सध्या मुलांचा शैक्षणिक खर्च भयंकर वाढला आहे. त्यामुळे त्यांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी आर्थिक तरतूद आत्तापासूनच करून ठेवणे गरजेचे आहे. आज केलेली गुंतवणूक उद्याचा मोठा फंड तयार करण्यासाठी मदत करेल. हा फंड तयार करण्यासाठी तुम्ही एकरकमी किंवा मासिक गुंतवणुकीचा पर्याय निवडू शकता. या पर्यायांमध्ये मुदत ठेव (FD), पोस्ट ऑफिस योजना (Post Office Schemes), म्युच्युअल फंडातील एसआयपी पद्धतीचा (SIP) समावेश करण्यात आला आहे. मुलांच्या नावाने पालक पोस्टात सुकन्या समृद्धी योजनेत (SSY) आणि आवर्ती ठेव योजनेत (RD) गुंतवणूक करू शकतात. याठिकाणी गुंतवणूक करून सर्वाधिक परतावा मिळवता येऊ शकतो. यापैकी कोणत्या ठिकाणी केलेली गुंतवणूक सर्वात जास्त परतावा मिळवून देईल, जाणून घेऊयात.
व्याजदर आणि गुंतवणुकीचा कालावधी जाणून घ्या
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये (SSY) 10 वर्षाच्या आतील मुलीच्या नावाने पालक गुंतवणूक करू शकतात. ही गुंतवणूक 15 वर्ष सलग करावी लागते. त्यानंतर 5 वर्षाचा वेटिंग पिरिअड देण्यात येतो. या काळात गुंतवणूक करावी लागत नाही. विशेष म्हणजे या कालावधीत देखील ग्राहकांना व्याजदर मिळतो. हा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर 21 वर्षांनंतर यातील पैसे त्या मुलीला मिळतात. या खात्यातील पैसे पालक मुलीच्या वयाच्या 18 व्या वर्षी शिक्षणासाठी काढू शकतात. मुलीच्या शिक्षणासाठी पालक एकूण रकमेपैकी 50% रक्कम काढू शकतात. या योजनेत सध्या 8 टक्के व्याजदर देण्यात येत आहे.
पोस्टाच्या आवर्ती ठेव योजनेचा (Recurring Deposit Scheme) गुंतवणूक कालावधी 1,2,3 आणि 5 वर्षापर्यंत आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला 7.5 टक्के व्याजदर मिळणार आहे. आवर्ती ठेव योजनेतील गुंतवणूक ही सुरक्षित आणि निश्चित परतावा देणारी आहे. या योजनेत देखील गुंतवणूकदार मासिक आधारावर गुंतवणूक करू शकतो. आवर्ती ठेव योजनेत दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक अधिक फायद्याची ठरते.
किमान आणि कमाल गुंतवणूक जाणून घ्या
सुकन्या समृद्धी योजनेत पालक मुलीच्या नावे किमान 250 रुपये, तर कमाल 1.50 लाख रुपये वार्षिक आधारावर गुंतवू शकतात. पोस्टातील आवर्ती ठेव योजनेत (Recurring Deposit Scheme) गुंतवणूकदार किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकतात. या योजनेत देखील कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.
कर सवलत मिळते का?
आयकर कायद्यातील 1961 अनुसार कलम 80C अंतर्गत सुकन्या समृद्धी योजनेत वार्षिक 1.50 लाखांच्या गुंतवणुकीवर ग्राहकांना कर सवलतीचा लाभ घेता येणार आहे. तसेच पोस्टातील आवर्ती ठेव योजनेत 5 वर्षासाठी केलेल्या गुंतवणुकीवर कलम 80C अंतर्गत वार्षिक 1.50 लाखांच्या गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ घेता येईल.