श्रावण महिना म्हणजे देवदर्शन, पुजा पाठ आलेच. या महिन्यात अनेक नागरिक देवदर्शनासाठी तीर्थ स्थळांना भेटी देतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खास श्रावण महिन्यानिमित्त महामंडळाने " एसटी संगे तीर्थाटन'हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामध्ये प्रवासी भाविकांना मोफत आणि माफक दरात तीर्थाटन करता येणार आहे.
एसटी संगे तीर्थाटन-
श्रावण महिन्यानिमित्त राज्यातील वेगवेगळ्या धार्मिकस्थळांना नागरिक भेटी देत असतात. काही प्रसिद्ध तीर्थस्थळे जास्त अंतरावर असल्याने अनेक वाहने बलदत प्रवास करावा लागतो. प्रसंगी काही वेळा मुक्कामी जावे लागते. त्यामुळे एसटी महामंडळाने 'एसटी संगे तीर्थाटन' हा उपक्रम सुरू करून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. एमएसआरटीसीने (MSRTC) शुक्रवारी जाहीर केले आहे की महामंडळाकडून शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी प्रवाशांसाठी विविध धार्मिक स्थळी जाण्यासाठी अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहेत.
विविध तीर्थस्थळांना भेट
या उपक्रमांतर्तग राज्यातील एसटी महामंडळाच्या विविध आगारातून विविध धार्मिक स्थळासांठी बसेस सोडण्यात येत आहेत. या बसेस थेट मंदिरस्थळी जाऊन पोहोचतात. शिवाय महामंडळाने एकाचवेळी अनेक धार्मिकस्थळांच्या सहलीचीही सुविधा दिली आहे. तसेच एक दिवस किंवा दोन दिवस एक रात्र मुक्काम अशा सहलीचेही एसटीकडून आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रवाशांना एकाच एसटीतून राज्यातील विविध तीर्थस्थळांना भेट देता येणार आहे.
समूहासाठी धार्मिक सहल-
तसेच एसटी महामंडळाकडून एसटी संगे तीर्थाटन या उपक्रमातंर्गत ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांचा समूह, महिला बचत गटांच्या धार्मिक सहली, विविध सेवाभावी संस्थाकडून आयोजित तीर्थाटन यासाठी देखील सवलतीमध्ये एसटी बुक करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. यामुळे नागरिकांचे स्वस्तात आणि सुरक्षित दर्शन होत आहे.
मोफत आणि माफक दरात सुरक्षित प्रवास
राज्य सरकारकडून एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विविध सवलतीच्या योजना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये 75 वर्षापुढील नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे. तसेच 60 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिक महिलांना अर्धे तिकीट दर आकारण्यात येत आहे. यामुळे अनेक नागरिक देवदर्शनासाठी एसटीचा पर्याय निवडताना दिसून येत आहे. एसटी संगे तीर्थाटन करत असताना ज्येष्ठ नागरिक महिलांना मोफत आणि कमी तिकिटामुळे स्वस्तात आणि सुरक्षित प्रवास करण्याचा आनंद घेता येत आहे.
एसटी आगारातून सुविधा
श्रावणात एसटी संगे तीर्थाटन या उपक्रमासाठी एसटी महामंडळाच्या आगारातून बस सुटतील. यासाठी प्रवाशांनी जवळच्या एसटी आगारामध्ये जाऊन संबंधित तीर्थक्षेत्राला जाणाऱ्या बसेसची चौकशी करावी. त्या ठिकाणी तुम्हाला कोणकोणत्या धार्मिकस्थळासाठी विशेष दर्शन बस आहेत. तसेच इतर धार्मिक स्थळांसाठी कोणकोणत्या एसटी उपलब्ध आहेत याबाबतची माहिती उपलब्ध होईल. महामंडळाकडून शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी प्रवाशांसाठी विविध धार्मिक स्थळी जाण्यासाठी अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.