पूट कॅरी फॉरवर्ड केला असेल म्हणजेच आधी खरेदी केला असेल तर तुम्हाला अपडेट असणं अत्यावश्यकच ठरतं. अन्यथा तुमचे लाखाचे 12 हजार व्हायला काही सेकंदही पुरेसे ठरतील !
उदाहरणच पाहायचं झाल्यास, डाऊ फ्युचर्स (Dow Futures) आणि नॅसडॅक फ्युचर्स (Nasdaq Futures) या दोन अमेरिकन शेअर बाजाराशी संबंधित निर्देशांकांवर भारतीय शेअर बाजारात ट्रेडिंग करणाऱ्यांची नजर असते. याच्यासोबत एसजीएक्स निफ्टी (SGX NIFTY) हा निर्देशांकही पाहिला जातो. या दोन्हींवरुन साधारणतः आपल्याला दररोजचा शेअर बाजार उसळी घेऊन उघडणार आहे, घसरण दाखवत उघडणार आहे की थोडीशी वाढ-घट नोंदवत, आहे तिथेच स्थिरावरणार आहे याचा अंदाज देत असतो. तसेच दिवसभर बाजारातील व्यवहार संपेपर्यंतही या दोन्ही-तिन्ही निर्देशांकांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव आपल्या शेअर बाजारावर असतो. त्यामुळे या निर्देशांकांवर परिणाम करणाऱ्या जागतिक, भूराजकीय घडामोडीं विषयीची किमान माहिती असणं आपल्याला गरजेचं ठरतं.
आता हेच पहा ना ! काही दिवसांपूर्वी डाऊ फ्युचर्समध्ये सुमारे 1000 अंकांची घसरण झालेली दिसून आली होती; पण त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तो 150 ने वधारलेला होता. यातून बाजारातील दोलायमानता किती पराकोटीला पोहोचलेली आहे याचा अंदाज येतो. अमेरिकन बाजारातील सर्वच निर्देशांकांमध्ये कमालीचे चढउतार गेल्या दोन-चार दिवसात पाहायला मिळत आहे. अमेरिका-रशिया यांच्यात युद्ध सुरू होण्याच्या शक्यता दिसू लागल्या आहेत. त्यासंदर्भातील बातम्यांवरही लक्ष ठेवून राहणे आवश्यक ठरते. कारण अशा अशांतता, अस्थिरता, असुरक्षिततेच्या काळात बाजारात घसरण दिसून येते, क्रूड ऑईलचे भाव वाढलेले दिसतात, सोन्याची खरेदी वाढते; पर्यायाने बाजारात घसरण दिसून येते. अशा वेळी आपण तेजीच्या दिशेने विचार करुन रणनीती ठरवू लागलो तर नुकसान अटळ आहे. म्हणूनच अपडेट राहा, सुरक्षित राहा....हा शेअर बाजारातील ट्रेडर्ससाठीचा मूलमंत्र आहे, असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही.