कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाची (Agriculture technology) वाढ झपाट्यानं होत आहे. अनेक शेतकरी तंत्रज्ञानाचा भरपूर वापर करून आपलं उत्पन्न वाढवत आहेत. दुसरीकडे अनेक शेतकरी नवीन तंत्रज्ञानाच्या वापरास अद्याप तयार नाहीत. कारण आधीच नफा कमावण्यासाठी मोठं कष्ट उपसावं लागतं. त्याच तंत्रज्ञानानं काही साध्य होईल का, याविषयी शेतकरी (Farmers) साशंक असतो. असंच एक तंत्रज्ञान आहे, ठिबक सिंचन. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतकरी त्यांचा खर्च, वेळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याची बचत करू शकतात. ठिबक सिंचन म्हणजे काय आणि हे तंत्र कसं कार्य करतं, ते जाणून घेऊया...
ठिबक सिंचन म्हणजे काय?
ठिबक सिंचन हे एक तंत्र आहे, या माध्यमातून पिकाला पाण्याच्या थेंबानं पाणी दिलं जातं. याअंतर्गत शेतात प्लॅस्टिक पाइप टाकून त्याच्या सहाय्यानं थेंब थेंब पाणी थेट पिकाच्या मुळापर्यंत पोहोचवलं जातं. या ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचे अनेक फायदे आहेत. ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत तर होतेच, शिवाय शेतकऱ्याचा नफाही वाढतो. पाहूया, काय काय फायदे होतात...
- पहिला आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ठिबक सिंचनाचा वापर करून 70 ते 80 टक्के पाण्याची सहजासहजी बचत करता येते. ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, अशा ठिकाणी ठिबक सिंचन अत्यंत उपयुक्त आहे.
- ठिबक सिंचन सुविधा असल्यास सिंचनासाठी शेतात येण्याची गरज नाही. फक्त वेळच्या वेळी पाणी देणं सुरू करावं लागतं. हे पाणी आपोआप पिकाच्या मुळांपर्यंत पोहोचतं.
- जर तुमची शेती खूप मोठी असेल तर तुम्हाला कोणतेही मजूर ठेवण्याची गरज नाही, म्हणजे मजुरीवर खर्च होणारा पैसाही वाचणार आहे.
- जर तुम्ही तुमच्या पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला असेल तर त्याच्या मदतीनं तुम्ही शेतात खतही टाकू शकता. यासाठी तुम्हाला लिक्विड न्यूट्रिएन्ट्सचा वापर करावा लागेल. पाण्यात मिसळून शेतात टाकू शकता. म्हणजे खतांच्या फवारणीवरचा मजुरीचा खर्चही वाचणार आहे.
कोणकोणत्या पिकांमध्ये होतो ठिबक सिंचनाचा वापर?
काही अंतरावर लागवड केलेल्या कोणत्याही पिकाला ठिबक सिंचनाच्या सहाय्यानं पाणी देता येवू शकतं. गव्हासारख्या पिकामध्ये ठिबक सिंचनाचा फारसा उपयोग होत नाही, मात्र ऊस, मका अशा पिकांमध्ये त्याचा वापर करता येतो. सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळांच्या लागवडीसाठी याचा वापर केला जाऊ शकतो. जर तुम्ही गहू ओळीत पेरला तर त्यातही ठिबक सिंचन लावता येईल. मात्र ही खर्चिक बाब आहे.
ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा खर्च किती?
भाजीपाला आणि फळांमध्ये ठिबक सिंचनाचा वापर करता येवू शकतो. यासाठी शेतकऱ्याला एकरी 12-15 हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागू शकतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एवढा खर्च केल्यानतर तुम्हाला सिंचनासाठी कोणतेही मजूर लावावे लागणार नाहीत. किमान संपूर्ण हंगामासाठी खत फवारणीसाठी मजूर द्यावा लागणार नाही. याचा सर्वात मोठा फायदा हा, की खते आणि पाणी शेतात पिकांना वेळेवर मिळणार आहे. सहाजिकच त्यामुळे उत्पादनात वाढ होणार आहे. मल्चिंग पेपरचा वापर ठिबक सिंचनासोबत केला जातो, ज्यामुळे ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते.