Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Special FD Vs Normal FD: विशेष मुदत ठेव योजना आणि सामान्य मुदत ठेव योजनेत नेमका फरक काय? जाणून घ्या

Special FD Vs Normal FD

Image Source : www.cnbctv18.com

Special FD Vs Normal FD: गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या पर्यायांमध्ये बँकेची मुदत ठेव योजना (FD) ही सर्वात जुनी आणि सुरक्षित गुंतवणूक पद्धत म्हणून ओळखली जाते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँक विशेष मुदत ठेव योजना (Special Fixed Deposit Scheme) लॉन्च करते. जर तुम्हीही मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणार असाल, तर तुम्हाला सामान्य मुदत ठेव योजना आणि विशेष मुदत ठेव योजनेतील फरक माहीत असणे गरजेचे आहे.

आर्थिक गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये बँकेतील मुदत ठेव योजना ही सर्वात जुनी आणि पारंपारिक गुंतवणूक पद्धत आहे. हा एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय असून यामध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदार सर्वाधिक परतावा मिळवू शकतात. देशातील सर्वच बँकांमध्ये मुदत ठेव योजना ग्राहकांसाठी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये कमी जोखीम असून सर्वाधिक परतावा मिळवता येतो. यातील गुंतवणूक कालावधी हा गुंतवणूकदार निश्चित करू शकतो, तसेच प्रत्येक बँकेचा मुदत ठेवींवरील व्याजदर हा वेगवेगळा असतो.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँका विशेष मुदत ठेव योजना (Special Fixed Deposit Scheme) लॉन्च करतात. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील अनेक बँकांनी विशेष मुदत ठेव योजना लॉन्च केल्या आहेत. तुम्हीही मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला विशेष मुदत ठेव योजना आणि सामान्य मुदत ठेव योजनेमध्ये नेमका फरक काय असतो, याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. आज त्याबद्दल जाणून घेऊयात.

सामान्य मुदत ठेव योजना Vs विशेष मुदत ठेव योजना

सामान्य मुदत ठेव योजनेच्या (Normal Fixed Deposit Scheme) तुलनेत विशेष मुदत ठेव योजनेतील (Special Fixed Deposit Scheme) नियम आणि अटी या वेगवेगळ्या असतात. महत्त्वाचं म्हणजे विशेष मुदत ठेव योजनेतील गुंतवणूक कालावधी हा सामान्य मुदत ठेव योजनेच्या तुलनेत कमी असतो आणि यामध्ये सर्वात जास्त व्याजदर (Interest) दिला जातो.

विशेष मुदत ठेव योजना बँकेकडून एका निश्चित कालावधीसाठी सुरू करण्यात येते, मात्र सामान्य मुदत ठेव योजना ही सातत्याने चालू असते. त्यावरील व्याजदर हा बँक ठराविक कालावधीनंतर कमी किंवा जास्त करू शकते. विशेष मुदत ठेव योजनेत गुंतवणूक केल्यावर ग्राहकांना सर्वाधिक परतावा (Returns) मिळतो. त्यामुळेच सामान्य मुदत ठेवीच्या तुलनेत विशेष मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.

कोणत्या बँकांनी विशेष मुदत ठेव योजना सुरू केल्या आहेत?

एचडीएफसी बँकेने दोन विशेष मुदत ठेव योजना सुरू केल्या आहेत. ज्यामध्ये बँकेच्या ग्राहकांना सर्वाधिक व्याजदर मिळत आहे. तसेच एसबीआय बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी वी केअर आणि सर्वसामान्य लोकांसाठी अमृत कलश मुदत ठेव योजना (Amrit Kalash Fixed Deposit Scheme) सुरू केली आहे. या विशेष मुदत ठेव योजनेचा कालावधी हा 400 दिवसांचा असून यामध्ये सर्वात जास्त व्याजदर देण्यात येत आहे. यातील गुंतवणुकीवर सर्वसामान्य लोकांना 7.10 टक्के  व्याजदर देण्यात येतो, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याजदर दिला जात आहे.

इंडियन बँकने 'इंड सुपर 400 डेज' (Ind Super 400 Days) ही विशेष मुदत ठेव योजना चालू केली आहे. याचा गुंतवणूक कालावधी 400 दिवसांचा असून यामध्ये सामान्य लोकांना 7.25 टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याजदर देण्यार येत आहे.

मुदत ठेव योजनेबद्दल जाणून घ्या

भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा बचतीचा पर्याय म्हणून आपण बँकेतील मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करतो. या मुदत ठेव योजनेत तुम्ही जमा केलेल्या रकमेवर निश्चित काळासाठी निश्चित व्याजदर दिला जातो. यातील पैसे तुम्ही मॅच्युरिटीपूर्वी काढू शकता किंवा त्यावर कर्ज घेऊ शकता. मात्र मॅच्युरिटीपूर्वी मुदत ठेव योजनेतून पैसे काढले, तर तुम्हाला दंड देखील भरावा लागतो.

Source: hindi.moneycontrol.com