स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकेने (सिंगापूर) सी.जी पॉवर अॅंड इंडस्ट्रिअल सोल्युशन या कंपनीतील सर्व शेअर्सची विक्री केली आहे. स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकेने बुधवारी 7 सप्टेंबर 2022 रोजी 1,38,45,000 शेअरची विक्री केली असल्याचे स्टॉक एक्सचेंजमध्ये माहिती देण्यात आली आहे. प्रती शेअर 215 रुपयांप्रमाणे ब्लॉक डिल झाले. यातून स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकेला एकूण 298 कोटी मिळाले. (Standard Chartered Bank (Singapore) Sale CG Power Shares)
स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकेची सी.जी पॉवरमध्ये 0.91% हिस्सेदारी होती. हे सर्व शेअर विक्री करण्याचा बँकेने निर्णय घेतला. त्यानुसार खुला बाजारात सहा टप्प्यात सर्व शेअर विक्री करण्यात आले. स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकेने सी.जी पॉवरचे शेअर विक्री केले तर दुसऱ्या बाजुला सोसिएट जनरल,डीएसपी म्युच्युअल फंड आणि एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सी.जी पॉवरचे शेअर खरेदी केल्याचे दिसून आले आहे.
सी.जी पॉवर ही कंपनी इलेक्ट्रिक मोटर्स,जनरेटर्स, ट्रान्सफॉर्मर्स आणि इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशनमधील उपकरणांची निर्मिती करते. याशिवाय इलेक्ट्रिक उपकरणांची निर्मिती केली जाते. इलेक्ट्रिक वाहनांची वाढती बाजारपेठ लक्षात घेता कंपनीला भविष्यात मोठ्या संधी आहेत. केंद्र सरकारने ऊर्जा क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे. पुढील पाच वर्षात देशात 25 सोलार पार्क उभारले जाणार आहेत. यातून किमान 20,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे. यामुळे सी.जी पॉवरसाठी चांगली संधी असेल. ऊर्जा क्षेत्राबरोबरच कंपनीसाठी रेल्वे, स्टील, अॅग्रीकल्चर, फार्मा, डिफेन्स, सिमेंट या क्षेत्रात व्यावसायिक संधी आहेत.
जुलै महिन्यात सी.जी पॉवरचा शेअर तेजीत
जुलै महिन्यात सी.जी पॉवरचा शेअर तेजीत होता.सी.जी पॉवरच्या शेअरने जुलै महिन्यात 246.85 रुपयांचा सार्वकालीन उच्चांक गाठला होता. तो 30% वधारला होता. या शेअरमधील दैनंदिन उलाढाल देखील चार पटीने वाढली होती. या तेजीने गुंतवणूकदारांना चांगलाच फायदा झाला होता. आज 8 सप्टेंबर 2022 रोजी बीएसईवर सी.जी पॉवरचा शेअर 223.70 रुपयांवर आहे. त्यात 2.03% वाढला आहे.
कंपनीचा नफा 138% वाढला
सी. जी पॉवर अॅंड इंडस्ट्रिअल सोल्युशनला चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत 130 कोटींचा नफा झाला. एप्रिल ते जून 2022 या कालावधील कंपनीच्या नफ्यात 138% वाढ झाली होती. 30 जून 2021 अखेर संपलेल्या पहिल्या तिमाहीत कंपनीला 54.58 कोटींचा नफा झाला होता. यंदा कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ झाली. त्याशिवाय कंपनीच्या महसुलात देखील मोठी वाढ झाली आहे. कंपनीचा पहिल्या तिमाहीत 1,674.50 कोटींचा महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 1,061.24 कोटींचा नफा झाला होता.