रिझर्व्हेशन फुल्ल झाल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात कसे जायचे या चिंतेत असणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी रेल्वेने मोठी खूशखबर दिली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून गणेशोत्सवात तब्बल 312 जादा ट्रेन्स सोडण्यात येणार आहेत. आरक्षित आणि अनारक्षित ट्रेन्समुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या अडीच लाख चाकरमान्यांचा प्रवासाचा मार्ग सुकर होईल.
गणेशोत्सवासाठी आता एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. कोकणात गणेशोत्सव हा मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. नोकरीधंद्यानिमित्त मूळ गाव सोडून मुंबई आणि इतर शहरांत स्थायिक झालेले लाखो चाकरमानी आवर्जून गणेशोत्सवाला कोकणात जातात. मात्र सणासुदीत प्रवासाची साधने मर्यादित असल्याने कोकणी माणूस प्रसंगी जादा पैसे मोजून खासगी बस, ट्रेन, खासगी वाहने, एसटी जे मिळेल त्या साधनाने प्रवास करतो.
कोकण मार्गावरील गणेशोत्सवातील मागणी लक्षात घेता रेल्वेने जादा गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. कोकण रेल्वे मार्गावर नियमित मेल-एक्सप्रेस व्यतिरिक्त पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेकडून गणेशोत्सव काळात 312 स्पेशल ट्रेन्स धावणार आहेत.
मुंबई, पनवेल, वसई रोड, गुजरातूनमधून कोकणात जादा ट्रेन्स सोडल्या जाणार आहेत. मध्ये रेल्वेवर गणेशोत्सवात 257 अतिरिक्त ट्रेन्स चालवल्या जातील. पश्चिम रेल्वेवर याच काळात 55 जादा ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. यातून एक लाख प्रवासी प्रवास करु शकणार आहेत.
यंदा गणेशोत्सवासाठी चालवल्या जाणाऱ्या जादा ट्रेनच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. आरक्षित ट्रेनची संख्या कमी करुन यंदा अनारक्षित ट्रेनची संख्या वाढवण्यात आल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे. मध्ये रेल्वेकडून यंदा 218 आरक्षित ट्रेन चालवल्या जातील. गेल्या वर्षी ही संख्या 262 इतकी होती.
आरक्षित ऐवजी बदल्यात प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने अनारक्षित ट्रेन्सची संख्या वाढवली आहे. यंदा 94 अनारक्षित गाड्या कोकण रेल्वेवर धावतील. यातून जवळपास 1.50 लाख प्रवाशांना प्रवास करता येईल, असा दावा रेल्वेने केला आहे. जादा गाड्यांमधून रेल्वेला किमान 5 कोटींचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
नियमित गाड्यांची प्रतीक्षा यादी वाढली
कोकण रेल्वे मार्गावर मुंबईतून धावणाऱ्या नियमित मेल एक्सप्रेस गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. मुंबई-मंगलोर सुपरफास्ट एक्सप्रेस, कोकणकन्या, दादर सावंतवाडी राज्यराणी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, मत्स्यगंधा , नेत्रावती या गाड्यांचे गणेशोत्सवातील आरक्षणातील प्रतीक्षा यादी विक्रमी पातळीवर गेली आहे.